आपण थाळीवाजवली आणि ती वाजवताना लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला- भारत सासणे

भ्रमीत समाजात ‘चतुरमौन’ : भारत सासणे

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी(उदगीर),२२ एप्रिल /प्रतिनिधी :- अलीकडच्या काळात मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असताना आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे. मराठी बालसाहित्यातून अद्भुतरस हद्दपार केला आहे. आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावे लागत आहे. सत्याचा आग्रह धरणे, सत्याचा उच्चार करणे हे जसे आज गरजेचे आहे त्याचप्रमाणे सत्य निर्भयपणे सांगितले गेले पाहिजे हीदेखील काळाची गरज आहे. समाजात विभाजनवादी निरर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजना वाढविणारा खेळ मांडला जात आहे. सिनेमा तुमचा आणि आमचा असे सांगून कला विभाजित केली जात आहे. तर दुसरीकडे सरस्वतीचे उपासक दु:खी होत आहेत आणि लक्ष्मीची उद्धट उपासना चालली आहे. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे; सर्वत्र चतुर मौन पसरले आहे, असे मत 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी आज व्यक्त केले.
छत्रपती शाहू महाराज सभागृहातील डॉ. ना. य. डोळे व्यासपीठावरून भारत सासणे यांनी अधक्षीय मनोगत व्यक्त केले. सध्याचा काळ, मराठी साहित्याचा हरविलेला चेहरा, साहित्याच्या अभिरूचीला मारक ठरू पाहणारा तुच्छतावाद, संविधानाला अनुसरून भारत घडविला गेला आहे का, सर्वसामान्य माणसाला खरोखच ‘अच्छे दिन’ आले आहेत का, बुद्धिवादाची होत असलेली टिंगल, विभाजनवाद अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सासणे यांनी कलात्मक आणि रूपात्मक पद्धतीने मांडणी करून संयमतेने परामर्श घेतला आहे.
लेखकाने निर्भयपणे सत्य सांगावे ही काळाची गरज !
काळ तर मोठा कठीण आला आहे असा निर्देश करून साहित्यसंमेलनाध्यक्ष म्हणतात, ‘काळा’ने आपल्याला बोटाला धरून वेगवेगळ्या कालखंडातून फिरवून आणले. यंत्रयुग, तंत्रयुग, अणूयुग आणि अवकाशयुग आपण अनुभवले आता आपण ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित, संमोहित झाला आहे. मुख्य म्हणजे त्याची वाचा हरविली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून, व्यापून राहिलेला आहे. या भीतीबद्दल साहित्याने बोलणे, सांगणे अपेक्षित असते.
निर्मिती प्रक्रियेचा ‘आंतरिक अस्वस्थते’शी संबंध असल्याने आपण अस्वस्थ आहोत असे विधान प्रतिभावंत कलावंत करताना दिसतात; मात्र आपण अस्वस्थ का आहोत या प्रश्नाचे उत्तर सहसा मिळत नाही. लेखक या नात्याने, मला देखील हा प्रश्न विचारला गेला आहे. एखाद्या जिवंत ग्रहाच्या अंतर्भागात विविध रसायनांमुळे आणि चुंबकीय वातावरणामुळे जशी वादळं निर्माण होतात, तशीच अस्वस्थ वादळं कलावंताच्या मेंदूत निर्माण होत असतात. ही वादळं म्हणजे ब्रेन स्टॉर्म्स, निर्मितीच्या विविध शक्यता निर्माण करतात. कलावंत अवस्थ असण्याचे हे एक कारण आहे. प्रतिभावंत कलावंत स्वत:ला साक्षीदाराच्या वेदनामयी भूमिकेतून पाहतात. म्हणजे, ‘पाहणारा’ आणि ‘पाहणार्‍यालाही पाहणारा’ अशी ही दुहेरी भूमिका असते. ही भूमिका मोठी वेदनामयी असते. हे साक्षित्व अज्ञेयाकडे अंगुलिनिर्देश करते. निर्मिती प्रक्रियेचा आत्मीय असा एक घटक या नात्याने प्रतिभावंत-कलावंत स्वत:ला अस्वस्थ होताना पाहतात. स्वस्थतेत निर्मितीच्या शक्यता नसतात, म्हणून स्वस्थतेची भीती आणि अस्वस्थतेचे आकर्षण वाटत राहते.
आजच्या मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा आणि हुंकार हरवला आहे!
वृत्तीगांभीर्याने लेखन करणार्‍या चिंतनशील लेखकाला साहित्यांर्गत आणि साहित्यबाह्य विषयांबाबतसुद्धा काहीएक चिंतन मांडावे लागते आणि काहीएक चिंता व्यक्त कराव्या लागतात. या चिंता प्रातिनिधीक स्वरूपात रसिकजाणकारांसमोर मांडताना भारत सासणे म्हणतात, आजच्या मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेलेला आहे. काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेंच्या कवितांमधून, क्वचित तेंडुलकरांच्या नाटकांमधून आणि संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून तसेच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामधून दिसला होता. आता मात्र, हा चेहरा धूसर होतो आहे, हरवतो आहे. मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्य अलिकडे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असताना हा चेहरा दिसेनासा होतो आहे. साहित्याला सामान्य माणसाच्या जगण्याबाबत आस्था वाटाली पाहिजे. जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असेल तर सामान्य माणूस साहित्यदर्शनातून का वगळला जातो आहे हे पाहिले पाहिजे. त्याला पुन्हा एकदा प्रस्थापित करावे लागेल.
सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा आंधळा प्रवास सुरूच असून कोणती तरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. त्याला परिवर्तन हवे आहे. शोषणमुक्त समाज हवा आहे. भ्रष्टाचारातून पिळवटून निघणे नको आहे. पण आपल्या दु:खाचा परिहार कसा होणार हे मात्र त्याला समजलेले नाही. कोणीतरी मसिहा येईल आणि आपली परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल असे त्याला वाटत आहे. पण असा कोणी मसिहा येत नाही आणि त्याचे वाट पाहणे थांबत नाही. सर्वसामान्य माणसाच्या नशिबी केवळ वाट पाहणे आहे. तो भयभीत आहे, त्याच्या भयमुक्तीची घोषणा कधी व कोणत्या पीठावरून केली जाईल याची आपण वाट पाहत आहोत.
साहित्याच्या परिघात एक विचित्र असा तुच्छतावाद निर्माण झाला आहे. हा तुच्छतावाद अनेक वर्षे जोपासला जातो आहे. परप्रकाशित, परभ्रुत आणि इतरांच्या प्रभावळीतील सामान्यवकूब असलेले अनुयायी आपापल्या ठिकाणी घट्ट बसून कथीत तुच्छतावाद आणि प्रदुषण पसरवित राहिलेले असतात ही मात्र चिंतेची बाब म्हणावी लागेल. या तुच्छतावादामुळे मराठी रसिकजनांच्या अभिरूचीचा अपमान होतो आणि मेहनती साहित्यिकांचा अवमान देखील होतो याची सहसा दखल घेतली जात नाही. अशा बेजबाबदार टिंगलीतून आपण मराठी साहित्याचे काही नुकसान करतो आहे याची त्या अनुयायांना जाणीव नसते, कारण त्यांच्या ठायी काही बौद्धिक विकृती निर्माण झालेली असते.


मराठी साहित्यातून अद्भुतरस हद्दपार!
मराठी साहित्यातून आपण अद्भुतरस हद्दपार केला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान यांच्या कोड्यांनी भरलेले, निरस असे झाल्याचे दिसते आहे. लांब नाकाच्या चेटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या यांना कुलूपबंद तळघरात ढकलून दिले आहे. संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडलेली आहे. विशिष्ट वयात अद्भुतरसाचे सेवन ज्या मुलांना करता येते ती मुले बुद्धिमान, प्रतिभावान, तरल कल्पनाशक्तिची देणगी असलेली आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची बनतात, असे बालमानसशास्त्र सांगत आलेले आहे. त्या उलट, अद्भुतरसाचा संपर्क ज्या मुलांच्या मनाशी घडला नाही ती मुले पोटार्थी, शुष्क, अविकसित व्यक्तिमत्त्वाची, अविचारी आणि अरसिक अशी निपजतात.
एखादा समाज किंवा संस्कृती नष्ट करायची असेल तर त्या संस्कृतीची ज्ञानसंपदा नष्ट केली पाहिजे हा दुष्ट विचार इतिहासकालापासून सर्वत्र आढळतो. हल्लेखोरांनी आधी अन्य संस्कृतीची ग्रंथालये नष्ट केली आहेत. आपण मात्र स्वत:च आपली ग्रंथालये स्वहस्ते केविलवाणी, उपेक्षित आणि खिळखिळी करून टाकली आहेत, या बाबत आपण सर्वांनी चिंता वाहिली पाहिजे.
मराठी साहित्य संशोधनातील आजची परिस्थिती निराशाजनक आहे किंवा कसे याबाबत भाष्य करण्याचा मला पुरेसा अधिकार नसला, तरी सामान्य रसिक या नात्याने माझा सवाल असा आहे की, परदेशामध्ये शेक्सपिअर इत्यादी लेखकांची हस्तलिखिते जपून ठेवणे शक्य असेल तर आपण आपल्या ‘मास्टर स्टोरीटेलर्स’ची हस्तलिखिते आणि हस्ताक्षरे का जपून ठेऊ शकलो नाही, असा प्रश्न करून सासणे पुढे म्हणतात या एकूण उदासिनतेबाबत अधिकारी जाणकारांनी बोलले पाहिजे.
काही टीकाकारांनी असे दाखवून दिले आहे की, मराठी साहित्याचे विश्व नेहमीच कर्मठ, स्थितीवादी, आत्मकेंद्री व वास्तवाची दखल न घेणारे असे राहिले आहे. वर्तमानाचे भान नसणे हा मराठी साहित्याचा दोष लक्षात घेता जगात, भारतात व महाराष्ट्रात ज्या महत्त्वाच्या घटना अलिकडे घडल्या त्याचे प्रतिबिंब साहित्यात पडण्याची कितपत शक्यता आहे असा थोडासा टोकदार सवाल आहे. साहित्य आपल्या द्रष्टेपणातून वेळेच्या आधीच आपल्याला इशारे देत असते, ही साहित्याची शक्ती होय.
आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काही एक करूणा वाटते काय हा प्रश्न जुनाच आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावे लागते. अद्यापही मराठी कथेमध्ये करूणास्वरूप असे लिखाण आलेले नसून समाजातला दुर्लक्षित वर्ग मराठी कथेतून सहसा सापडत नाही, या उणिवेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
साहित्याअंतर्गत भाषेचे काही प्रश्न आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवला जातो आहे किंवा नाही याबाबत मराठी साहित्य बोलताना आढळत नाही. आता तर संविधानच बदलण्याची भाषा सुरू आहे. मराठी साहित्यांर्गत या घटनेचे पडसाद बहुदा पडलेले नाहीत.
आजच्या भ्रमयुगात उच्चरवाने आणि निर्भयपणे सत्य कथन केले पाहिजे!
विभाजनवादी छद्मबुद्धीच्या शक्तींचे समाजावर नियंत्रण!
भ्रमयुगाबाबत, फसव्या अशा छद्मयुगाबाबत, चिंतास्पद सद्ययुगाबाबत विस्ताराने सांगताना संमेलनाध्यक्ष भारत सासणे म्हणाले, आपण छद्मबुद्धी विद्ध्वंसकांच्या ताब्यामध्ये जात आहोत असे संकेत मिळायला लागले आहेत. हे विद्ध्वंसक आपल्या पुढील पिढीच्या मुलांच्या हातात कोणता भिकेचा कटोरा देणार आहेत, याचा फक्त अंदाजच करता येतो. पण नांदी तर झालेलीच आहे. आपण थाळी वाजविली आणि ती वाजविताना लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला होता. थाळी वाजविण्याचे भीषण संदर्भ खरेतर राज्यकर्त्यांनासुद्धा माहिती नाहीत.
समाजात विभाजनवादी निरर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजना वाढविणारा खेळ मांडला जातो आहे. कला विभाजित झाली आहे. सर्वत्र उपद्रव आणि उन्मादाचा उच्छाद मांडला आहे. सर्वत्र दडे बसविणारी शांतता आहे, कोणीच बोलत नाही, कोणीच हरकत घेत नाही, सर्वत्र चतुर मौन पसरले आहे. या मौनात स्वार्थ आहे, तुच्छता आहे, हिशोब आणि व्यवहार देखील आहे. याच बरोबरीने सामान्य जनतेच्या दु:खाला चिरडणे आहे, भीती, दहशत, प्रलोभने आणि विनाशदेखील आहे.
काही विचारवंत आता दबल्या आवाजात असे सांगत आहेत की, सध्या विषमता वाढू लागली आहे. गरीब लोक आता दरिद्री होत आहेत, श्रीमंत लोक अतिश्रीमंत होत आहेत. मध्यमवर्ग वेगाने विभाजित होत आहे. तो कनिष्ठ मध्यमवर्गात ढकलला जात आहे. दरी वाढते आहे. कदाचित पुढे जाऊन आर्थिक दुर्बल घटक आर्थिकदृष्ट्या बरी परिस्थिती असलेल्या समाजवर्गावर आक्रमण सुरू करेल. त्यातून हळूहळू गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल.
लेखकाने सत्य बोलले पाहिजे आणि निर्भयतने बोलले पाहिजे असेही साहित्य सांगते. सत्याचा आग्रह, सत्याचा उच्चार ही तर काळाची गरज आहेच आणि सत्य निर्भयपणे सांगितले पाहिजे ही देखील काळाची गरज आहे. मात्र, उच्चरवाने सत्याचा उच्चार का करावा लागतो याबाबत लेखकाने आपल्याला काही एक सांगून ठेवले आहे. सत्य आपले कथन उच्चारित राहत असते. ऐकण्याचा कान मात्र पाहिजे, कारण हा विवेकाचा आवाज आहे. तसेच कोलाहलात हा आवाज उच्चरवाने देखील उच्चारला गेला पाहिजे, जरी तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी. द्रष्टा लेखक असे सांगत राहतो. आपण पाहिले, ऐकले पाहिजे हे मात्र खरे.
काही निर्बुद्ध उपासक छद्मरूपाने समाजाला छळण्यासाठी वावरत आहेत. हे सगळे बहुरूपी उपासक आहेत. ते दुष्टबुद्धी, क्षुद्रबुद्धी आणि छद्मबुद्धी आहेत. त्यांना सूड उगवायचा आहे. कधी ते संस्कृतीरक्षक होतात, कधी ते अभिमानी राष्ट्रभक्त होतात, कधी ते ज्योतिषी होतात, कधी ते भाष्यकार होतात तर कधी राजकीय विश्लेषक होतात, टोप्या बदलतात. याचे कारण ते आधीच विकले गेलेले आहेत.
श्रेयासाठी सतत चालेल्या लढाईकडे बघून सामान्य माणसाची स्थिती उद्याची पहाट सुंदर असेल या आश्वासनांवर विश्वास ठेवायला नको म्हणते आहे. कारण उद्याची पहाट उजाडणारी नसते, उद्याचा दिवस येतच नसतो. सामान्य माणसाच्या या परिस्थितीकडे लेखक फक्त हताशतेने पाहतो आहे.
लेखकाला भोवताल अस्वस्थ करतो आहे. लेखक बघतो आहे, पाहतो आहे आणि समजून घेतो आहे, त्याला जाणवते आहे, तो सहकंपित होतो आहे. जीवनाची एकात्मता साहित्याला अंकित करीत असते आणि साहित्याच्या परिघात सर्वदूर पसरलेला आणि मातीशी इमान राखणारा सामान्य माणूस समाविष्ट असतो. त्यामुळे साहित्य सामान्यांबद्दल आस्था बाळगून असते, त्यांची वेदना समजून घेणारे असते, त्यांच्याशी जोडणारेही असते. बुद्धिवाद्यांची आणि बुद्धिजीवींची आणि परिणामत: बुद्धिवादाची होणारी टिंगल लेखक पाहतो आहे. सरस्वतीचा अपमान आणि लक्ष्मीचे पूजन तो पाहतो आहे. राज्यकर्त्यांच्या हाताला पैसे मोजून घट्टे पडतात आणि त्यामुळे हळूवार स्पर्श समजेनासा होतो असे काही झाले आहे का, असे लेखक स्वत:ला विचारत आहे. याच बरोबरीने हताश बुद्धिवाद्यांची स्थलांतरे किंवा त्यांचे मौनात जाणेदेखील तो पाहतो आहे.
एक देश, एक भाषा, एक पुस्तक, एक संस्कृती असे काहीसे कुणीतरी म्हणते आहे. लेखकाला मात्र यात ‘मेथड इन मॅडनेस’चा वास येतो आहे. पण हा केवळ मॅडनेस नाही तर विचारपूर्वक केलेले चिथावणीखोर विधानदेखील आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन संस्कृती अस्तित्वात नाही ते धर्मही नाहीत असेलच तर पंथ आहेत असेही कुणीतरी म्हणतो आहे. हे सर्व ऐकून चकित होणारे लोक संस्कृतीची व्याख्या वगैरे शोधू लागले आहेत. लेखक मात्र व्याख्या इत्यादीच्या घोटाळ्यात पडत नाही. त्याला बगलेमध्ये लपविलेली सुरी नेमकी दिसत आहे.
तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा ‘अच्छे दिवस’ येतील, असा विश्वास वाटतो. लेखकाने आशावादी असणे त्याला क्रमप्राप्त आहे आणि त्याला दुसरा कोणता तरणोपाय देखील नाही. आशावादी असणे ही त्याची अपरिहार्यता देखील आहे. आशावादी असणे या व्यतिरिक्त तो दुसरे काय करू शकतो?

९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कांदबरीकार भारत सासणे यांचा  विभाजनवादी नवसंस्कृतीवर कडाडून प्रहार

भारत सासणे यांचे पूर्ण भाषण 

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष या नात्याने आपणाशी बोलताना मला अतिशय आनंद होतो आहे. उद्गीर येथे होणाऱ्या या साहित्यसंमेलनाचे उद्घाटक  शरदचंद्र पवार, या संमेलनाचे प्रमुख पाहुणे आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त दामोदर मावजो, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री  अमित देशमुख, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उदयगिरी महाविद्यालय येथे भरणाऱ्या या संमेलनाचे संयोजकप्रमुख बसवराज पाटील-नागराळकर, रामचंद्र तिरुके व त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित असलेले प्रख्यात संगीतकार  हृदयनाथ मंगेशकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष  कौतिकराव ठाले-पाटील, श्रीमती उषा तांबे, मिलिंद जोशी,  मनोहरराव म्हैसाळकर, त्यांचे सर्व पदाधिकारी, मंचावर उपस्थित असलेले अन्य मान्यवर, त्याचप्रमाणे या संमेलनासाठी उपस्थित असलेले आपण सर्व गुणीजन, जाणकार साहित्यप्रेमी रसिकमित्र, या सर्वांना प्रणाम करून मी निवेदनाची सुरूवात करतो आहे.मित्रहो! हे संमेलन उदगीर येथे भरवलं जातं आहे. हे ठिकाण मैत्रीचा व प्रेमाचा संदेश प्रसारित करणारं ठिकाण आहे. येथे पाच ते सहा भाषा बोलल्या जातात. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्द, कन्नड व तेलगू इतक्या भाषा बोलणारा समाज येथे एकत्रितपणे व आनंदाने राहतो आहे. त्यांच्यामध्ये कोणताही भाषिक संघर्ष नाही. आजच्या काळातली ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आजच्या विद्वेषवृद्धिच्या काळात हा संदेश आपल्या सर्वांना तारक आहे. भारतीय संविधानाच्या मूळ प्रतींपैकी एक प्रत उदयगिरी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आदराने जपून ठेवलेली आहे, ही विशेष आनंददायी बाब. या ठिकाणी तिरंग्याचं कापड बनवलं जातं हीसुद्धा आदराची बाब. अशा ठिकाणी वास्तव्य करीत असलेल्या आणि वैचारिक जागृती प्राप्त केलेल्या समाजासमोर तसेच महाराष्ट्रभराच्या ठिकठिकाणाहून आलेल्या व महाराष्ट्राबाहेरूनदेखील आलेल्या रसिकांसमोर बोलताना मला विलक्षण आनंद होतो आहे.उदयगिरी अर्थात उद्गीरचं ऐतिहासिक व सामाजिक असं महत्त्व यापूर्वीच अधोरेखित झालेलं आहे. सन १७६० मध्ये येथे निजाम विरूद्ध मराठे यांच्यात लढाई झालेली आहे. सदाशिवभाऊंनी निजामाचा पराभव केला आणि पानिपतच्या लढाईच्या पूर्वतयारीची सुरूवात उदगीरपासूनच झालेली आहे.
परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थांच्या प्रेरणेने आणि बाबासाहेब परांजपे यांच्या ध्येयनिष्ठेतून महाराष्ट्र एज्युकेशन संस्था उभी राहिलेली आहे. नीतिमान समाज घडावा यासाठी ही संस्था व्रतस्थपणे कार्य करीत आहे आणि आता या संस्थेचे हे हिरक महोत्सवी वर्ष. प्राचार्य ना.य. डोळे यांनी येथे जे शैक्षणिक कार्य उभं केलं त्या कार्याला मी वंदन करतो.हे संमेलन मराठवाड्यात भरतं आहे. मराठी भाषा इथे जन्मलेली आहे. मराठवाड्यातील सुविख्यात संतपरंपरे​​ला  मी प्रणाम करतो. मराठवाड्याला विचारवंतांची परंपरा आहे. नरहर कुरूंदकर, सेतूमाधवराव पगडी, बी. रघुनाथ, न.शे. पोहनेरकर, भगवंत देशमुख, अनंत भालेराव इत्यादी सर्व गद्य-पद्य लेखक विचारवंतांचं आदरपूर्वक स्मरण करतो.

) काळ तर मोठा कठीण आला…मित्रहो, काळ तर मोठा कठीण आला असं विषादपूर्वविधान काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिंतनशील लेखकाने नोंदवून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात ‘काळ’ ही भव्य संकल्पना आपल्या चिंतनपरंपरेमध्ये आपण स्विकारलेली आहे. भर्तृहरीने असं म्हटलं आहे की, दिवस-रात्रीच्या एका आड एक असलेल्या काळ्या-पांढऱ्या चौकटींवर, स्त्री-पुरूषांचे विविध मोहरे फेकून त्यांचा चालू असलेला प्रारब्धविषयक खेळ ‘काळ’ स्वतःच पाहत रमत बसलेला असतो. मला स्वतःला भर्तृहरीची ही कल्पना भव्य आणि थरारक वाटलेली आहे. ही संकल्पना आपल्याला अंतर्मुख करते. स्वतः काळच कर्ता आणि भोक्ता असेल तर सामान्य माणूस कोण आहे असा प्रश्न यातून निर्माण होतो. साहित्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं-द्यावं लागणार असतं.आपल्या सर्वांना माहीत आहे की बोटाला धरून ‘काळा’ने आपल्याला हळूहळू वेगवेगळ्या कालखंडातून फिरवून आणलेलं आहे. आपण यंत्रयुग अनुभवलं. त्यानंतर तंत्रयुग अनुभवलं. अणूयुग आणि अवकाशयुग अनुभवलं. आणि आता आपण ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित झालेला आहे, संमोहित झालेला आहे. मुख्य म्हणजे त्याची वाचा हरवलेली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून, व्यापून राहिलेला आहे. या भीतिबद्दल साहित्याने बोलणं, सांगणं अपेक्षित असतं. याबाबत आधीपासूनच साहित्याने वेळोवेळी काहीएक सूचन केलेलं आहे. त्याबद्दल मी आपणाशी थोडं सविस्तर असं, परंतु या निवेदनाच्या उत्तरार्धात बोलणार आहे.

3) लेखक का लिहितो, अर्थात निर्मितीप्रक्रियातत्पूर्वी, लेखक का लिहितो याची थोडी चर्चा करूयात.आपली व्यक्त होण्याची इच्छा थेट अमूर्तातल्या सर्जनाशी संबंधित आहे याची प्रत्यक्ष जाणीव लेखकाला होण्यापूर्वी लेखक काहीएक ‘अस्वस्थतेच्या भावावस्थे’तून जात राहतो. ही अस्वस्थता त्याला घडवित असते आणि सर्जनाच्या वाटेवर नेऊन ठेवीत असते.निर्मिती प्रक्रियेचा ‘आंतरिक अस्वस्थते’शी संबंध असल्यामुळे ‘आपण अस्वस्थ आहोत’ असं विधान प्रतिभावान कलावंत करताना दिसतात, मात्र आपण अस्वस्थ का आहोत या प्रश्नाचं उत्तर सहसा मिळत नाही. लेखक या नात्याने, मला देखील हा प्रश्न विचारला गेला आहे आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ___ एखाद्या जिवंत ग्रहाच्या अंतर्भागात विविध रसायनांमुळे आणि चुंबकीय वातावरणामुळे जशी वादळ निर्माण होत राहतात, तशीच अस्वस्थ वादळं कलावंताच्या मेंदूत निर्माण होत असतात. ही वादळं म्हणजे ब्रेन स्टॉर्मस, निर्मितीच्या विविध शक्यता निर्माण करतात. कलावंत अस्वस्थ असण्याचं हे एक कारण आहे.___ जे अमूर्तात आहे, ते ओढून आणून प्रकट करण्यासाठी कलावंताला अक्षय अशी ऊर्जा व्यतीत करावी लागते. जे जाणवतं, ते एखाद्या माध्यमातून प्रकट करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कलावंताची सुटका नसते. हा एक अटळ असा शाप कलावंताने किंवा लेखकाने आपल्या भाळी स्वीकारलेला असतो. जाणवतं, ते व्यक्त करणं सोपं नसतं. अनेकदा ते अव्यक्तातून व्यक्त होतं. स्वत:हून लादून घेतलेल्या छळवादातून सुटका व्हावी, असं कलावंताला कधी वाटतं का हा प्रश्न आहे. जगभरच्या प्रतिभावंतांनी असे अनुभव नोंदविलेले आहेत. प्रतिभावंत-कलावंत-स्वत:ला साक्षीदाराच्या वेदनामयी भूमिकेतून पाहतात. म्हणजे, ‘पाहणारा’ आणि ‘पाहणाऱ्यालाही पाहणारा’ अशी ही दुहेरी भूमिका असते. ही भूमिका मोठी वेदनामयी असते. हे साक्षित्व अज्ञेयाकडे अंगुलिनिर्देश करतं. निर्मिती प्रक्रियेचा आत्मीय असा एक घटक या नात्याने प्रतिभावंत-कलावंत स्वतःला अस्वस्थ होताना पाहतात. स्वस्थतेत निर्मितीच्या शक्यता नसतात, म्हणून त्याला, त्यामुळे स्वस्थतेची भीती आणि अस्वस्थतेचं आकर्षण वाटत राहतं.साधनेच्या काळात लेखक अस्वस्थ भावदशेतून प्रवास करतो. तो स्वत:तल्या अस्वस्थतेच्या ‘टोकदार शिंगाच्या बैलाशी’ झुंज देतो. हेमिंग्वेचं ‘बुल फायटिंग’चं वर्णन म्हणजे कविता आहे, असं म्हणतात. पण ते निर्मितिप्रक्रियेचंही अस्वस्थ असं वर्णन आहे. साहित्यिक त्या ‘बैला’च्या शिंगानं जखमी होतो. जास्त नेमका शब्द ‘घायाळ’ असा आहे. अस्वस्थतेकडून घायाळ झालेला साहित्यिक काही विलक्षण असं निर्माण करू पाहतो.
सर्वदूर पसरलेल्या आणि प्रारब्धाच्या खेळामध्ये अडकलेल्या संघर्षरत सामान्य माणसाला साहित्यिक पाहत असतो. ‘नरदेहाच्या साफल्या बद्दल’ साहित्यिक प्रश्न विचारतो. माणसाला किडामुंगीसारखं जगताना पाहतो. ही सगळी ‘महामायेची क्रीडा’ आहे, असं त्याला सांगितलं जातं आणि माणसाच्या जीवित हेतूबद्दल लेखकाला कोडं पडतं. हे कोडं जगण्याच्या जटिल जाळ्याबद्दलचं आहे. हे कोडं सोडवताना लेखकाला स्वतःतल्या ‘टोकदार शिंगाच्या अस्वस्थ बैला’बरोबर झुंज द्यावी लागते. पिंजऱ्यात अडकलेल्या चित्त्याच्या अस्वस्थ फेऱ्यांमधली स्फोटकं मेंदूत घेऊन त्याला वावरावं लागतं. माणसाशी नाळ जोडणाऱ्या निर्मितीची आव्हानं तो स्वीकारतो आणि अस्वस्थ होतो. लेखकाच्या अस्वस्थ असण्याची अशी काही कारणं आहेत. अस्वस्थता हे लेखकाला मिळालेलं वरदानच असतं. याच अस्वस्थतेच्या काळात लेखकाच्या अबोध मनातून साहित्यकृतीची निर्मिती होत असते. लेखक निवांत झाला, रिलॅक्स झाला की तो संपुष्टात येतो. म्हणून अस्वस्थतेचा काळ हा ‘साधना काळ’च मानलाजातो.

४) लेखनाचं प्रयोजनआपल्या लेखनाच्या अपरिहार्यतेबाबत अनेक प्रतिभावंतांनी साक्षी नोंदविलेल्या आहेत. कोणताही लेखक लिहितो तेव्हा त्याला काही तरी अपार आणि अनिवार असं सांगायचं असतं. जे काही सांगायचं आहे ते अपरिहार्य होऊन प्रकट होऊ लागतं तेव्हा लेखन केल्याशिवाय साहित्यिकाला-लेखकाला दुसरा पर्याय उरत नाही. जे उतरून येतं त्याला अनेकांनी ‘प्रतिभेचं अवतरण’ असं म्हटलं आहे. अचानक खूप जोराने वारा वाहतो व दारेखिडक्या थरथरू लागतात याला बा.भ. बोरकर ‘आला अद्भुत वारा’ असं म्हणतात. हे प्रतिभेचं अवतरणंच आहे. प्रतिभावंतांनी आपल्या अंतर्गत असलेल्या व ‘कोठून तरी येणाऱ्या’ अनिवार्य ऊर्जेच्या प्रकटीकरणाबाबत असंच काही नोंदवून ठेवलं आहे. संतकवींच्या साक्षी देखील निर्मितीप्रक्रियेबाबत बोलतात. मोत्याची माळ जशी गुंफली जावी तशी अक्षरे एकामागोमाग एक अनावरपणे उमटत आहेत असं संत रामदास यांनी म्हटलं आहे, तर कविता झऱ्यासारखी, त्यातल्या पाण्यासारखी सरसर वाहते आहे असं तुलसीदास यांनी लिहून ठेवलं आहे. जे सांगायचं आहे ते सांगणं विविध माध्यमातून प्रकट होऊ लागलं की त्या प्रकटीकरणाबद्दल प्रतिभावान मंडळी आपले अनुभव नोंदवतात. बुधकौशिकऋषीने देखील स्वप्नातून कविता स्फुरली असं रामरक्षेच्या संदर्भात लिहून ठेवलं आहे.आत्मोद्गार अपरिहार्य होऊन प्रकटू लागतो तेव्हा चांगल्या किंवा श्रेष्ठ कलाकृतीचा जन्म होतो. बहुधा असा आत्मोद्गार सहकंपातून निर्माण होतो. भोवताली, अनेक
पातळ्यांवरून, अनेक पद्धतीने, अनेक प्रकारे संघर्ष करीत जगत राहणाऱ्या जीवांकडे पाहून जी काही एक वैश्विक करूणा निर्माण होत असेल त्या करूणेतून काहीएक प्रेरणा घेऊन लेखक लिहायला लागतो व अनेकांच्या वेदना स्वीकारून आणि सहकंपित होऊन जीवनदर्शी लेखन करतो. चिंतनशील व प्रामाणिक अशा लेखकाचं हे असं भागधेय असतं. मनोरंजन किंवा बुद्धिरंजन हा लेखनाचा मग हेतू उरत नाही, तर सर्वसामान्य माणसाचा शोध हा हेतू लेखनामागे शिल्लक राहतो. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अशा माणसाचा शोध घेणं माझ्या लेखनाचं प्रयोजन आहे.

५) लेखकाच्या वाङ्मयीन निष्ठासाधना काळातच लेखकाच्या वाङ्मयीन निष्ठा निश्चित होतात. वाङ्मयीन निष्ठा निर्वात पोकळीतून येत नसतात. लेखकाच्या जीवननिष्ठा वाङ्मयीन निष्ठेत रूपांतरित व्हाव्या लागतात. तुमच्या भोवती अनेक स्तरावरचा जो काही समाज पसरलेला आहे त्या समाजाशी काहीएक बांधिलकी तुमच्या मनात निर्माण होते आहे काय हा कळीचा प्रश्न असतो. सर्वदूर पसरलेला सर्वसामान्य माणूस तुमच्या आस्थेचा विषय होतो किंवा कसं हे पाहणं गरजेचं असतं. जीवननिष्ठा नैतिकतेशी सुद्धा संबंधित असतात.

६) मूल्यांची उपासनालेखकाने शाश्वत आणि अशाश्वत मूल्यांबाबत चिंतन करणं गरजेचं असतं. याचं कारण असं की अंतिमतः, लेखकाला शाश्वत मूल्यांचा अंगिकार करावा लागतो. मानसशास्त्राने अंतर्मुखी आणि बर्हिमुखी प्रवृत्ती सांगितलेल्या आहेतच. बुद्धिमान समीक्षकांनी देखील आंतरवर्तुळातील साहित्य व बर्हिवर्तुळातील साहित्य असे दोन भेद साहित्याच्या संदर्भात केलेले आहेत. आता, या दोन वर्तुळक्षेत्रामध्ये जीवनाशी संबंधित असे कोणकोणते घटक समाविष्ट होतात याचा लेखकाला शोध घ्यावा लागतो. अंतःस्फूर्ती, प्रेरणा, सहानुभूती, दया, क्षमा, त्याग, सेवा, प्रेम नावाची अमूर्त वस्तू, मानवता व अंतिमतः ईश्वर, असे काही घटक आंतरवर्तुळातील साहित्यात समाविष्ट होताना दिसतात. या घटकांची यादी आणखी सूक्ष्म व विस्तारीत होऊ शकते. ही सगळी चिरंतन मूल्ये आहेत. त्याउलट, बर्हिमुखी साहित्याच्या वर्तुळात युद्ध, रक्तपिपासा, सत्तासंघर्ष, उपासमार, मारामाऱ्या, भावनिक व शारीरिक शोषण, राजकारण, विश्वासघात, दारिद्र्य, बेकारी, जगण्याबाबतच्या चिंता, लैंगिक क्रौर्य आणि विकृती तसेच ईश्वराला नाकारणे इत्यादी घटक समाविष्ट होताना दिसतात.
आंतरवर्तुळातील घटक आणि बाह्यवर्तुळातील घटक या दोन्हींचा लेखकाला साकल्याने विचार करावा लागतो. त्याची लेखणी, त्याचा अंतःस्वभाव कोणत्या वर्तुळाशी जास्त जोडला जातो आहे हे पाहून त्याला आत्मप्रकटीकरण करावं लागतं. हे करीत असताना ‘वास्तव’ नावाच्या एका अवघड अशा गुंत्याशी सामना करावा लागतो. एखाद्याचे लेखन वास्तववादी आहे की नाही असं सहजच ठरविलं जात असलं तरी लेखकाला स्वतःला मात्र वास्तव नावाच्या अमूर्त कोड्याची सोडवणूक करण्यात शक्तीचा व्यय करावा लागतो.

७)वास्तववास्तववादी साहित्य म्हणून एक प्रकार साहित्यात अस्तित्वात आहे. तुमचं लेखन वास्तववादी असलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह लेखकाच्या भोवती धरला जातो. वास्तववाद म्हणजे काय याबाबतच्या व्याख्या मात्र वेगवेगळ्या असू शकतात. आपल्या साधनाकाळातच लेखकाने वास्तवाचा हा गुंता सोडवणं हितकारक असतं. एकच एक वास्तव कधीच अस्तित्वात नसतं. एकाचं वास्तव दुसऱ्याचं स्वप्न असू शकतं. त्यामुळे वास्तव व्यक्तिसापेक्ष असतं याची जाणवी लेखकाने ठेवणं गरजेचं असतं. वास्तव बदलत राहतं आणि मुळातून ते बदलतसुद्धा नाही. उदाहरणार्थ चिरंतन मूल्यं किंवा ईश्वरी सत्ता बदलत नाही. समाज बदलतो, मान्यता बदलतात, गरीबी आणि श्रीमंती येते आणि जाते, बेकारी वाढते आणि कमी होते. या बदलत्या वास्तवाची साहित्याने दखल घ्यायची असते.

८) लेखकाचा साधनाकालसामान्य माणसाचं दुःख प्रतिबिंबित करण्याची साहित्याची प्रतिज्ञा असेल तर सामान्य माणूस लेखनप्रेरणेचा केंद्रबिंदू मानावा लागतो हे तथ्य साधनाकाळातच लेखकाने स्वीकृत केलेलं बरं. लेखकासाठी सर्वसामान्य माणूस हा नेहमीच आस्थेचा आणि कुतुहलाचा विषय राहिलेला आहे. लेखकाला सर्वसामान्य माणसाच्या शोधाबाबत आस्था असावी लागते. त्याच्या जगण्याबद्दल, त्याच्या छोट्या छोट्या लढायांबद्दल आस्था बाळगावी लागते. सर्वसामान्य माणसाच्या संभ्रमावस्थेतबाबत कुतूहल लेखकाला चिंतनशील बनवतं. सामान्य माणसाच्या दुःखाचा परिहार कसा होऊ शकेल याबाबत काहीएक चिंतन लेखकाला उपकारक ठरून श्रेष्ठत्वाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी साहाय्यभूत ठरतं.साधनेचा काळ ‘स्व’च्या केंद्राशी स्वतःला जोडून घेण्याचा काळ आहे. आत्मनिष्ठा या काळात स्पष्ट व्हाव्या लागतात. मूल्यांची उपासना चालू असताना जीवननिष्ठांचे वाङ्मयीन
निष्ठांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयास देखील करावा लागतो. परिणामतः, आशय पुढे व शब्द मागे अशी अवस्था निर्माण होते. अर्थात, शब्दांच्या छटा, अर्थांच्या छटा इत्यादी विभ्रम आत्मसात होतात. हा उत्तम अशा वाचनाचा आणि बहुश्रुत होण्याचा काळ आहे. काव्यातली ‘सूक्ष्मता’ साधनाकाळातच सापडली तर ‘ऋतंभरा प्रज्ञा’ जागृत होऊ शकते. कवितेत सूक्ष्म रूपाने दडलेलं अध्यात्म साधनाकाळातच लेखकाला आकषून घेतं. हा नाजूक साधनाकाळ व्यर्थ दवडणं लेखकाला परवडत नाही.लेखकाला स्वतःशी आणि स्वतःच्या निष्ठांशी प्रामाणिक राहावं लागतं. हा त्याचा प्रामाणिकपणाचा काळ साधनाकाळातच सुरू होतो. अंगावर कोसळणाऱ्या व्यर्थ प्रलोभनापासून लेखकाने स्वतःला कसं वाचवावं याबाबतची पूर्वतयारी साधनाकाळातच होणं इष्ट. लेखकाला आकाश प्रतिबिंबित करावयाचं असतं. लेखकाला विशाल अशा जीवनाचा पट आपल्या लेखनामध्ये बद्ध करावयाचा असतो. सभोवताली सर्वदूर पसरलेल्या नातेसंबंधांचं अमूर्त जाळं त्याला समजून घ्यावयाचं असतं. जीवनातील रहस्यवादाच्या काठावर त्याला येऊन पोहोचायचं असतं. हे सर्वकाही करण्यासाठी लेखकाला कळत आणि नकळतपणे आपला साधनाकाळ समृद्ध करावा लागतो. हे ज्याला जमतं तो सिद्धतेच्या वाटेने जातोच. तत्पूर्वी अर्थात, साधनाकाळातील सृजनाच्या वेदना त्याला सहन कराव्या लागतात. म्हणून, साधनावस्थेला मी ‘टोकदार शिंगाच्या बैलाशी दिलेली झुंज’ असं म्हणत आलेलो आहे. साधनावस्था ही दुर्मिळ अशी संधी आहे याची जाणीव लेखकाने ठेवलेली बरी. ___माझं लेखन जीवनाच्या चिरंतन मूल्यांशी जवळीक साधतं आहे असं लक्षात आल्यानंतर व त्यामुळे आपलं लेखन कदाचित श्रेष्ठ दर्जाचंसुद्धा होऊ लागलं आहे असं लक्षात आल्यानंतर त्यातल्या जबाबदारीची जाणीव होऊन मी त्वरेने सजग होऊन गेलो आहे. स्वतःला उन्मत्त होऊ न देण्याची ही दुर्मिळ अशी संधी त्या निमित्ताने मला प्राप्त झाली, हे माझं भाग्य.

९) लेखकाची ‘बांधिलकी’आपण का लिहितो याची काहीएक जाण अंतःकरणात निर्माण झाली असेल आणि कोणासाठी लिहायचं आहे हे स्पष्ट झाले असेल तर येथून पुढे लेखकाच्या अडचणींची सुरूवात होते. सर्वसामान्य माणसांच्या जीवनव्यवस्थेतील छोट्या छोट्या लढायांबाबत लेखक आस्था बाळगतो तेव्हा तो थोडा स्थिर झालेला असतो. साहित्यक्षेत्रात परिचितही झालेला असतो. येथून पुढे मग ‘व्यवस्था’ तुम्हाला ‘कमिट’ होण्याचा आग्रह धरू लागते. तुम्हाला कथित “सामाजिक बांधिलकी’ आहे किंवा नाही याबाबतची एक झाडाझडती एव्हाना होऊनगेलेली असते. त्यानंतर लेखकावर दबाव वाढू लागतो. त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विचारले जाणारे प्रश्न उद्धट सुद्धा असता. अहोऽ, कोण आहात तुम्ही? तुम्ही व्यवस्थाविरोधी आहात काय? की व्यवस्थेचे समर्थक आहात? तुम्ही कोणत्या ग्रुपचे आहात ? तुम्ही कोणत्या कळपामध्ये जाऊन पोहोचला आहात? प्रश्नांचा हा असा गलबला असला तरी लेखकाला स्वतःच्या अंतःप्रकाशात आपली स्वतःची वाट स्वतःच शोधावी लागते, आणि त्याची किंमत ही मोजावी लागते.कलाकृती ही ‘कलाकृती’ असल्यास त्याकडे कलाकृती म्हणून पाहिलं पाहिजे असं कोण्या जाणकार समिक्षकाने म्हटलं आहे. आपल्या अपेक्षांचं ओझं लेखकावर आणि कलाकृतीवरही लादणं योग्य नसतं, याचा विचार सहसा कोणी करतांना दिसत नाही. लेखकाला हे ‘अडाणी ओझं संत्रस्त करू शकतं. आपल्या निर्मितीच्या प्रक्रियेत अशा अपेक्षा अडकाठी ठरणार नाहीत याची काळजी त्याला घ्यावी लागते. पण मग लेखकाची बांधिलकी कोणती, हा प्रश्न शिल्लक राहतोच. मी स्वतः, सामान्य माणसाला लेखनाचा केंद्रबिंदू मानतो. ज्या मातीशी त्याची नाळ जुळलेली असते आणि ज्या नाळेतून त्याला जीवनरस प्राप्त होतो त्या नाळेशी माझी बांधिलकी आहे.

१०) मी आणि माझं लेखनप्रदीर्घ कालावधीपासून मी लेखन करतो आहे. लघुकथा, दीर्घकथा, लघुकादंबरीकादंबरी, नाटक, बालसाहित्य, ललितलेख इत्यादी विविध साहित्यप्रकारातून आणि माध्यमातून मी स्वतःला प्रकट करीत आलो आहे. या लेखनामुळे मला रसिकमान्यता आणि राजमान्यता प्राप्त झाली. आजपर्यंत माझी जवळपास ३९ पुस्तकं प्रकाशित झाली असून त्या पुस्तकांना विविध सन्मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. हे सन्मान स्विकारतांना, ‘तुम्ही का लिहिता?’ अशा सैद्धांतिक प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. असे प्रश्न लेखकाला विचारात पाडतात. हा प्रश्न व्यापक करून लेखक मुळातून का लिहितो याबाबत उत्तर देण्याची मग लेखकावर जबाबदारीही येऊन पडते.विविध साहित्यप्रकारांना मी यथाशक्ती स्पर्श केला असला तरी सुरूवातीस मी _ ‘लघुकथाकार’ म्हणून ओळखला गेलो व नंतर ‘दीर्घकथाकार’ म्हणून माझी ओळख निश्चित झाली. लघुकथेचा चेहरामोहरा कसकसा बदलत गेला इत्यादी संदर्भात इथे काही सांगणं अभिप्रेत नाही. तथापि लघुकथेच्या विकासातल्या टप्प्यातली सहसा न नोंदवलेली एक घटना येथे सांगावयाची आहे. लघुकथा स्वातंत्र्यपूर्वकाळामध्ये समूहवादी होती. समाजाच्या विघटनानंतर व एकत्र कुटुंबव्यवस्थेतून माणसं वेगवेगळी होऊ लागल्यानंतर, माणसाच्या
मनावर जे नैतिक ताण निर्माण झाले, त्या ताणांचं प्रतिबिंब मनोविश्लषणात्मक कथांमधून उमटू लागलं व कथा व्यक्तिवादी, व्यक्तिकेंद्री झाली. आता पुन्हा लंबक हेलकावे खातो आहे. लघुकथा पुन्हा समूहवादी होऊ लागलेली आहे.लघुकथा हा दुय्यम साहित्यप्रकार आहे किंवा क्षुद्र साहित्यप्रकार आहे, अशा आशयाची टीका झालेली आहे. या टिकेचा एक मानसशास्त्रीय परिणाम असा झाला की, काही लिहिते लघुकथाकार लघुकथा लिहिता-लिहिता थबकले, थांबले आणि त्यांनी आपला मोर्चा कादंबरीकडे वळवला आहे. यातून कादंबरीविश्वाचं भलं झालं की नाही हा संशोधनाचा विषय असला तरी, लघुकथेच्या क्षेत्राचं मात्र नुकसान झालेलं आहे. याच काळात मी मात्र काहीएक निष्ठेने आणि लघुकथेच्या आंतरिक शक्तीवर श्रद्धा ठेवून कथा आणि दीर्घकथा लिहीत राहिलो.कथा आणि दीर्घकथा म्लान अवस्थेत पोहोचली होती, तेव्हा लघुकथेबरोबरच मी, सातत्याने दीर्घकथा लिहीत राहिलो. माझे पूर्वसूरी दीर्घकथा लिहीत राहिले होते, पण त्यानंतर मात्र दीर्घकथेचं सातत्य टिकलेलं नव्हतं. अशा अवस्थेत माझ्या लेखनामुळे दीर्घकथेच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये नवचैतन्य निर्माण झालं अशी चर्चा तुम्हां समीक्षकांनीच केलेली आहे. म्हणजे येथे आत्मप्रौढीचा प्रश्न उद्भवत नाही.माझ्या मते सन १९८० ते १९९० हा कालखंड अतिशय संवेदनशील, महत्वाचा व काही प्रमाणात सगळीकडेच उलथापालथ करणारा असा होता. कथेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कथेमध्ये आलेली मरगळ कथाकारांना जाणवत होती. कथा स्तब्ध आणि ग्लानीग्रस्त झाल्यामुळे लघुकथा म्हणून जो कोणता रूढ असा आकृतीबंध परंपरेने स्विकारला होता, तो आकृतीबंध मोडून काढण्याची आवश्यकता कथाकारांना वाटायला लागली होती. जागतिकीकरणाबद्दल याच सुमाराला चर्चा सुरू झालेली आहे. या अस्वस्थ कालखंडात जी कथा लिहिली गेली ती नव्या रूपात पुढच्या दशकात म्हणजे सन १९९० नंतर आपल्याला भेटते. आपल्या सशक्त अभिव्यक्तिने कथेला आधुनकि असे रूप प्रदान करणाऱ्या या कालखंडातील लेखकांची यादी सुप्रसिद्ध आहे. स्थानभयास्तव ही यादी विस्ताराने देता येणार नसली तरी त्यांच्या योगदानाचे मी आदरपूर्वक स्मरण करीत आहे. याच काळात साहित्यातील दलित, ग्रामीण, इत्यादी प्रवाह सशक्त झालेले आहेत.सन १९९० ते आजपर्यंतची कथा कोणत्या स्वभाववैशिष्ट्यासह आपल्याला भेटते हा उत्सुकतेचा विषय. सन १९९० नंतरच्या प्रमुख व गुणवान कथाकारांची यादी समीक्षकअभ्यासकांनी काळजीपूर्वक तयार केलेली आहे. अर्थात तरीही ही यादी परिपूर्ण असेल असे नाही. सन १९९० नंतरच्या बदलत्या वास्तवाला सामोरे जाऊन, नव्या प्रेरणेने कथेला नवा आशय प्राप्त करून देणाऱ्या काही प्रतिभावंत साहित्यिकांची यादी पाहयात.
मनावर जे नैतिक ताण निर्माण झाले, त्या ताणांचं प्रतिबिंब मनोविश्लषणात्मक कथांमधून उमटू लागलं व कथा व्यक्तिवादी, व्यक्तिकेंद्री झाली. आता पुन्हा लंबक हेलकावे खातो आहे. लघुकथा पुन्हा समूहवादी होऊ लागलेली आहे.लघुकथा हा दुय्यम साहित्यप्रकार आहे किंवा क्षुद्र साहित्यप्रकार आहे, अशा आशयाची टीका झालेली आहे. या टिकेचा एक मानसशास्त्रीय परिणाम असा झाला की, काही लिहिते लघुकथाकार लघुकथा लिहिता-लिहिता थबकले, थांबले आणि त्यांनी आपला मोर्चा कादंबरीकडे वळवला आहे. यातून कादंबरीविश्वाचं भलं झालं की नाही हा संशोधनाचा विषय असला तरी, लघुकथेच्या क्षेत्राचं मात्र नुकसान झालेलं आहे. याच काळात मी मात्र काहीएक निष्ठेने आणि लघुकथेच्या आंतरिक शक्तीवर श्रद्धा ठेवून कथा आणि दीर्घकथा लिहीत राहिलो.कथा आणि दीर्घकथा म्लान अवस्थेत पोहोचली होती, तेव्हा लघुकथेबरोबरच मी, सातत्याने दीर्घकथा लिहीत राहिलो. माझे पूर्वसूरी दीर्घकथा लिहीत राहिले होते, पण त्यानंतर मात्र दीर्घकथेचं सातत्य टिकलेलं नव्हतं. अशा अवस्थेत माझ्या लेखनामुळे दीर्घकथेच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये नवचैतन्य निर्माण झालं अशी चर्चा तुम्हां समीक्षकांनीच केलेली आहे. म्हणजे येथे आत्मप्रौढीचा प्रश्न उद्भवत नाही.माझ्या मते सन १९८० ते १९९० हा कालखंड अतिशय संवेदनशील, महत्वाचा व काही प्रमाणात सगळीकडेच उलथापालथ करणारा असा होता. कथेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कथेमध्ये आलेली मरगळ कथाकारांना जाणवत होती. कथा स्तब्ध आणि ग्लानीग्रस्त झाल्यामुळे लघुकथा म्हणून जो कोणता रूढ असा आकृतीबंध परंपरेने स्विकारला होता, तो आकृतीबंध मोडून काढण्याची आवश्यकता कथाकारांना वाटायला लागली होती. जागतिकीकरणाबद्दल याच सुमाराला चर्चा सुरू झालेली आहे. या अस्वस्थ कालखंडात जी कथा लिहिली गेली ती नव्या रूपात पुढच्या दशकात म्हणजे सन १९९० नंतर आपल्याला भेटते. आपल्या सशक्त अभिव्यक्तिने कथेला आधुनकि असे रूप प्रदान करणाऱ्या या कालखंडातील लेखकांची यादी सुप्रसिद्ध आहे. स्थानभयास्तव ही यादी विस्ताराने देता येणार नसली तरी त्यांच्या योगदानाचे मी आदरपूर्वक स्मरण करीत आहे. याच काळात साहित्यातील दलित, ग्रामीण, इत्यादी प्रवाह सशक्त झालेले आहेत.सन १९९० ते आजपर्यंतची कथा कोणत्या स्वभाववैशिष्ट्यासह आपल्याला भेटते हा उत्सुकतेचा विषय. सन १९९० नंतरच्या प्रमुख व गुणवान कथाकारांची यादी समीक्षकअभ्यासकांनी काळजीपूर्वक तयार केलेली आहे. अर्थात तरीही ही यादी परिपूर्ण असेल असे नाही. सन १९९० नंतरच्या बदलत्या वास्तवाला सामोरे जाऊन, नव्या प्रेरणेने कथेला नवा आशय प्राप्त करून देणाऱ्या काही प्रतिभावंत साहित्यिकांची यादी पाहयात.

रंगनाथ पठारे, मिलिंद बोकील, प्रविण पाटकर, प्रतिमा जोशी, भारत सासणे, सुबोध जावडेकर, केशव मेश्राम, सदानंद देशमुख, अर्जुन व्हटकर, राजन गवस, मनोहर तल्हार, राजन खान, मधुकर धर्मापुरीकर, पंकज कुरूलकर, प्रकाश नारायण संत, अनंत सामंत, सानिया, आशा बगे, प्रिया तेंडूलकर, मेघना पेठे, रोहिणी कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर, नीरजा, उर्मिला पवार, प्रतिमा इंगोले, नागनाथ कोत्तापल्ले, रविंद्र शोभणे इत्यादी कथाकारांचे नामोल्लेख आवर्जून करावे लागतीलच. परंतु नवे अविष्कार प्रकट करू पाहणाऱ्या शक्तिमान लेखकांमध्ये किरण येले, प्रणव सखदेव, किरण गुरव, ऋषिकेश गुप्ते, शिल्पा कांबळे, आसाराम लोमटे, पंकज भोसले, गणेश मतकरी, संजय ढोले इत्यादी लेखकांचादेखील समावेश या यादीत करावा लागेल. मात्र, ही यादी परिपूर्ण नाही याची मला खात्री आहे. अभ्यासकांनी ही यादी अधिक विस्तृत करून दिल्यास आपणास उपयुक्त ठरू शकेल.जागतिकीकरणाची चाहूल लागल्यानंतर आणि त्याचे परिणाम दरवाजाच्या बाहेरपर्यंत येऊन ते दरवाजा ठोठावू लागल्यानंतर उत्तराधुनिक कालखंडातील मराठी कथेने हळूहळू आपला चेहरा व स्वभाव बदलायला सुरूवात केली आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या अफाट अशा मायाजालातून मानवी मनाचा शोध अधिकाधिक प्रभावीपणे घेतला जाऊ शकतो हे माहीत झाल्यानंतर पूर्वीची मनोविश्लेषणात्मक कथा जास्त गडद झाली हे खरे असले तरी उत्तराधुनिक कालखंडातील कथा विश्वमनाचा शोध घेऊ लागल्यामुळे पुन्हा एकदा व्यक्तीजीवनाकडून समाजजीवनाकडे अशी प्रवास करू लागली. तिच्यामध्ये समूहमनाचे हुंकार, समूहमनाच्या वेदना उमटताना दिसत असल्यामुळे एकूणच कथा सामाजिक जीवनापासून प्रारंभ करून व्यक्तिजीवनाकडे आली आणि पुन्हा व्यक्तिजीवनापासून समूहजीवनाकडे जास्त ताकदीने वाटचाल करू लागली आहे, असे दिसते. आत्ताची कथा सजग, सावध व समकालीन घटनांची नोंद घेणारी अशी होताना दिसते ही स्वागतार्दा घटना.याच कालखंडात महानगरीय कथा आणि दीर्घकथा, शेतकऱ्याला केंद्रस्थानी मानणाऱ्या सशक्त कथा, मुस्लिम स्त्री-पुरूषांचा वेदना-प्रवास प्रतिबिंबित करणाऱ्या दीर्घकथा, बॉम्बस्फॉट, दंगली, जातीय तणाव इत्यादींचे भेदक चित्रण करणाऱ्या वास्तववादी कथा आणि स्त्रीजीवनाचं व तिच्या शोषणाचं भेदक व प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या कथा अवतरित झालेल्या आहेत. सन १९९० नंतरच्या कथेचा चेहरा बदलता दिसतो आहे. हा चेहरा जीवनाच्या जवळचा आहे, मानवी आहे आणि समूहातील स्त्री-पुरूषांचा असा आहे. भारतीय कथापरंपरेमध्ये सन १९९० नंतरच्या कथेने विलक्षण ताकदीची अशी भर घातलेली आहे असं माझं मत आहे.

११) उत्तराधुनिक कालखंड व दीर्घकथामात्र सन १९९० च्या सुमाराला व त्यानंतर मराठी कथेच्या विश्वात एक अभूतपूर्व अशी घटना घडू पाहते आहे याची विशेष अशी नोंद अभ्यासकांनी अद्याप केलेली नाही. म्हणून या घटनेबाबत थोड्याशा विस्ताराने बोलले पाहिजे. कथेच्या रूढ अशा प्रांगणातून वेगळी अशी फुटून स्वतःच्या स्वायत्ततेने, स्वतंत्रपणे व सशक्तपणे दीर्घकथा उभी राहते आहे ही ती घटना होय. कादंबरीपेक्षा लघुकादंबरी वेगळी असून तिचा विचार स्वतंत्रपणे व वेगळा असा साहित्यप्रकार म्हणून केला जाऊ शकत असेल तर दीर्घकथेला सुद्धा तिची स्वाभाविक स्वायत्तता मान्य केली जावी अशी दीर्घकथेची स्वतःचीच मागणी आहे. मागील पंचवीस वर्षांत मराठीत दीर्घकथा सातत्याने लिहिली गेली व लिहिली जाते आहे. प्रयोगशीलतेतून व्यक्त होण्याच्या अनेक नव्या वाटा दीर्घकथा शोधते आहे. उत्तराधुनिक कालखंडात कलाप्रकाराचे आदानप्रदान होताना दिसते. दीर्घकथा सुद्धा नाटक, श्रुतिका, चित्रकला इत्यादी कलाप्रकाराशी जवळीक साधून लघुकादंबरीच्या ताकदीने अनेक तपशीलांसह प्रकट होते आहे. त्यामुळे स्वतंत्र असा साहित्यप्रकार म्हणून दीर्घकथेकडे पाहिले जावे अशी चर्चा सुरू झालेली आहे. हिंदीमध्ये व अन्य भाषांतून सुद्धा दीर्घकथा लिहिली जात असली तरी तिचे स्वरूप काय म्हणून स्वीकृत करावे याबाबत काहीएक निश्चिती अद्याप त्या भाषांतसुद्धा झालेली नाही. उदयप्रकाशसारखा हिंदी लेखक त्याच्या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये याबाबत तक्रार करून हतबलता व्यक्त करतो. दीर्घकथा लघुकथेच्या शाईने लिहायची असते मात्र सामुग्री लघुकादंबरीची वापरावी लागते असे दीर्घकथेने वारंवार सांगितले. मराठी समीक्षेने दीर्घकथेची स्वायत्तता मान्य केली असली व तिची व्याख्या केली असली तरी दीर्घकथेला वेगळा असा दर्जा किंवा वेगळी अशी मान्यता दिली जावी असं म्हटलेलं नाही. अन्य भाषांचे लेखक व समीक्षक मराठीतील दीर्घकथेच्या संदर्भातील तात्विक चर्चेबाबत कुतुहल दर्शवित आहेत. दीर्घकथेला मराठी भाषेतून काहीएक दर्जा किंवा मान्यता मिळाल्यास अन्य भाषांना देखील तो विचार मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरू शकेल असे त्यांना वाटतं. एकूणच उत्तराधुनिक व्यामिश्र जीवनपद्धतीला स्वतःत सामावून घेण्याची व समकालीन परिस्थितीबद्दल काहीएक समर्थपणे सांगण्याची शक्ती दीर्घकथेमध्येच असल्यामुळे येथून पुढे दीर्घकथेकडे आपण आशेने पाहू शकू असं चित्र दिसतं. दीर्घकथेची काहीएक परिभाषा तयार करणं, दीर्घकथेचे तंत्र काही प्रमाणात स्पष्ट करणं असं काही काम मराठी समीक्षेच्या क्षेत्रामध्ये होणं आता गरजेचं आहे. मराठीतल्या दीर्घकथेच्या रूपाने मराठी भाषेने अन्य भाषांना देणगी दिली आहे अशी चर्चा मी नुकतीच वाचली. मी या विधानाचं स्वागत करतो.
१२) गूढत्व माझ्या दीर्घकथांमध्ये काहीएक गूढत्व प्रतिबिंबित होतं अशी प्रशंसावजा तक्रार केली जाते. या संदर्भात थोडं बोललं पाहिजे. हृदयगम्यता आणि बुद्धिगम्यता हे काही एकमेव हेतू साहित्याचे नसतात. त्याहीपलीकडे जाऊन जीवनाच्या परीघामध्ये जी अतयंता आहे तीदेखील साहित्याने शोधाची असते. मिझ गालिब या कवीने म्हणून ठेवलं आहे की, __ है गैब-ए-गैब जिस को समझते हैं हम शुहूदहैं ख़्वाब में हुनूज़ जो जागे हैं ख़्वाब में गैब म्हणजे रहस्यमयी गूढ. शुहूद म्हणजे साक्षीदार. आता, गैब-ए-गैब म्हणजे रहस्याचं रहस्य. हे जे विश्व दिसतं आहे ते रहस्यमय रहस्याचा भाग आहे. आणि जे प्रत्यक्ष दिसतं आहे ते दिसणं म्हणजे स्वप्नात स्वप्न पाहणं असतं. साक्षीभावाने हे स्वप्नातलं स्वप्न बघायचं आहे. गालिब असं काही म्हणतो. माझ्या दीर्घकथांमध्ये जीवनाची अतयंता, गूढता स्वप्नवत् वास्तव आणि वास्तववत् स्वप्न यांचं जे काही दर्शन घडतं आहे, त्याबाबतची साक्ष पूर्वसूरींनी या ना त्या नात्याने देऊन ठेवलेली आहे. ‘जगन्मिथ्या’ असं आपल्याकडे ऋषींनी नोंदवलेलं आहेच. सर्वसामान्य माणसाच्या तळापर्यंत पोहोचताना हे जे काही स्वप्नवत वास्तव आहे, त्याचं दर्शन माझ्या दीर्घकथांमधून व्हायला लागतं..समीक्षकांनी माझ्या लघुकथांबाबत आणि दीर्घकथांबाबत विश्लेषण करताना असं नोंदवलं आहे की, तथ्य कथ्याच्या सोबतीने अवतरित होतं, पण ते मिथ्याच्या साक्षीने अवगुंठीत झालेलं असतं. म्हणून सत्य आभासमय होतं व लेखक, म्हणजे मी ज्या ज्या वेळेस सत्याला स्पर्श करू पाहतो, त्या त्या वेळेस सत्य क्षितीजापर्यंत दूर गेलेलं असतं. सर्वसामान्यांचा मृगजळांचा पाठलाग माझ्या दीर्घकथांमधून स्पष्ट होतो, अशी नोंद समीक्षकांनी केलेली आहे. माझ्या शैलीत त्यांना ‘मॅजिकल रिअॅलिझम्’सुद्धा दिसतं आहे.पण माझ्यासारख्या लेखकाची ही अडचण असते. नवं काही सांगावं तर परिस्थितीनुरूप ते सांगणं जटिल आणि गुंतागुंतीचं झालेलं असतं, जुनं काही सांगावं तर ते अवघड वाटलेलं असतं.हृदयगम्यतेच्या आणि बुद्धिगम्यतेच्या झगड्याच्या पलीकडे वास्तवाचं गूढ आहे आणि गूढाचंदेखील वास्तव आहे.

१३) लेखकाचं चिंतन आणि चिंतावृत्तीगांभीर्याने लेखन करणाऱ्या चिंतनशील लेखकाला साहित्यांतर्गत आणि साहित्यबाह्य विषयांबाबतसुद्धा काहीएक चिंतन मांडावं लागतं आणि काहीएक चिंता व्यक्त कराव्या लागतात. या चिंता प्रातिनिधिकदेखील असू शकतील आणि म्हणून त्या मी तुम्हा रसिकजाणकारांसमोर विचारार्थ ठेवीत आहे. ___आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेलेला आहे. काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेच्या कवितांमधून, क्वचित तेंडूलकरांच्या नाटकांमधून आणि संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून तसेच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या __ लेखनामधून दिसला होता. आता मात्र, हा चेहरा धूसर होतो आहे, हरवतो आहे. मनोरंजनपरआणि बुद्धिरंजनपर साहित्य अलिकडे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असताना हा चेहरा दिसेनासा होतो आहे. साहित्याला सामान्य माणसाच्या जगण्याबाबत आस्था वाटली पाहिजे. जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असेल तर सामान्य माणूस साहित्यदर्शनातून का वगळला जातो आहे हे पाहिलं पाहिजे. त्याला पुन्हा एकदा प्रस्थापित करावं लागेल.मुख्य म्हणजे ‘सामान्य माणसा’बाबतचं कोणतं आकलन आपल्या लेखकाला झालं आहे हा प्रश्न तपासून घेण्यासारखा आहे. आपला लेखक अजूनही ‘प्रेयस आणि श्रेयस’ यामध्ये अडकला आहे. तो सत्य म्हणजे काय, याचा शोध घेत नाही, नैतिकतेचा आग्रह धरीत नाही आणि व्यापक अशा जीवनाचा अभ्यास करीत नाही असं निरीक्षण आहे. सद्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा आंधळा प्रवास सुरूच असून कोणती तरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. परिवर्तन त्याला हवं आहे. शोषणमुक्त समाज त्याला हवा आहे. भ्रष्टाचारातून पिळवटून निघणं त्याला नको आहे. पण आपल्या दुःखाचा परिहार कसा होणार हे मात्र त्याला समजलेलं नाही. कोणी तरी मसीहा येईल आणि परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल असं त्याला वाटतं आहे. पण असा कोणी मसीहा येत नाही आणि त्याचं वाट पाहणं थांबत नाही. द्रष्ट्या कवींनी ती उद्याची पहाट उजाडेल असा दिलासा जरी दिला असला तरी त्याचबरोबर तीव्र उपहास देखील नोंदवलेला आहे, कारण उद्याचा दिवस उजाडणारच नसतो. वाट पाहणं केवळ या सर्वसामान्य माणसाच्या नशिबी आहे. तो भयभीत आहे. त्याच्या भयमुक्तीची घोषणा कधी व कोणत्या पीठावरूनकेली जाईल याची आपण वाट पाहतो आहोत. या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी कथा _अस्तित्त्वात येण्याची आवश्यकता आहे.एक विचित्र अशी घटना घडलेली आहे. साहित्याच्या परिघामध्ये एक विचित्र असा तुच्छतावाद निर्माण झालेला आहे. हा तुच्छतावाद अनेक वर्षे जोपासला जातो आहे.
व्यक्तिगत पातळीवर अनेकांची टिंगल-टवाळी कोणी करीत असेल तर त्याबाबत फारशी चिंता बाळगण्याचं कारण नसतं, कारण ही वैयक्तिक मतं असतात. मात्र परप्रकाशित, परभ्रुत, इतरांच्या प्रभावळीतील सामान्य अनुयायी आपापल्या ठिकाणी घट्ट बसून कथित तुच्छतावादआणि प्रदूषण पसरवित राहिलेले असतात ही मात्र चिंतेची बाब म्हणावी लागेल. या तुच्छतावादामुळे मराठी रसिकजनांच्या अभिरूचीचा अपमान होतो आणि मेहनती साहित्यिकांचा अवमानदेखील होतो, याची दखल सहसा घेतली जात नाही. अशा बेजबाबदार टिंगलीतून मराठी साहित्याचं आपण काही नुकसान करतो आहोत याची त्या अनुयायांना जाणीव नसते कारण, काहीएक बौद्धिक विकृती त्यांच्या ठायी निर्माण झालेली असते. ज्येष्ठ नाटककार श्री. महेश एलकुंचवार यांनी या संदर्भात उघडपणे नाराजी प्रकट केलेली आहे. पण हा अपवाद वगळता या तुच्छतावादाबाबत बोलणं टाळलं जातं हा चिंतेचाविषय.मराठी बालसाहित्यातून आपण अद्भुतरस हद्दपार केलेला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान यांच्या कोड्यांनी भरलेलं, निरस असं झाल्याचं दिसतं आहे. लांब नाकाच्या चेटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या इत्यादींना आपण कुलूपबंद तळघरात ढकलून दिलं. संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडलेली आहे. विशिष्ट वयात अद्भूतरसाचं सेवन ज्या मुलांना करता येतं ती मुलं बुद्धिमान, प्रतिभावान, तरल कल्पनाशक्तिची देणगी असलेली आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची बनतात असं बालमानसशास्त्र सांगत आलेलं आहे. त्याउलट, अद्भुतरसाचा संपर्क ज्या मुलांच्या मनाशी घडला नाही ती मुलं पोटार्थी, शुष्क, अविकसित व्यक्तिमत्त्वाची, अविचारी आणि अरसिक अशी निपजतात.एखादा समाज किंवा संस्कृती नष्ट करायची असेल तर त्या संस्कृतीची ज्ञानसंपदा नष्ट केली पाहिजे हा दुष्ट विचार इतिहासकालापासून सर्वत्र आढळतो. हल्लेखोरांनी आधी अन्य संस्कृतीची ग्रंथालयं नष्ट केली आहेत. आपण मात्र स्वतःच आपली ग्रंथालयं स्वहस्ते केविलवाणी, उपेक्षित आणि खिळखिळी करून टाकली आहेत, याबाबत आपण सर्वांनी चिंता वाहिली पाहिजे.मराठी साहित्यसंशोधनातील आजची परिस्थिती निराशाजनक आहे किंवा कसे याबाबत भाष्य करण्याचा मला पुरेसा अधिकार नसला, तरी सामान्य रसिक या नात्याने माझा सवाल असा आहे की, परदेशामध्ये शेक्सपिअर इत्यादी लेखकांची हस्तलिखितं जपून ठेवणं शक्य असेल तर आपण आपल्या ‘मास्टर स्टोरीटेलर्स’ची हस्तलिखितं आणि हस्ताक्षरं का जपून ठेवू शकलेलो नाही? उदाहरणार्थ नाथमाधव किंवा गो.ना. दातार किंवा अन्य मास्टर्स
यांच्या प्रचंड कामकाजाची हस्तलिखिते आपण का उपलब्ध करून घेऊ शकलेलो नाही? या एकूण उदासिनतेबाबत अधिकारी जाणकारांनी बोललं पाहिजे.मित्रहो, काही टीकाकारांनी असं दाखवून दिलं आहे की, मराठी साहित्याचं विश्व नेहमीच कर्मठ, स्थितीवादी, आत्मकेंद्री व वास्तवाची दखल न घेणारं असं राहिलं आहे. टीका अशी आहे की, स्वातंत्र्यसंग्रामाबाबत मराठी साहित्यविश्वात विशेष असं काही लिहिलं गेलं नाही. महात्मा गांधींच्या खुनाच्या घटनेचे पडसाद देखील मराठी साहित्यात विशेष उमटलेले नाहीत. महात्मा गांधींचं योग्य ते आकलनच मराठी साहित्याला व साहित्यिकांना नीटसं झालेलं नाही अशी टीका केली गेली आहे. मोठ्या अशा समूहाने धर्मांतर करणं, बहात्तरचा मोठा दुष्काळ व त्या निमित्ताने शेतकऱ्याचं उद्ध्वस्त होणं या घटनादेखील मराठी साहित्यात आल्या नाहीत. वर्तमानाचं भान नसणं हा मराठी साहित्याचा दोष लक्षात घेता जगात, भारतात व महाराष्ट्रात ज्या महत्वाच्या घटना अलिकडे घडल्या त्यांचं प्रतिबिंब साहित्यात पडण्याची कितपत शक्यता आहे असा थोडासा टोकदार सवाल आहे.आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावं लागतं. उर्दूमधल्या ‘सादत हसन मंटो’ ने अनेक वर्षांपूर्वीच उर्दू कथेला विलक्षण उंचीवर नेऊन उर्दू कथेला मानवी चेहरा दिला. वेश्या, हमाल, डोअरकीपर्स, टांगेवाले, रस्त्यावर अंगमेहनतीची कामं करून जगणारे, अशांच्या जीवनव्यवहाराबाबत विलक्षण करूणा व आस्था मंटोंच्या कथांमधून प्रकट झाली. मराठी कथेला अद्यापही एखादा मंटो मिळालेला नाही. अद्यापही मराठी कथेमध्ये करूणास्वरूप असं लिखाण आलेलं नसून समाजातला हा दुर्लक्षित वर्ग मराठी कथेतून सहसा सापडत नाही या उणिवेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.__ साहित्यांतर्गत काही भाषेचे प्रश्न आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. कपड्यावरून माणसं ओळखण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून चर्चा केली जात असली तरी भाषेवरून माणसांची ओळख पटवण्याचा खेळ जुन्या संहितेमध्ये आढळतो. अभिजन कोण तर अभिजात भाषा बोलतात ते, आणि अभिजात भाषा कोणती तर अभिजन बोलतात ती, असा उपहास पाणिनीच्या सूत्रपाठात नोंदविला आहेच. विद्वानांनी निवाडा दिला नसला तरी ‘संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे’ असा निवाडा राजकीय पक्षाचे पदाधिकारी देतात तेव्हा साहित्याला चिंता वाटली पाहिजे. भाषेवरून माणसांची ओळख कशी करणार? पाली इत्यादी प्राचीन भाषांचं काय करणार? उर्दू ही मुसलमानांची भाषा नसून ती भारतीय भाषा आहे हे कोण सांगणार?
__ संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवला जातो आहे किंवा नाही याबाबत मराठी साहित्य बोलताना आढळत नाही. आता तर संविधानच बदलण्याची भाषा सुरू आहे. मराठी साहित्यांतर्गत या घटनेचे पडसाद बहुधा पडलेले नाहीत.साहित्यांतर्गत असे काही चिंतेचे आणि चिंतनाचे विषय आहेत.

१४) भ्रमयुगमित्रहो! आपल्या निवेदनाच्या उत्तरार्धापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. काळ __ तर मोठा कठीण आला हे तर मी आपल्याला सांगितलं. भर्तृहरीची भव्य कल्पनादेखील मीआपल्याला सांगितली आणि नंतर मी असं सांगितलं की, आपण अत्यंतिक अशा भ्रमयुगामध्ये आता प्रवेश केला आहे. या भ्रमयुगाबाबत, या फसव्या अशा छद्मयुगाबाबत, चिंतास्पद सद्ययुगाबाबत मला आपणाशी थोडं सविस्तर बोलायचं आहे.भर्तृहरीप्रमाणेच आणखी एक रोमांचकारी संकल्पना आपल्या परंपरेत सापडते. प्रत्यक्ष __ महादेव स्वतःच काळ आहे. तो निरपेक्ष आहे. मात्र, गौरी काळाची नियंत्रिका आहे. या नियंत्रणामुळेच काळ लयबद्ध असतो, असं सांगितलं गेलं आहे. पण नियंत्रिका असली तरी ती महादेवाची पत्नीच आहे. म्हणून, केव्हा तरी काळाच्या छातीवर मस्तक ठेवून गौरीला निद्रा येते. अशी निद्रा आली की ‘काळरात्री’ची सुरूवात होते. याच काळात बालबुद्धी विद्ध्वंसकांच्या हातामध्ये समाजाच्या भवितव्याची सूत्रं नकळतपणे सुपूर्त होत असतात कारण हा बेसावधपणाचा काळ असतो, काळरात्रीची सुरूवात असते.आपण अशा छद्मबुद्धी विद्ध्वंसकांच्या ताब्यामध्ये जातो आहोत असे संकेत मिळायला लागले आहेत. चिंतनशील लेखकाला अशावेळेस चिंता वाटत असते, वाटली पाहिजे. हे विध्वंसक, आपल्या पुढील पिढीच्या मुलांच्या हातामध्ये कोणता भिकेचा कटोरा देणार आहेत, याचा फक्त अंदाजच करता येतो. पण नांदी तर झालेलीच आहे. आपण थाळीवाजवली आणि ती वाजवताना लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला होता. __ थाळी वाजवण्याचे भीषण संदर्भ खरंतर राज्यकर्त्यांनासुद्धा माहीत नाहीत. नोंद अशी मिळतेकी दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये बारा वर्षे पाऊस पडला नव्हता आणि समाज भुकेकंगाल होऊन ‘त्राहिमाम्’ म्हणत सैरावैरा झाला होता. भुकेकंगालांच्या जरत्कारू टोळ्या अन्नाच्या शोधात बाहेर पडून थाळ्या वाजवत गल्लोगल्ली फिरत होत्या आणि समोरून येणाऱ्या माणसांवर तुटून पडत होत्या. अन्नासाठी चाललेली ही भीषण झटापट अशी थाळीनादाशी जोडली गेलेली आहे.
काही विचारवंत आता दबल्या आवाजात असं सांगत आहेत की, सध्या विषमता वाढू लागली आहे. गरीब लोक आता दरिद्री होतायत. श्रीमंत लोक अतिश्रीमंत होत आहेत. मध्यमवर्ग वेगाने विभाजित होतो आहे. तो कनिष्ठ मध्यमवर्गात ढकलला जातो आहे. दरी वाढते आहे. कदाचित पुढे चालून आर्थिक दुर्बल घटक आर्थिक दृष्ट्या बरी परिस्थिती असलेल्या समाजवर्गावर आक्रमण सुरू करेल. त्यातून हळूहळू गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. विचारवंत दक्षिण आफ्रिकेतील घटनांकडे अंगुलीदर्शन करीत आहेत. आपल्या देशात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल असा इशारा विश्लेषक विचारवंत देत आहेत. लेखक हे ऐकून चिंतित होतो आहे. थाळीवादनाचे ध्वनी त्याने ऐकले आणि येऊ घातलेल्या परिस्थितीकडेही तो पाहतो आहे.मौलाना रूमी यांचा जन्म अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतात सन १२०७ मध्ये झालेला आहे. त्यांनी पूर्वीच मानवजातीला सावध केलं आहे. समाजातील सामान्य स्त्री-पुरूषांना जगत्व्यवहार करण्यासाठी आपल्या भोवती काहीएक व्यवस्था निर्माण करावी लागते. ही व्यवस्था चालविण्यासाठी व्यक्तिंची निवड केल्यानंतर सामान्य माणसं पीडित का होतात, दुःख का भोगतात आणि बेचैनीला का सामोरं जातात याचं कारण रूमीने दिलेलं आहे. त्या काळातली लोकसंख्या आणि समाजातल्या सक्षम व्यक्तींचं प्रमाण लक्षात घेता त्यांनी दिलेलं उदाहरण महत्वाचं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की,“एक हजार क़ाबिल आदमी के मर जानेसे इतना नुकसान नही होताजितना, के एक अहमक के साहिबे एखतियार होनेसे होता है” अर्थ असा आहे की लष्करातली एक हजार सक्षम माणसं नष्ट झाली तरी फारसं नुकसान होत नसतं, मात्र एखाद्या विदुषकाच्या अधिकारप्राप्तीनंतर जे नुकसान होतं ते मात्र भरून निघणारं नसतं. ‘अहमक’ म्हणजे विदुषक. सर्कशीत काम करणारा विदुषक इथे अभिप्रेत नाही. विदुषकवृत्तीचा मूढ. “साहिबे एख़तियार’ म्हणजे अधिकारप्राप्ती. समाजाने विदुषकप्रवृत्तीच्या मूढांना अधिकारप्राप्ती करून दिली तर समाजाला असह्य पीडा सहन करावी लागते, असा या म्हणण्याचा रोख आहे. मौलाना रूमींनी विदुषकांपासून सावध राहण्याबाबत आपल्याला सूचित केलं आहे. ही प्रवृत्ती क्रूर प्रवृत्ती असते असंही त्यांनी सांगितलं आहे.पण इतकंच नाही. लेखकाने सत्य बोललं पाहिजे आणि निर्भयतेने बोललं पाहिजे, असंही साहित्य सांगतं.अब्दल बिस्मिल्लाह नावाच्या हिंदी लेखकाने ‘दंतकथा’ नावाची लघुकादंबरी लिहिलेली आहे. मी या लघुकादंबरीचा मराठीतून अनुवाद केला होता. पुस्तकरूपाने हा अनुवाद आता उपलब्ध आहे. एक कोंबडा खाटीक मंडळींकडून स्वतःला वाचवून जीवाच्या
आकांताने धावतो आहे आणि धावता धावता तो एका नालीच्या पोकळीमध्ये आतपर्यंत जाऊन बसलेला आहे. त्याला शोधण्यासाठी आणि मारण्यासाठी आलेली मंडळी कोंबड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि जीवाच्या भीतीने हा कोंबडा पुढे पुढे सरकत राहिलेला आहे. आता पुढे सरकण्याचा रस्ता जवळपास बंद आणि मागे सरकण्याचा रस्ताही बंद. मृत्यू तर केव्हाही उपस्थित होऊ शकतो. आणि रात्र झाली आहे. अशा परिस्थितीत हा कोंबडा वाचकांना विश्वासात घेऊन संवाद करायला लागतो. आपल्या बालपणीपासूनच्या आठवणी सांगायला लागतो. एका कोंबड्याने सांगितलेल्या आठवणी म्हणून आपण या निवेदनाकडे पाहायला तर लागतो, पण आपल्या असं लक्षात यायला लागतं की, इथे सांगितलं जाणारं निवेदन तुमच्या आमच्या सामान्य जीवनापेक्षा वेगळं नाही. खुराड्यातलं जगणं, क्षुद्र अहंकार आणि लढाया, छोटी-मोठी प्रेमप्रकरणं आणि सामान्य पातळीवरचा सामान्य असा संघर्ष, आणि या सगळ्या जगण्यावर विशाल अशी आतंकाची छाया-मृत्यूच्या भीतीची सावली. मनुष्याला असाच अनुभव येत असतो आणि त्याचंही जगणं यापेक्षा वेगळं नाही. क्षुद्रजीवन, क्षुद्रजीवनपद्धती आणि सततचं वावरणारं भय, याचा अनुभव माणूस घेत आलेला आहे. पण, या लघुकादंबरीच्या अखेरीस पहाट होता होता, हा मरणासक्त कोंबडा निर्भयतेने आरवलेला आहे. त्याचं आरवणं अंधाराच्या चादरीला लखलखीत सत्याच्या सुरीने फाडून टाकतं आहे. आपण कोठे लपलो आहोत हे आपल्या आरवण्यामुळे शत्रूच्या लक्षात येईल इत्यादी भयोत्पन्न क्षुद्र सावधगिरी आता मागे पडलेली आहे. उगवत्या सूर्याला सलाम करायचा आहे. निर्भयता, व्यर्थ आणि क्षुद्र भयावर मात करते आणि अशी मात केल्यामुळेच नवजीवनाचं स्वागत केलं जाऊ शकतं असंच हा कोंबडा सांगतो आहे. अलिकडे बहुतेक कोंबड्यांचं आरवणं बंद झालं असताना आणि भीतीची काजळी सर्वत्र व्यापून राहिली असताना निर्भयतेने आरवण्याचं महत्व ही लघुकादंबरी अधोरेखित करते. प्रस्तुत भ्रमयुगाशी ही लघुकादंबरी जोडली जाते आहे हे पाहून आपण स्तिमित होतो. साहित्य आपल्या द्रष्टेपणातून वेळेच्या आधीच आपल्याला इशारे देत असतं ही साहित्याची शक्ती.सत्याचा आग्रह, सत्याचा उच्चार ही तर काळाची गरज आहेच आणि सत्य निर्भयपणे सांगितलं पाहिजे हीदेखील काळाची गरज आहे. मात्र, उच्चरवाने सत्याचा उच्चार का करावा लागतो याबाबत लेखकाने आपल्याला काहीएक सांगून ठेवलं आहे. एका बंगाली कादंबरीमध्ये प्रतिकरूपाने आलेलं सत्यवान नावाचं पात्र कोर्टामध्ये साक्ष देतं आहे. सत्यालादेखील साक्ष द्यावी लागते, तीदेखील शपथेवर. सत्य साक्ष देतं आहे पण भोवतालच्या कोलाहात सत्याचा आवाज ऐकू जात नाही. टाईपरायटरचा खडखडाट, शेजारच्या कँटीनमधली कपबशांची किणकिण, लोकांचं परस्परांशी बोलणं आणि एकूणच निर्माण झालेला व्यर्थ, पोटार्थी कोलाहल यामध्ये सत्याचा आवाज विरत जातो.
पण हा आवाज सातत्यपूर्ण आहे. सत्य आपलं कथन उच्चारित राहत असतं. ऐकण्याचा कान मात्र पाहिजे, कारण हा विवेकाचा आवाज आहे. कोलाहलात हा आवाज उच्चरवानेदेखील उच्चारला जावा लागतो, जरी तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी. द्रष्टा लेखक असं सांगत राहतो. आपण पाहिलं, ऐकलं पाहिजे हे मात्र खरं.माझी एक आरसा नावाची अप्रकाशित कादंबरी आहे. कथानक असं की, लेखकाच्या घरातला आरसा फुटलेला आहे. लेखक अवचितपणे असं बोलून जातो की, बरं झालं, आरसा फुटला, नाहीतरी आरसे जरा जास्तच सत्य बोलायला लागले आहेत. आरसे मंडळी हे उद्गार ऐकतात आणि नाराज होतात. त्यांचा प्रतिनिधी लेखकाला भेटायला आलेला आहे. तो लेखकासारखाच दिसतो. पण उलटा आहे. म्हणजे, लेखकाची उजवी बाजू तर याची डावी बाजू इत्यादी. आरशांचा प्रतिनिधी निषेध करून असं म्हणतो की सत्यकथन करणं हे आरशाचं कामच आहे, कारण आरसा सत्यव्रती असतो. लांगुलचालन करणे हा काही त्याचा धर्म नव्हे. पण आरसा असंही सांगतो की, बाजारामध्ये काही बाजारबसवे आरसे आलेले आहेत, जे दिसायला सुंदर दिसतात आणि तुम्हाला जे पाहिजे तेच दाखवतात. उदाहरणार्थ, तुम्ही लठ्ठ असाल तर आरसा तुम्हाला सौष्ठवपूर्ण असं दाखवतो आणि तुमचे पांढरे केस या आरशात पांढरे दिसतच नाहीत. तुम्ही मोठे रूबाबदार, यशस्वी, धोरणी आणि अवतारी पुरूष दिसू शकता. असं दाखवणाऱ्या आरशांची बिलकूल कमतरता नाही. त्याउलट, एक आरशांची गुप्त संघटना भूमिगत राहून काम करते आहे, सत्यघोष करते आहे. ‘सांग दर्पणा मी कशी दिसते?’ या प्रश्नावर ‘तू सुंदर नाहीस’ असं स्पष्ट सांगणारा आणि म्हणून फुटलेपणाची शिक्षा भोगणारा आरसादेखील प्राचीन काळापासून या संघटनेचा सदस्य आहे. ‘दीने इलाही’ची स्थापना झाली तेव्हा प्रतिकरूपाने ठेवलेला आरसा या संघटनेत सामील आहे. बाळशास्त्री जांभेकरांचा ‘दर्पण’सुद्धा या संघटनेत सदस्य आहे. हे आरसे जुने आहेत, आकर्षक नाहीत. पण खरं बोलणारे आहेत. अशा गुप्त संघटनेला भेट देण्याची लेखकाला ‘प्रातिनिधिक भीती वाटू लागते.सुदैवाने माझी ही कादंबरी अजून प्रकाशित झाली नाही. पण या भीतीचं कारण तर आहेच. ते कारण सर्वांना माहितदेखील असतं. परंतु, या कारणामागचं कारणसुद्धा शोधता

१५) अमृतकाळमित्रहो! अमृतकाळ सुरू झाला आहे असं सांगितलं जात आहे. लेखकाने अमृतकाळाबद्दल ऐकलं आणि तो थोडा चकित झाला. थोडं आठवू लागला. त्याने स्वतःला विचारलं,“काय असावं हे? अमृतकाळ कसला?”तेवढ्यात त्याने काही चाहूल ऐकली. कार्टूनच्या चित्रात दडलेला ‘कॉमन मॅन’ त्याच वेळेला लपतछपत येऊन पोहोचला. तो उत्तेजित, थोडा भयभीत असा वाटला. त्याने फोन केला नव्हता. कारण मोबाइलमधून हेरगिरी केली जाते असं त्याने ऐकलं होतं. त्याने इकडेतिकडे पाहिलं आणि म्हटलं,”तुम्हाला समजलं नाही? अमृतकाळाबद्दल?”लेखकाला काही समजलं नाही असं लक्षात आल्यानंतर कॉमन मॅन दबल्या, भयभीत आवाजात पण उत्तेजित होऊन सांगू लागला….. अहोऽ!… त्या राहूला काय पाहिजे होतं? अमृताचे दोन थेंब ? ते मिळवण्यासाठी त्या बिचाऱ्याने वेषांतर केलं. रूपांतर केलं. छद्मरूप धारण केलं. फसवण्याचा प्रयत्न केला. तो तुमच्या पंक्तीत जाऊन बसला. तेही पुढे, पुढच्या रांगेत, अग्रभागी. द्यायचे होते दोन थेंब अमृताचे. पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही त्याला ओळखलंत. तुम्ही त्याला भर पंक्तीतून उठवलंत. तुम्ही त्याचा अपमान केला. उपहास केला. निर्भत्सना केली. तुम्ही त्याला हसलात. पण इतकंच नाही. तुम्ही त्याचा शिरच्छेददेखील केला. नसता केला तर, एकटा एकांडा पण उपद्रवी म्हणून राहिला असता तो! पण शिरच्छेद केल्यामुळे एकाचे दोन झाले-राहू आणि केतू. एकाकडे कुटील विचार, तर दुसऱ्याकडे अमानुष शक्ती. एकाकडे डोकं, दुसऱ्याकडे निर्बुद्ध शरीर आणि उपद्रवी शक्ती… राहूचे उपासक आता छद्मरूपाने तुम्हाला छळण्यासाठी वावरत आहेत. हे सगळे बहुरूपीउपासक आहेत. ते दुष्टबुद्धी, क्षुद्रबुद्धी आणि छद्मबुद्धी आहेत, आणि त्यांना सूड उगवायचा आहे. एक म्हणतो आहे, मी काशी. दुसरा म्हणतो, मी मथुरा. तिसरा म्हणतो आहे मी द्वारका, मी अयोध्या, मी… मी… मी! हे राहूचे उपासक विविध रूपाने वावरतायत. कधी ते संस्कृतीरक्षक होतात. कधी ते अभिमानी राष्ट्रभक्त होतात. कधी ते ज्योतिषी होतात. कधी ते भाष्यकार होतात. राजकीय विश्लेक्षक होतात, टोप्या बदलतात. त्यातला एक पुंगीवाला झालेला आहे किंवा बासरीवादक. त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय, की तुमच्या चिंता दूर करू, तुमच्या घरातले उंदीर पुंगी वाजवून आणि मोहीत करून दूर घेऊन जाऊ, आणि तुम्ही विश्वास ठेवला आहे. आता मात्र त्या लोककथेप्रमाणेच, समाजातले अनेक
तरूण पुंगीवाल्याच्या मागे मोहीत होऊन जातायत आणि हा पुंगीवाला त्यांना खाईच्या दिशेने घेऊन जातो आहे.कॉमन मॅन पुढे सांगू लागला, हळुवार आवाजात… नसता केला शिरच्छेद, दिले असते चार थेंब तर ही वेळ आली नसती. आता ‘राहू-केतू’चा उच्छाद सहन करणं इतकंच आपल्या नशीबी आहे. ज्योतिषाचार्यांना जाऊन विचारण्याची सोय नाही, कारण ते आधीच विकले गेलेले आहेत. ही तर नियतीचीच इच्छा आहे असं ते तुम्हा नियतीवाल्यांना सांगत आहेत. अमृतकाळ सुरू आहे आणि अमृताच्या चार थेंबासाठी लढाई सुरू आहे. श्रेयासाठी लढाई सुरू आहे. राहूचे उपासक सूड घेण्याच्या प्रयत्नात आहेत.कॉमन मॅनचं सांगून झालं असावं. लेखकाने विचारलं, “मग? एकूण बरं चाललेलं नाही?” |या प्रश्नावर तो थबकला. मग सांगू लागला… उद्याची पहाट सुंदर असेल या त्यांच्या आश्वासनावर खरंतर मी विश्वास ठेवायला नको होता, कारण उद्याची पहाट उजाडणारी नसते, उद्याचा दिवस येतच नसतो. कॉमन मॅनला शेरोशायरीची आवड नाही. ज्ञान पण नाही. पण तो स्टाईलने कपाळाला हात लावतो. मतितार्थ काव्यमय. दाग़ नावाच्या कवीच्या कवितेसारखा. तो सुचवतो“गज़ब किया, तेरे वादे पर ऐतबार कियातमाम रात क़यामत का इंतज़ार किया।” लेखक सामान्य माणसाच्या-कॉमन मॅनच्या या हताशेकडे पाहतो आहे.

१६) खरं आणि खोटंलेखकाला ‘आंदोलन-जीवी बुद्धिवाद्यांकडून एक गुप्त वार्ता समजली आहे आणि त्याची छाती धडधडायला लागली आहे. त्याने ऐकलं आहे की, ‘Through the looking glass’ या पुस्तकाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देण्याचं चाललं आहे. लेखक बुचकळ्यात पडतो आहे आणि या मागचं कारण बुद्धिवाट्याला विचारतो आहे. बुद्धिवादी दबल्या आवाजात सांगतो की, चार्ल्स लुटविज् याने ‘लेविज कॅरॉल’ या नावाने सन १८७१ मध्ये ही कादंबरी लिहिली. लेखकाला ते थोडं माहीत असतं. तो म्हणतो की, ही तर बालांसाठी लिहिलेली कादंबरी आहे. दबल्या आवाजात पुन्हा उत्तर मिळतं की, नाहीतरी सध्या समाज बालबुद्धी होत चाललेला आहे. या कादंबरीतली ॲलिस नावाची बालनायिका आरशाच्या आतमध्ये प्रवेश करते. आरशाचं जग उलटं असतं. जे डावे ते उजवे दिसतात, जे उजवे ते डावे दिसतात. आंदोलनकारी राष्ट्रद्रोही दिसतात. सत्याचं असत्य होतं.असत्याचं सत्य होतं. भ्रमाला वास्तव मानलं जातं. वास्तवाला स्वप्न मानलं जातं. जे काही दाखवलं जातं आहे ते खरं, असं मानणाऱ्या आणि संमोहित झालेल्या जनतेसाठी हाच ग्रंथ ‘राष्ट्रीय ग्रंथ’! बुद्धिवादी असं सांगतो की, या कादंबरीचं सार ‘Play with the relationship between something and nothing’ na ‘Unreal world of illogical behaviour’ असं आहे. म्हणजेच फॅन्टसीच्या जागी वास्तव आणि वास्तवाच्या जागी फॅन्टसी. त्यातून सामान्य जनतेच्या मनाशी केलेला, जनतेच्या बुद्धिशी केलेला हा खेळच. ते ऐकून लेखक आणखीनच खचून जातो आहे. हताश होतो आहे. स्वतःशीच, कुजबुजत्या स्वरात म्हणतो आहे, ‘म्हणजे ही भ्रमयुगाची सुरूवात तर नाही?’

१७) लेखक पाहतो लेखक बघतो आहे. पाहतो आहे. समजून घेतो आहे. त्याला जाणवतं आहे. तो सहकंपित होतो आहे. भोवताल त्याला अस्वस्थ करतं आहे. लेखक चिंता वाहतो. तो सामान्य माणसाच्या एकूण फसवणुकीकडे पाहतो.___ बुद्धिवाद्यांची आणि बुद्धिजीवींची आणि परिणामतः बुद्धिवादाची होणारी टिंगल लेखक पाहतो आहे. हॉवर्ड युनिर्व्हसिटी’ आणि ‘हार्डवर्क’ यावर केलेली निर्बुद्ध कोटीदेखील त्यानी ऐकली-पाहिली आहे. सरस्वतीचा अपमान आणि लक्ष्मीचं पूजन तो पाहतो आहे. पैसे मोजून मोजून हाताला घट्टे पडतात आणि त्यामुळे हळुवार स्पर्श समजेनासा होतो, तसं काहीसं तुमचं, माझं, समाजाचं आणि राज्यकर्त्यांचं झालं आहे का, असं लेखक स्वतःला विचारतो आहे. हताश बुद्धिवाद्यांची स्थलांतरं आणि त्यांचं मौनात जाणं तो पाहतो आहे.एक देश, एक भाषा, एक पुस्तक, एक संस्कृती असं काहीसं कोणीतरी म्हणतं आहे. लेखकाला यात ‘मेथड इन मॅडनेस’चा वास येतो आहे. पण हा केवळ मॅडनेस नाहीए. विचारपूर्वक केलेलं चिथावणीखोर विधानदेखील आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन संस्कृती अस्तित्त्वात नाही, ते धर्मही नाहीत, असलेच तर पंथ आहेत असंही हा कोणीतरी म्हणतो आहे. ऐकून चकित होणारे लोक संस्कृतीची व्याख्या वगैरे शोधू लागले आहेत. लेखक व्याख्या इत्यादीच्या घोटाळ्यात पडत नाही. त्याला बगलेमधली लपवलेली सुरी नेमकी दिसते आहे.लेखक बुचकळ्यात पडून समाजाकडे पाहतो आहे. समाजात विभाजनवादी निरर्थक, ___ पण अनर्थकारी, उत्तेजना वाढवणारा खेळ मांडला जातोय. आता, त्या पाठोपाठ कुठल्याशा सिनेमाचं समर्थनसुद्धा करण्यात येतं आहे. आता त्यामुळे, सिनेमाही तुमचा आणि आमचा झाला. कला विभाजित झाली. उपद्रव आणि उपद्रव. उन्माद आणि उन्माद.
जनतेच्या भोळ्या मनाशी चालवलेला हा खेळ लेखक पाहतो आहे. माणसांचं विभाजन होताना पाहतो आहे आणि विद्वेषाचं गणितही मांडलेलं पाहतो आहे. कोणीतरी म्हणतं आहे की, स्वातंत्र्य भीकेत मिळालंय. भिकेत मिळालं? म्हणजे स्वातंत्र्यसेनानी काय भीक मागत होते? पण निर्बुद्ध, दोन कवडीचीही किंमत नसलेल्या लोकांकडून स्वातंत्र्याचा अपमान होतो आहे हे आपण उघड्या डोळ्याने पाहतो आहोत. काही कथित साधू मुसलमानांचं शिरकाण करायचं म्हणतायत. ते असंही म्हणतायत की भारतीय संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांचा आणि त्यांच्या मुलांचाही मृत्यू होणार आहे. असा हास्यास्पद शाप देणारे हे साधू आहेत ? __लेखक एकदा गावी गेला होता. एका बड्या घराच्या अंगणात बांधलेली कुत्री त्याच्यावर अकारण भुंकू लागली. लेखकाने घरमालकाकडे तक्रार केली. त्याला म्हटलं की, तुमचे कुत्रे आमच्यावर भुंकत आहेत. घराचा मालक म्हणाला, आम्ही काही त्या कुत्र्यांना भुंकायला सांगितलेलं नाही. लेखक म्हणाला, पण तुम्ही त्यांना भुंकू नका असंदेखील सांगितलेलं नाही.लेखक पाहतो की, सरस्वतीचे उपासक दुःखी होतायत आणि लक्ष्मीची उद्धट उपासना चाललीय. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे. सर्वत्र दडे बसवणारी शांतता. कोणीच बोलत नाही. कोणीच हरकत घेत नाही. सर्वत्र आणि सर्वत्र ‘चतुर मौन’ पसरलेलं आहे. या मौनात स्वार्थदेखील आहे. तुच्छतादेखील आहे. हिशोब आणि व्यवहारदेखील आहे. सामान्य जनतेच्या दुःखाला चिरडणंदेखील आहे. भिती आणि दहशतदेखील आहे. प्रलोभनंदेखील आहेत. विनाशदेखील आहे.

१८) आत्महत्या!लेखकाने असं ऐकलं आहे की, कवी शंकर वैद्यांच्या कवितेतल्या पुस्तकांनी कपाटामध्येच आत्महत्या केल्या आहेत. उरलेल्या पुस्तकांना दिनांक २३ एप्रिलच्या जागतिक पुस्तकदिनाच्या दिवशी आत्महत्या करायच्यात म्हणे! त्याने असंही ऐकलं आहे की, याच कपाटात भारतीय संविधानानेदेखील आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. लेखक ऐकतो, लेखक पाहतो, लेखक चिंतित होतो. क्वचित कोणी बोलतं आहे, नाही असं नाही. काही कवी बोलतायत. अशोक बागवे नावाचा कवी ‘मौनाचा निःशब्द कोलाहल’ ऐकतो आहे. तो म्हणतो,“मौनाचा निःशब्द कोलाहल नंग्या तलवारी परजत निघून गेलेला थेट रक्ताच्या पल्याड”
आणि पुढे हा कवी सद्यःपरिस्थितीबद्दल बोलताना लिहितो,“आकाश ठणकतंय धरती सुन्न भरवसा उडून गेलायएकमेकांवरचा…..” भरवसा उडून गेलाय? माणसाचा माणसांवरचा? राज्यांचा केंद्रावरचा? केंद्राचा राज्यांवरचा? मित्राचा मित्रांवरचा ? समाजाचा समाजांवरचा? म्हणजे मग जगण्याचा आधार तरी काय आहे, लेखकाचा प्रश्न स्वतःला.तिकडे, परकीय नसलेला पण परकीय प्रदेशात राहिलेला एक कवी आश्वासनपूर्ततेची वाट पाहतो आहे. तो म्हणतो की, नियतीशी करार करून स्वातंत्र्य मिळालं. मग विधिच्या विधानात लिहिल्याप्रमाणे आश्वासनपूर्ती तर झालीच पाहिजे ना? जगण्याचे अधिकार तुम्हालाही आहेत मलाही आहेत. एक दिवस या दुःस्वप्नाचा अंत होईल आणि जनताजनार्दनचं राज्य येईल- और राज़ करेगी खुल्क-ए-ख़ुदा’ असं स्वप्नं तो कवी पाहतो आहे. खुल्क-ए-ख़ुदा म्हणजे जनताजनार्दन-आम जनता. लेखक त्यामुळे आशावादी आहे. समाजदेखील आशावादी असतो. ‘इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असा उद्घोष समाजाने पूर्वीच केलेला आहे. कालपर्यंत लेखक ऐकत होता. आज लेखक हे सगळे पाहतो आहे. उद्या कदाचित तो बोलेल. पण मग त्याने बोललं पाहिजे. त्याने बोललंच पाहिजे. तो न बोलला तर प्रमाद होईल. तो न बोलला तर तो ‘चतुर मौनाचा’ बळी ठरेल. लेखक आशावादी आहे. लेखक सत्याग्राही आहे, तो सत्यान्वेषी आहे. तो सत्याभिलाषी आहे. सत्याचा उच्चार करणं, उच्चरवाने सत्याचा उद्घोष करणं ही लेखकाची भूमिका असते, धर्मही असतो, कर्तव्यदेखील असतं. तो बोलेल, कदाचित उद्या. कदाचित सांगेल तो सर्वांना की, मरणासन्न आणि अंधारात लपून राहिलेला कोंबडा दिवस उगवताना सत्यसूर्याला सलाम करतो आणि आपल्या लखलखीत आरवण्याने अंधाराची झिरझिरीत चादर फाडून टाकतो. त्याचं आरवणं निर्भय आहे. आणि सत्यदेखील शपथेवर साक्ष देतं आहे, पण सत्याची साक्ष विवेकाची साक्ष आहे. ही साक्षदेखील उच्चरवाने दिली जाते आहे. आणि सत्य बोलण्याचा धर्म स्वीकारणारे आरसेदेखील तडजोड न करता सत्यच सांगत आहेत. आणि म्हणून इथे लेखकाला जोतिबा फुले यांची कविता आठवते आहे. जोतिबांनी सत्याचा उद्घोष केला आहे. सत्य सर्व धर्माचे माहेर आहे, सत्य सुखाचा आधार आहे, त्या व्यतिरिक्त सर्वत्र अंधःकार आहे आणि सत्याचं बळ पाहून बहुरूपी भयभीत होत आहेत, असं जोतिराव फुले म्हणतायत. राहूचे छद्मरूपी उपासक सत्याच्या प्रकाशामुळे भयभीत होतील अशी आशा त्यामुळे लेखकाला वाटते आहे. लेखक असं बरंच काही आठवतो आहे. आणि होऽ!कोरोनाने आपल्याला सोशल डिस्टन्सिंग शिकवलं. म्हणजे माणसाने माणसापासून दूर जाणं. ते आपण करीत राहिलो. कोरोनाने आपल्याला हात धुवायला शिकवलं. पण ज्यांच्या हाताला रक्त लागलं आहे, किंवा पापाचा स्पर्श झाला आहे ती मंडळी शेक्सपिअरच्या त्या नाटकातल्या प्रमाणे ‘वॉश माय हँडस्’ असं म्हणतदेखील नाहीएत.- लेखक हे सगळं पाहतो आहे. सगळं आठवतो आहे. पण हे आठवलेलं त्याने सांगितलं मात्र पाहिजे. सत्यवदन हा लेखकाचा धर्म. निर्भयता हा त्याचा धर्म. त्या धर्माला तो जागला पाहिजे. सर्जनबळाचं विस्मरण त्याला, आणि समाजाला परवडणार नाही.तेव्हा, लेखकाची भूमिका काय असते, तुमची भूमिका काय आहे असे प्रश्न तुम्ही मला विचारता म्हणून तुम्हाला मी हे विस्तारने सांगितलं. तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा ‘अच्छे दिवस’ येतील, असा मला विश्वास वाटतो. लेखकाने आशावादी असणं त्याला क्रमप्राप्त आहे आणि त्याला दुसरा कोणता तरणोपायदेखील नाही. आशावादी असणं ही त्याची अपरिहार्यतादेखील आहे. आशावादी असणं या व्यतिरिक्त तो दुसरं काय करू शकतो?माझे हे दोन शब्द आपण शांतपणे ऐकून घेतलेत याबद्दल मी आपला आभारी आहे.धन्यवाद!