एसटी चालकाला दिलासा;बडतर्फ नोटीसला स्थगिती 

औरंगाबाद,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाला देण्यात आलेल्या बडतर्फीच्या कारणे दाखवा  नाेटीस मधून  दिलासा मिळाला आहे. या  नोटीसला  कामगार न्यायालयाचे (द्वितीय) न्या. एस. एस. सहस्रबुद्धे यांनी  अंतरिम स्थगिती दिली आहे. 

याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत रामराव वाघमाेडे यांना १६ जानेवारी २०२३ राेजी बडतर्फ करण्यात का येऊ नये, अशी नाेटीस बजावली. या नाेटीसविराेधात रामराव वाघमाेडे यांनी अॅड. पराग शहाणे यांच्यामार्फत याचिका दाखल करून कामगार न्यायालयात धाव घेतली. वाघमाेडे यांच्यावर मद्यपानाचा आराेप ठेवला हाेता. तर याचिकेतून वाघमाेडे यांनी मद्यपानाचा आराेप नाकारल्याचे नमूद करून काेणत्याही कायदेशीर पुराव्याशिवाय व साक्षी पुराव्याशिवाय दाेषी धरण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यावरून सुनावणीनंतर कामगार न्यायालयाने वाघमाेडे यांच्या बडतर्फी नाेटिशीला अंतरिम स्थगिती दिली. याप्रकरणी  परिवहनकडून एस. व्ही. कुपटेकर यांनी काम पाहिले.