भाजपातर्फे सोमवारी राज्यभर वीज बिलांची होळी

मुंबई, 22 नोव्हेंबर 2020

महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली चुकीची बिले माफ करण्यास नकार दिल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या सोमवार 23 नोव्हेंबर रोजी महाआघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे. या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी माहिती भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

श्री.पाठक यांनी या पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले पाठवली गेली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. तसेच या भरमसाठ बिलांची वसुली करण्याचेही जाहीर केले आहे. आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा वीज बिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. परिणामी नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे श्रमिक, फेरीवाले, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक या वर्गाला अर्थसाह्य करायला हवे होते. तसे न करता भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आली. सरकारच्या या मनमानी विरोधात भाजपाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते सोमवारी वीजबिलांची होळी करतील, असे श्री.पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे.