मोबाइल शॉपीचे शटर उचकटून ३१ मोबाइलची चोरी

औरंगाबाद ,१७ एप्रिल  /प्रतिनिधी :- मोबाइल शॉपीचे शटर उचकटून ३१ मोबाइलसह, मोबाइल अॅक्‍सेसरीज, स्‍पेअर पार्ट आणि संगणकाचे स्‍पेअर पार्ट असा सुमारे दोन लाख ४२ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरणार्यांपैकी एकाला एमआयडीसी वाळुज पोलिसांनी शनिवारी दि.१६ रात्री बेड्या ठोकल्या.शेख शिराज शेख सईद (१९, रा. कांसबरी दर्गा, पडेगाव) असे आरोपीचे नाव असून त्‍याला २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.व्‍ही. सपाटे यांनी रविवारी दि.१७ दिले.

कांचनवाडी परिसरातील रास सैनिक विहार येथे राहणारे सुनिल जगन्‍नाथ जाधव (३५) यांचे एमाआयडीसी वाळूज परिसरातील माहराणा प्रताप चौकात सदगुरु नावाने मोबाइल शॉपी आहे. १४ एप्रिल रोजी दैनंदिन व्‍यवहारकरुन रात्री साडेनऊ वाजेच्‍या सुमारास सुनिल जाधव हे दुकानास कुलूप लावून घरी गेले होते. संधी साधत चोरट्यांनी त्‍यांच्‍या मोबाइल शॉपीचे शटर उचकटून ३७ हजार २०० रुपयांचे नविन ३१ मोबाइल, ५५ हजारांची अॅक्‍सेसरिज, ४० हजारांचे मोबाइल स्‍पेअर पार्ट आणि एक लाख १० हजार रुपयांचे संगणक स्‍पेअर पार्ट असा सुमारे दोन लाख ४२ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. दुसर्या दिवशी सकाळी गाळा मालकाने सुनिल जाधव यांना फोन करुन दुकानात चोरी झाल्याचीबाब सांगितली. प्रकरणात एमाआयडीसी वाळुज पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी दुकानाच्‍या सीसीटिव्‍ही कॅमेऱ्या आधारे दोघा आरोंपैकी एक शेख शिराज याला बेड्या ठोकल्या. त्‍याने साईल (रा. बुढीलाईन, सिटीचौक) याच्‍या साथीने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील अर्चना लाटकर यांनी गुन्‍ह्यातील ऐवज जप्‍त करायचा आहे. आरोपीचा साथीलदार साईल याला अटक करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.