गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार; न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सातारा ,२४ जानेवारी / प्रतिनिधी :-सोशल मिडीयावरील ‘लावणी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी गौतमी पाटील आता चांगलीच अडचणीत येणार आहे. कारण, सातारा न्यायालयाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गौतमी पाटील अनेक वादांमुळे चर्चेत राहिली आहे. कधी सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील डान्स, तर कधी तिच्या कार्यक्रमामध्ये झालेले गदारोळ. यामुळे गेले काही महिने ती सतत कॅचर्चेत राहिली आहे. मात्र, न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आता तिच्यासमोर अडचणी वाढणार आहेत.

काही दिवसांपूर्वी याचिकाकर्त्या प्रतिमा शेलार यांनी गौतमी पाटीलविरोधात तक्रार दाखल केली होती. ती अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. गौतमी पाटील तिच्या नृत्यामध्ये अश्लील हावभाव करत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रतिमा शेलार यांच्या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान, अनेकदा गौतमी पाटीलचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर वेगवेगळ्या स्तरांतून तसेच, लावणी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी तिच्यावर टीका केली. यासर्व वादावर तिने जाहीर माफीदेखील मागितली होती.