मंठा अर्बन बँकेचा फरार घोटाळेबाज अधिकारी सतीश देशमुख यास वर्षभरानंतर पोलिसांनी केले जेरबंद

जालना ,९ मार्च / प्रतिनिधी :- मंठा अर्बन बँकेचा फरार घोटाळेबाज अधिकारी सतीश देशमुख यास वर्षभरानंतर पोलिसांनी जेरबंद केले असून त्याला सहा दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 
 भारतीय रिझर्व बँकेने परवाना रद्द केलेल्या मंठा अर्बन बँकेचा एक वर्षांपासून फरार असलेला घोटाळेबाज  अधिकारी सतीश अंबादास देशमुख यास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली आहे.त्याला जालना येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एच.ए. अन्सारी यांनी 14 मार्चपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंठा अर्बन बँक ऑगस्ट 2020 मध्ये रिझर्व बँकेने निर्बंध लादल्यानंतर या बँकेतील अनेक घोटाळे समोर आले होते. या बँकेवर दोनवेळा निर्बंध लावल्यानंतर कारभार सुधारला नव्हता. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून, प्रशासक नियुक्त करण्यात आले. या बँकेचा रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात 16 फेब्रुवारीला परवाना रद्द केलेला आहे. या बँकेत अनेक गोरगरिबांनी ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फिक्स डिपॉझिट च्या रक्कमा बँकेतील कर्मचाऱ्यांनी खोट्या पावत्या देऊन परस्पर हडपल्या. यासंदर्भात 24 मार्च 2021 रोजी मंठा बँकेच्या लक्कडकोट जालना शाखेतील गैरव्यवहाराबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात सतीश देशमुख याच्यासह तीन कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. बावणेपांगरी येथील मोलमजुरी करणाऱ्या मंजुळाबाई कोल्हे आणि त्यांच्या नातेवाईकांनी  जमा केलेले 17 लाख 72 हजार रुपयांची रक्कम या कर्मचाऱ्यांनी परस्पर हडपली. तपासामध्ये गैरव्यवहार केलेल्या रक्कमेचा आकडा कोट्यावधी रुपयामध्ये वाढतच गेल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. या गुन्ह्याचा तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन हे करीत आहेत.  गेल्या वर्षभरापासून आरोपी सतीश देशमुख वर्षभरापासून फरार होता. बुलढाणा जिल्ह्यातून  सतीश देशमुख यास सपोनि. पायघन , सहाय्यक फौजदार रवी जोशी, पोलीस हवालदार फुलसिंग गुसिंगे, गजू भोसले, ज्ञानेश्वर खराडे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.  सतीश देशमुख यास मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती अन्सारी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घोटाळेबाज सतीश देशमुख यास अटक झाल्यामुळे अनेक घोटाळे पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच मंठा अर्बन बँकेच्या खात्यातून ऑनलाइन दोन कोटी 70 लाख रुपये गायब झाल्याच्या दुसऱ्या एका गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा स्वतंत्रपणे करीत आहे.