अल्पवयीन मुलीवर बलात्कार,आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

औरंगाबाद ,५ मे /प्रतिनिधी :-अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्‍यावर बलात्कार करणारा आरोपी सुनिल देविदास वाहुळ (२३, रा. औरंगाबाद) याला २० वर्षे  सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ४१ हजार ५०० रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावला. 

विशेष म्हणजे गुन्‍ह्यात पीडित मुलगीच फितुर झाली होती. त्‍यावेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी पीडितेची उलट तपासणी करण्‍याची परवानगी न्‍यायालयाकडे मागितली.ही  विनंती मान्य केल्यानंतर अॅड. शिरसाठ यांनी केलेल्या उलटतपासणी पीडितेने घडलेल्या घटनेची कबुली दिली.

प्ररकणात १४ वर्षीय पीडितेच्‍या वडिलांनी  फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, १७ मार्च २०१५ रोजी रात्री पीडिता ही दिसत नसल्याने फिर्यादीने त्‍याच्‍या लहान मुलीकडे पीडितेची विचारणा केली. त्‍यावर तिने, पीडिता व आरोपी हे परिसरातील किराणा दुकानासमोर उभे होते. तेंव्‍हा आरोपीने पीडितेला माझ्या सोबत लग्नकर नाहितर जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्‍यानंतर दोघे तेथून गेल्याचे सांगितले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्ह्याच्‍या तपासादरम्यान पोलिसांनी २० मार्च २०१५ रोजी जाधवमंडी येथून पीडितेला ताब्यात घेत आरोपीला अटक केली. पीडितेचा जबाब घेतला असता, तिने सांगितले की, आरोपी व पीडिता एकाच परिसरात रहाणारे असल्याने त्‍यांच्यात नेहमीच बोलणे होत होते. त्‍यातच ते एकमेकांवर प्रेम करु लागले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्‍याशी जवळीक निर्माण केली. आरोपी पीडितेला अश्लिल चित्रफित दाखवत व पीडितेला देखील चित्रफिती प्रमाणे कृत्‍य करायला सांगत होता. लग्न करणार असल्याने पीडितेने देखील त्‍यास सहमती दर्शवली होती. आरोपी पीडितेशी बलात्‍कार व अनैसर्गिक कृत्‍य क‍रतांना मोबाइल मध्‍ये त्‍याचे चित्रण करित होता, तेच चित्रण पीडितेला देखील दाखवत होता.

१७ मार्च २०१५ रोजी पीडितेने आरोपीला फोन करुन आपण पळून जावून लग्न करु तु परिसरातील एका अंगणवाडी जवळ लवकर भेट म्हणुन सांगितले. त्‍यानूसार आरोपी तेथे आला त्‍यानंतर ते दोघे २० मार्च २०१५ दोघे पटेलनगर, पिसादेवी भक्तीनगरात फिरले. १९ मार्च २०१५ रोजी त्‍यांनी पिसादेवीपरिसरातील एका दुकानातून ५० रुपयांचा मनी मंगळसुत्र घेतले व हर्सुल येथील हरसिध्‍दी मातेच्‍या मंदीरात लग्न केले. २० मार्च रोजी पोलिसांनी दोघांना जाधवमंडी परिसरातून ताब्यात घेतले.

प्रकरणात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्‍हाण यांनी तपास करुन न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ तपास सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी सुनिल वाहुळ याला दोषी ठरवून पोक्सोच्‍या कलम ४ अन्‍वये २० सक्तमजुरी, २५ हजारांचा दंड, कलम ८ अन्‍वये ३ वर्षे सक्तमजुरी, ५ हजारांचा दंड, कलम १२ अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, भादंवी कलम ३६३ अन्‍वये ३ वर्षे सक्तमजुरी ५०० रुपयांचा दंड, कलम ३७६ (२)(आय) अन्‍वये दहा वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात अॅड. शिरसाठ यांना अॅड. तेजस्‍वीनी जाधव यांनी सहाय केले. पैरवी अधिकारी म्हणुन हवालदार शेख रज्जाक यांनी काम पहिले.