नांदेड येथे भव्य मध्यवर्ती ग्रंथालय निर्मितीचा मानस – पालकमंत्री अशोक चव्हाण

भाग्यनगर येथील कै. नरहर कुरुंदकर यांच्या पुतळा सुशोभीकरण व म्युरलचे लोकार्पण

नांदेड,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  मराठी साहित्याच्या प्रांतात नरहर कुरुंदकर यांचे एक वेगळे स्थान आहे. विचारवंत म्हणूनही त्यांनी जी सडेतोड मांडणी केली आणि परखड विचार ठेवले त्याला तोड नाही. त्यांचा विचार, त्यांचे लिखाण, त्यांची प्रेरणा नव्या पिढी पर्यंत पोहोचावी यासाठी माझी कटिबद्धता सुरूवातीपासून आहे. मराठवाड्याच्या साहित्य प्रांतातील गोदावरीच्या काठाने दिलेले योगदान लक्षात घेऊन नांदेड येथे सर्व साहित्यांची ज्ञानसंपदा जतन व्हावी, वाचकांपर्यंत ही ग्रंथसंपदा पोहोचावी, वाचन संस्कृती वाढावी यादृष्टिने नांदेड येथे चांगल्या प्रकारचे मध्यवर्ती ग्रंथालय व्हावे हा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत कै. नरहर कुरुंदकर यांच्या भाग्यनगर येथील पुतळा परिसर सुशोभीकरण व म्युरलच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा अ.भा.नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. दत्ता भगत, आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, दै. प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, शामलताई पत्की, अपर्णा नेरलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

इतर महानगराच्या तुलनेत आपलेही महानगर अधिक सुविधा पूर्ण व्हावे यासाठी मी दक्ष आहे. यासाठी आपण विविध विकास कामे नियोजित करून बहुतांश कामांना मंजूरीही दिली आहे. राज्यातील महानगरांच्या तुलनेत नांदेड हे महानगर शिक्षण, कला, संस्कृती या सर्व बाजुने अधिक सुविधा पूर्ण असेल याचा आग्रह मी धरला असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या स्थानिक संस्था आहेत त्याही प्रयत्नांची शर्थ करत आहेत. मनपाही नांदेड महानगराच्या वाढत्या गरजांना पूर्ण करण्याच्यादृष्टिने अधिक सजग असल्याचे त्यांनी सांगितले.मी मुख्यमंत्री असतांना कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकासाठी दोन ते अडीच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता. याला पुढे शासन पातळीवर पाठपुरावा करणे आवश्यक होते. हे स्मारक चांगले व्हावे यासाठी मी प्रयत्नशील असून शासनस्तरावर योग्य तो निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

सन 1962 नंतर भाग्यनगर उदयास आले. तत्पूर्वी नांदेड मधील सर्व बुद्धीवादी मंडळी होळी पासून भाग्यनगरला स्थिरावल्याने हे एक बुद्धीमंडळीचे केंद्र झाले. कुरुंदकर गुरुजी यांनी केवळ भाग्यनगरलाच नव्हे तर बुद्धीवादी व विचारवंताचा गौरव मराठी सारस्वताला दिल्याचे प्रतिपादन प्रा. दत्ता भगत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कुरुंदकर हे विचारवंत म्हणून वेगळे होते. हा वेगळेपणा त्यांनी आपल्या समाज केंद्रीय विचारातून आणि वर्तमानाशी सुसंगत विचारधारेतून पुढे नेला. त्यांनी आपल्या पुस्तकांना भजन, यात्रा, शिवरात्र जागर अशी नावे का दिली असावीत याचा जेंव्हा आपण विचार करतो तेंव्हा त्यांच्या विचारातील वेगळेपण आपल्या लक्षात येते. परीवर्तनासाठी आवश्यक असलेला एकच मुद्दा जेंव्हा वारंवार सांगावा लागतो त्या प्रक्रियेला भजन म्हणून, याची तुलना भजन म्हणून असल्याने त्यांनी भजन नाव दिले असावे, असे प्रा. दत्ता भगत यांनी सांगितले.

दिनांक 14 जुलै ही श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांची जन्म तारीख आहे तर 15 जुलै ही नरहर कुरुंदकर यांची जन्म तिथी आहे. त्यांचा स्वर्गवासही एकाच महिन्यातला आहे. हा निव्वळ योगा-योग असून आज मराठी भाषा दिनानिमित्त कै. नरहर कुरुंदकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व म्युरलचे लोकार्पण होत असल्याचा अधिक आनंद झाल्याचे प्रतिपादन आमदार अमर राजूरकर यांनी केले. नांदेड महानगरात होत असलेल्या विविध विकास कामांचा गौरवपूर्ण उल्लेख करून नांदेड महानगराच्या, कुरुंदकरांच्या कार्याला, योगदानाला आणि साहित्याला साजेसे हे कार्य असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.

यावेळी शामलताई पत्की यांनी मनोगत व्यक्त करून स्व. शंकरराव चव्हाण व कै. नरहर कुरुंदकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. शंकरराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा पुढे नेणारे तेवढेच समृद्ध नेतृत्व अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातून मिळाल्याने आम्ही नांदेडकर भाग्यवान असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख शामलताई यांनी केला. इथला नेतृत्वातील प्रगल्भतेबद्दल त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर्णा नेरलकर यांनी केले.