अल्पवयीन मुलीवर सावत्र मामाचा अत्याचार ,सावत्र मामाला अटक

औरंगाबाद ,५ मे /प्रतिनिधी :- १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र मामाने अत्याचार केला. २५ ते २८ एप्रिलदरम्यान उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. आरोपी सावत्र मामा घटना उघडकीस आल्यापासून पसार होता. पोलिसांनी तपास करुन त्‍या नराधम सावत्र मामाला ४ मे रोजी रात्री अटक केली. तर त्‍याला ९ मेपर्यंत पोलिस  कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी दिले.

पीडितेच्या वडिलांना चार बायका आहेत. पीडिता ही दुसऱ्या क्रमांकाच्या पत्नीची मुलगी आहे. ती पूर्वी जिन्सी भागात राहायची, परंतु, चौथ्या क्रमांकाची पत्नी कुकरचा स्फोट होऊन जखमी झाल्याने काही दिवसांपासून पीडितेला मदतीसाठी उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीतील घरी आणले होते. पाच ते सहा दिवसांपूर्वी चौथ्या क्रमांकाच्या पत्नीचा भाऊ कामानिमित्त आला. तो तेथेच राहिला. त्याने २५ ते २८  एप्रिलदरम्यान, पीडितेवर तीनवेळा पाशवी अत्याचार केले. हा प्रकार वाढत गेल्याने पीडितेने तिच्या सावत्र भावाला (पहिल्या आईच्या मुलाला) फोन करून कळविले. त्याने ही घटना चुलत्याला सांगितली. या प्रकरणात उस्‍मानपुरा पोलीस ठाण्‍यता गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी आरोपीची वैद्यकिय तपासणी करायची आहे. गुन्‍हा करतांना आरोपीने परिधान केलेले कपडे जप्‍त करायचे आहेत. गुन्‍ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस  कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.