अनुभवी सदस्य निवृत्त होतात तेव्हा सभागृहामध्ये पोकळी जाणवते-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी निवृत्त होत असलेल्या राज्यसभा सदस्यांना निरोप दिला

नवी दिल्ली,३१ मार्च /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निवृत्त होत असलेल्या राज्यसभा सदस्यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पंतप्रधानांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या अनुभवाचे मोल सगळ्यांच्या लक्षात आणून दिले आणि ते म्हणाले की, सभागृहातील उर्वरित सदस्यांना, आज निघून जात असलेल्या सदस्यांनी केलेले कार्य तसेच पुढे सुरु ठेवावे लागेल म्हणून काही सदस्यांच्या निवृत्तीसोबत उर्वरित सदस्यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.

हे सभागृह म्हणजे संपूर्ण देशाच्या भावना,प्रेरणा, वेदना आणि आनंदाचे प्रतिबिंब आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सभागृहातील सदस्य म्हणून आपण सभागृहाप्रती योगदान देत असतो हे जरी खरे असले तरीही हे सभागृह आपल्याला दररोज आपल्या देशाच्या वैविध्यपूर्ण समुदायांनी बनलेल्या व्यवस्था आणि त्यांच्या भावभावना अनुभवण्याची संधी देत असल्यामुळे या सभागृहाकडून आपल्यालाही बरेच काही मिळते हे देखील तितकेच सत्य आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आज काही सदस्य सभागृहातून निवृत्त होत असले तरीही ते सर्वजण देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये त्यांचा समृध्द अनुभव घेऊन जातील

भविष्यातील पिढ्यांना उपयुक्त संदर्भ मिळण्याच्या दृष्टीने या सदस्यांनी त्यांच्या आठवणी लिहून ठेवाव्यात अशी सूचना देखील पंतप्रधानांनी यावेळी केली. देशाच्या या सभागृहातील सदस्य देशाच्या प्रगतीच्या दिशेला आकार देतात आणि त्यावर प्रभाव टाकत असतात म्हणून त्यांच्या आठवणी संस्थात्मक पद्धतीने देशाचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकतील असे ते म्हणाले.

निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी यापुढे देशवासियांना ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे अशी विनंती पंतप्रधान मोदी यांनी त्यांना केली.