कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना वेतनपट माहिती : डिसेंबर 2021 मध्ये 14.60 लाख सदस्यांची भर

नवी दिल्ली ,२० फेब्रुवारी / प्रतिनिधी :- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर  केलेल्या तात्पुरत्या वेतनपटाच्या माहितीवरून असे अधोरेखित होत आहे, की  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने डिसेंबर 2021 मध्ये 14.60 लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली आहे.

गतवर्षासोबत तुलना केल्यास असे दिसून येत आहे,की   डिसेंबर 2021 मधे एकूण 12.54 सदस्यांची नोंदणी झाली असून मागील वर्षाच्या संबंधित महिन्याच्या तुलनेत वेतनपटामध्ये सुमारे 2.06 लाख  अधिक सदस्यांची वाढ झाली आहे.तसेच डिसेंबर 2021 या महिन्यासाठी, नोव्हेंबर 2021 च्या गतवर्षीच्या तुलनेत एकूण सदस्यांच्या संख्येत 19.98% इतकी वाढ झाली आहे.

जुलै 2021 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमधून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची संख्या कमी होण्याचा कल आहे.वेतनश्रेणी डेटाची वयोगटानुसार तुलना असे दर्शवते, की डिसेंबर, 2021 मध्ये  22-25 वर्षे वयोगटातील  एकूण 3.87 लाख सदस्यांची सर्वाधिक संख्येने नावनोंदणी झाली आहे. 18-21 वयोगटातील सुमारे 2.97 लाख सदस्यांची उत्साहवर्धक  भर यात पडली आहे.डिसेंबर, 2021 मधल्या  एकूण सदस्यांमध्ये 18-25 वयोगटातील सदस्यांचे योगदान  सुमारे 46.89% आहे. यामुळे असे सूचित होते की प्रथमच नोकरी मिळवणारे अनेकजण संघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये मोठ्या संख्येने सामील होत आहेत.

वेतनपट आकडेवारीची राज्यवार तुलना करता असे दिसून येते  की महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या आस्थापने आघाडीवर असून महिन्यादरम्यान अंदाजे 8.97 लाख सदस्यांची भर दर्शवत  आहेत.

लिंगनिहाय विश्लेषण दर्शविते की वेतन पटात महिन्याभरात 3 लाख महिला सदस्यांची  भर झाली  आहे.  डिसेंबर 2021 मध्ये एकूण सदस्यांच्या वाढीमध्ये महिला नोंदणीचा ​​वाटा अंदाजे 20.52% आहे.

ही वेतनपट माहिती तात्पुरती आहे कारण कर्मचार्‍यांचे  रेकॉर्ड अद्ययावत करत, डेटा तयार करणे ही एक सतत सुरू असणारी  प्रक्रिया आहे.  त्यामुळे मागील महिन्यातील माहीती,  दर महिन्याला अद्ययावत  केली जाते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना,  सदस्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी, पेन्शन लाभ आणि सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि विमा लाभ देते.