महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई ,८ एप्रिल /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यासाठी राज्य  शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री  विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मंत्री श्री. वडेट्टीवार  यांनी याबाबत सांगितले की, राज्यातील इतर मागास प्रवर्गातील दुर्बल घटकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींना अल्प व्याज दराने कर्ज  देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासात महामंडळाचे बहुमूल्य योगदान आहे त्यामुळे या महामंडळाला  संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.

अंधश्रध्देच्या विळख्यातून मुक्त करून, समाजाला स्वच्छतेचा व शिक्षणाचा कानमंत्र देण्याचे महनीय कार्य संत गाडगेबाबा यांनी केले आहे. त्यांचे स्मरण राहावे यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी महामंडळाचा नामविस्तार संत गाडगेबाबा यांचे नावे करण्याबाबत सूचना दिल्या  आहेत.त्यास महामंडळाच्या  १५ मार्च २०२२ रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या अंतिम मान्यतेस्तव सादर करण्यात आला आहे.