कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा विजय

महाविकास आघाडी सरकारच्या एकजुटीचा विजय

कोल्हापूर,१६ एप्रिल  /प्रतिनिधी :-महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात रंगलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा १८ हजार ८०० मतांनी दणदणीत विजय झाला आहे. जाधव यांना ९२ हजार २२६ मते मिळाली. तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली.उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिडवणुकीत जनतेने महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने कौल लावल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी प्रचंड मताधिक्क्याने हा गड राखून धरला. या विजयामुळे राज्यातील जनतेचा महाविकास आघाडी सरकारवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र स्पष्ट होते.उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या एकजुटीचा विजय आहे. साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून मतदारांनाही धमकावणाऱ्या भाजपला राज्यातील जनतेने या निकालातून सणसणीत चपराक लगावली आहे.

May be an image of 3 people and people standing

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भरभक्कम आघाडी घेतली होती. मतमोजणीच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात भाजपच्या सत्यजीत कदम यांचा बालेकिल्ला असणाऱ्या परिसरातील मते मोजण्यात आली. या भागात सत्यजीत कदम आघाडी मिळवून जयश्री जाधव यांना मागे टाकतील, असा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला.

विजयी उमेदवार जयश्री जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नारायण स्वामी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कापसे, संतोष कणसे, रंजना बिचकर आदी उपस्थित होते.

विजयी उमेदवार श्रीमती जाधव यांना प्रमाणपत्र देतेवेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री जाधव यांना 97 हजार 332 तर भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना 78 हजार 25 इतकी मते मिळाली.

कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात लढलेल्या गेलेल्या या निवडणुकीत ‘आण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ ही टॅगलाईन खरी करत महाविकास आघाडीने एकत्रित येत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा मोठा पराभव केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक व कार्यकर्त्‍यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आताषबाजी करत एकच जल्लोष केला.

काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती.

जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार

कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.

उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते खालीलप्रमाणे-

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते

जाधव जयश्री चंद्रकांत (आण्णा) इंडियन नॅशनल काँग्रेस 97332

सत्यजीत (नाना) कदम भारतीय जनता पार्टी 78025

यशवंत कृष्णा शेळके नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड) 326

विजय शामराव केसरकर लोकराज्य जनता पार्टी 165

शाहीद शहाजान शेख वंचित बहुजन आघाडी 469

देसाई सुभाष वैजू अपक्ष 98

बाजीराव सदाशिव नाईक अपक्ष 66

भोसले भारत संभाजी अपक्ष 43

मनिषा मनोहर कारंडे अपक्ष 49

माने अरविंद भिवा अपक्ष 58

मुस्ताक अजीज मुल्ला अपक्ष 96

मुंडे करुणा धनंजय अपक्ष 134

राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक अपक्ष 114

राजेश सदाशिव कांबळे अपक्ष 111

संजय भिकाजी मागाडे अपक्ष 233

नोटा – 1799

रिजेक्टेड 36