ऊर्जा संवर्धन : आज व उद्यासाठी

“आम्हाला हे पर्यावरण आमच्या पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळाले नाही, तर ते आपण भविष्यातील पिढीकडून उधार घेतले आहे”. मर्यादित नैसर्गिक संसाधने व अमर्यादित गरजा, यामुळे नैसर्गिक संसाधने संपण्याचा व पर्यावरणीय प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा प्रत्येकाने गरजांच्या पूर्तीसाठी पर्यावरणातील संसाधनाचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. ती संसाधने संवर्धनाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.  

प्रामुख्याने ऊर्जेसाठी आपण कोळसा, तेल व नैसर्गिक वायू या खनिज इंधनाचा वापर करतो. खनिज इंधनाचा ऊर्जेसाठी वापर केल्याने हरितगृह वायूचे उत्सर्जन होऊन जागतिक तापमानवाढ व हवामान बदल या समस्या निर्माण झालेल्या आहेत. खनिज इंधनाचे मर्यादित साठे असल्याने भविष्यात टंचाई निर्माण होऊन विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तेव्हा उपलब्ध खनिज इंधनाचा वापर काटकसरीने, कार्यक्षमतेने करणे आवश्यक आहे. त्यासोबतच सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत या ऊर्जेच्या शाश्वत व स्वच्छ स्रोतांच्या वापरावर अधिक भर देणे दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. ऊर्जा संवर्धन ही एक व्यापक संकल्पना आहे. पर्यावरण संवर्धनाचे एक अंग आहे. प्रत्येकाने ऊर्जा बचतीचा, कार्यक्षम वापराचा व ऊर्जेच्या शाश्वत स्रोतांच्या वापराचा संकल्प केला पाहिजे. उज्ज्वल भविष्यासाठी आपण हे सहज करू शकता.  

वीज ही दैनंदिन गरज बनली आहे. साधारणपणे विजेवर चालणारी पाच ते सहा उपकरणे प्रत्येकाच्या घरात आहेत. बल्ब, ट्यूब, सीएफएल, पंखा, इस्त्री, दूरचित्रवाणी संच (टी. व्ही.), रेफ्रिजरेटर, मिक्सर, गिझर, संगणक, रेडिओ, वॉशिंग-मशीन, ओव्हन, टोस्टर, घरगुती पाणी पंप इत्यादी उपकरणांच्या किती वेळ वापरासाठी एक युनिट वीज खर्च होते, हे समजून घेतल्यास प्रचलित वापरात बदल करून बचतीचा मार्ग सापडेल. एक युनिट वीज म्हणजे 1 केडब्ल्यूएच (किलो वॅट प्रति तास) होय. 100 वॅट क्षमतेचे 10 बल्ब एक तास चालू राहिल्यास एक युनिट वीज खर्च होते. अर्थात विद्युत उपकरण किती वॅट क्षमतेचे, ते किती वेळ चालू राहिले, या आधारे किती युनिट वीज खर्च होते याचा हिशेब मांडता येतो. विद्युत उपकरणांच्या क्षमता व वयोमानानुसार विजेच्या वापरात बदल होऊ शकतो.   

विद्युत उपकरणे व त्यांचा वीज वापर तपासण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळाच्या ग्राहक पोर्टलमधील  वीजवापर परिगणकावर (कन्जंप्शन कॅल्क्युलेटर) आहे.  

दैनंदिन जीवनात ऊर्जा बचतीचे सोपे मार्ग

१.घरातील, कार्यालयातील व सार्वजनिक ठिकाणी (उदा. बस स्थानक, रेल्वे स्थानक व इतर) पंखे, विद्युत दिवे व इतर विद्युत उपकरणे गरज नसताना बंद करावेत व अनावश्यक वापर टाळावा. त्यातून वीज बचतीसह वैयक्तिक व सार्वजनिक संपत्तीची बचत होईल.

२.पारंपारिक विद्युत दिव्याऐवजी योग्य क्षमतेच्या एलईडी विद्युत दिव्यांचा वापर करावा. उदा.100 वॅट पारंपरिक दिव्याच्या तुलनेत 16 वॅटचा एलईडी दिव्यासमान प्रकाश देतो. विजेची बचत पर्यायाने पैशाची, पर्यावरणाची बचत करतो.

३.विद्युत उपकरणे, वाहने योग्य दर्जा व मानांकनाची वापरावीत. घरातील वीजजोडणी सुस्थितीत असल्याची व योग्य पद्धतीने केल्याची खात्री करून घ्यावी. जुनी व कालबाह्य विद्युत उपकरणे व वाहनांचा वापर टाळावा. त्यामुळे अपघाताचा धोकाही टळेल.

४. पर्यावरणस्नेही ऊर्जा संवर्धन –सौर ऊर्जेच्या वापरास प्राधान्य द्यावे. उदा. सौर छत,सौर कुकर,सौर बंब, सौर चुली, सौर दिवे आदी५. घराचे, इमारतीचे बांधकाम करताना घरात/इमारतीत सूर्यप्रकाश खेळता राहील, किमान दिवसाच्या वेळी विद्युत दिव्यांची गरज भासू नये, अशा पद्धतीने करावे.

६. प्रवासासाठी खाजगी वाहनाऐवजी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरास प्राधान्य द्यावे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आर्थिक बळकटी मिळेल. डिझेल, पेट्रोल या इंधनाची बचत होईल. ऊर्जा संवर्धनासह देशाकडील परकीय चलन वाचण्यास मदत होईल.

७. नजीकच्या अंतरासाठी सायकलचा वापर करावा. इमारतीत चढ-उतार करताना लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा. 

८. जलसंवर्धनातून ऊर्जा बचतीचा मार्ग- प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरले पाहिजे. ग्रामपंचायती/ नगरपालिका/सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे आपल्या घरापर्यंत नळाद्वारे येणारे पाणी, विंधन विहिरींतून पाण्याचा उपसा, घराच्या / इमारतीच्या छतावरील टाकीतील पाणी या सर्वांकरिता विद्युत ऊर्जेचा / विजेचा वापर केला जातो. घरात अनेकवेळा नादुरुस्त नळ तोट्यांमुळे (चावी) पाणी वाया जाते, त्यावेळीच दुरुस्त करणे आवश्यक आहे. पाण्याचा अयोग्य पद्धतीने, गरजेपेक्षा अधिक वापर म्हणजे विजेचा अपव्यय होय. तेव्हा जलसंवर्धन केल्यास विजेचीही बचत होईल. आपले मासिक वीजबिलही कमी येण्यास मदत होईल.

९. शेतकऱ्यांनी शेतीपंपाला योग्य क्षमतेचे कॅपॅसिटर बसवून घ्यावेत. त्यामुळे विजेचा भार कमी होऊन मोटार व रोहित्र जळण्याचे, नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होते, वितरण हानी कमी होऊन वीज बिलात बचत होते.१०. प्रत्येक वस्तूच्या निर्मितीसाठी ऊर्जा खर्ची पडलेली असते. तेव्हा मर्यादित वापर, पुनर्वापर  पुनर्निर्मिती (Reduce, Reuse, Recycle) ह्या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे. त्यामुळे ऊर्जा संवर्धनासह ‘मर्यादित साधने-अमर्यादित गरजा’ यामध्ये संतुलन साधणे शक्य होईल.   दैनंदिन जीवनात आपण साध्या सोप्या उपायांचा अवलंब करून ऊर्जा संवर्धन करू शकतो. तेव्हा ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक नागरिकाने आपले योगदान दिले पाहिजे.

– किशोर खोबरे

जनसंपर्क अधिकारी,

महावितरण