खुलताबाद तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी एक कोटीचा निधी मंजूर

आ.सतीश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला पुन्हा एकदा यश

औरंगाबाद- खुलताबाद तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळे म्हणून ओळख असलेल्या वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन येथे विविध विकास कामांसाठी राज्याच्या पर्यटन विभागाने एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे.

New Doc 2021-12-24 16.12.58

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन येथे विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करावा यासाठी आ.सतीश चव्हाण शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात त्यांनी 24 डिसेंबर 2021 रोजी राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन सदरील ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. राज्याच्या पर्यटन विभागाने 29 मार्च 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करून पर्यटन विकास योजना सन 2021-22 अंतर्गत नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सदरील ठिकाणी एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठे यश आले आहे.

Sulibhanjan, Khultabad, Aurangabad in the city Khuldabad
सुलिभंजन

          यामध्ये वेरूळ येथील श्री.क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर भक्त निवास परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी रू.10 लक्ष, वेरूळ येथील भक्त निवास परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी रू.10 लक्ष, सुलिभंजन येथे दत्त मंदिर परिसरात संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी रू.10 लक्ष, म्हैसमाळ येथे येणार्‍या भाविकांसाठी स्वयंपाक घराचे शेड बांधकाम करण्यासाठी रू.10 लक्ष, म्हैसमाळ येथील मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या येळगंगा नदीवर घाट बांधकाम करण्यासाठी रू.10 लक्ष, म्हैसमाळ येथे भाविकांच्या वाहनासाठी वाहन तळ तयार करण्यासाठी रू.10 लक्ष, वेरूळ येथील वेरूळ महामार्ग ते श्री.रामदास पाटील यांच्या घरापर्यंत सी.सी.रोड तयार करण्यासाठी रू.10 लक्ष, वेरूळ येथील ज्ञानेश्वर महाराज मठ ते लक्ष्मी विनायक मंदिरापर्यंत सी.सी.रोड तयार करण्यासाठी रू.10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. 31 जानेवारी 2022 रोजी शासन निर्णयाअन्वये सुलीभंजन रस्त्यासाठी देखील पर्यटन विभागाने एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता. यासाठी देखील आ.सतीश चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लेणी परिसरात देखील मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार याठिकाणी पर्यटकांना बसण्यासाठी बाकडे आणि छत्रीचे बांधकाम करण्यासाठी रू.10 लक्ष, व याच लेणीजवळ प्रेक्षणीय स्थळाचे बांधकाम करण्यासाठी रू.10 लक्ष रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.