विभागीय आयुक्त केंद्रेकर यांची वैजापूरला अचानक भेट ; पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत

वैजापूर,१ एप्रिल  /प्रतिनिधी :-

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी अचानक वैजापुरला भेट दिली. या भेटीत स्वच्छ व सुंदर कार्यालय योजनेअंतर्गत त्यांनी तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व उपविभागिय कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे कार्यालय प्रमुखांची चांगलीच भंबेरी उडाली. विशेषत: तहसिल व पंचायत समिती कार्यालयात त्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती व स्वच्छतेचा अभाव आढळुन आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रेकर यांनी खडे बोल सुनावत कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

तहसील कार्यालयात तर केंद्रेकर यांच्यासमोरच सर्वसामान्य नागरिकांनी पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत तक्रारी मांडल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे प्रशासकिय वर्तुळात अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी म्हणुन ओळखले जातात. शुक्रवारी त्यांनी स्वच्छ व सुंदर कार्यालय योजनेअंतर्गत पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. तहसिलदार राहुल गायकवाड व गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांच्यासमवेत कार्यालयाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना इमारतीच्या मध्यवर्ती भागात वाढलेल्या झाडाझुडुपांची व्यवस्थित छाटणी न केल्याने अस्वच्छता झाल्याचे आढळुन आले. तसेच आरोग्य व पशुवैद्यकिय विभागाचे दप्तर असलेली कपाटे बेवारसपणे एका कोपऱ्यात लावलेली दिसुन आली. ही कपाटे व्यवस्थित लावुन नको असलेल्या फर्निचरची योग्य विल्हेवाट लावण्याचा सल्ला त्यांनी दिला. या कार्यालयातील तुटलेल्या फरशीचे फोटोही त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये घेतले. तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात भेट दिली तेव्हा नागरिकांनी आम्हाला धान्य मिळत नाही, नवीन शिधापत्रिका मिळत नाही, शिधापत्रिका ऑनलाईन केली जात नाही अशा अनेक तक्रारी मांडल्या. याबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले. उपविभागिय अधिकारी कार्यालयास भेट दिली त्यावेळी उपविभागिय अधिकारी माणिक आहेर, अव्वल कारकुन दीपक त्रिभुवन उपस्थित होते.

अधिकाऱ्यांचा दौरा व ‘ एप्रिल फुल ‘

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर वैजापुरला येणार याबाबत कुणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे हे ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनाला पाठवावयाच्या अहवालाच्या कामात व्यस्त होते. यानिमित्त ते दोघेही दौऱ्यावर होते. मात्र केंद्रेकर आल्याचा फोन येताच दोघांनी दौरा अर्धवट सोडुन वैजापूरची वाट धरली. तर दुसरीकडे उपविभागिय अधिकारी माणिक आहेर हे ही केंद्रेकर यांच्या दौऱ्याबाबत अनभिज्ञ होते. त्यातच आज एप्रिल महिन्याचा पहिला दिवस असल्याने एप्रिल फुलच्या नादात सर्वांचाच गोंधळ उडाला.