गोदावरी नदीवरील पुलासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 20 कोटींचा निधी मंजूर- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

वैजापूर ,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- केंद्रीय निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्ते व अन्य विकासाची कामे करण्यात येणार असून वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलासाठी  केंद्रीय अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

Image

केंद्रिय अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ नसली तरी प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या माध्यमातुन देशात रस्ते, रेल्वे, जलप्रवास, हवाई प्रवास, बंदरे, मोठ्या प्रमाणावर वाहतुक व साठवणुक या मुलभुत सुविधांचा विकास करुन भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यात येणार आहे. सध्या अर्थव्यवस्था वाढीच्या स्थितीत असुन आयएमएफ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या म्हणण्यानुसार आगामी काळात वाढीचा दर हा नऊ टक्क्यांपर्यंत जाणार आहे‌. असे केंद्रिय अर्थ राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांनी सांगितले. 

Image

भारतीय जनता पक्षाच्या तालुका शाखेतर्फे आज तालुक्यातील खंडाळा, शिवराई, महालगाव येथे प्रवेश सोहळा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त वैजापूर येथे आल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

Image

यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, सहकार आघाडीचे ज्ञानेश्वर जगताप, उद्योग आघाडीचे कैलास पवार, अल्पसंख्यांक आघाडीचे नबी पटेल, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, डॉ. राजीव डोंगरे, प्रभाकर गुंजाळ, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत उपस्थित होते.

Image

डॉ. कराड म्हणाले की, अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर मुलभुत सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याने रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल‌. लवकरच क्रिप्टोकरन्सीच्या धर्तीवर डिजिटल भारतीय चलन सुरु करण्यात होणार असून त्यासाठी आरबीआयची बैठक होणार आहे. डिजीटल बॅंकिंग, लघु व मध्यम उद्योगांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतुद करण्यात येणार आहे. राज्यातील रस्त्यांच्या बाबत बोलायचे झाल्यास धुळे सोलापूर या महामार्गाचे येत्या मार्च महिन्यात केंद्रिय रस्ते व दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. याशिवाय वैजापूर तालुक्यातील शिऊर ते येवला, शिऊर- कन्नड-पिशोर, वैजापूर-गंगापूर-पैठण या रस्त्यांचे लोकार्पण करण्यात येईल. कसाबखेडा ते शिऊर बंगला, शिऊर बंगला ते नांदगाव, वैजापूर ते राज्यमार्ग क्रमांक ५१, वैजापूर ते श्रीरामपूर, पुरणगाव ते पुणतांबा या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. गोदावरी नदीवरील पुलासाठी अर्थसंकल्पात वीस कोटी रुपयांचा निधी मंजुर केल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रिय निधीच्या माध्यमातुन ए एस क्लब ते शिर्डीपर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येईल. मुद्रा दोनच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना विनातारण पन्नास हजार रुपये ते दहा लाख रुपये कर्ज मिळते. बचत गटांनाही कर्जाची सुविधा आहे. त्यांचा तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बॅंकांचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहेगाव येथील बंद पडलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी केंद्रातील अर्थ विभागाशी चर्चा करु असे आश्वासन त्यांनी दिले
केंद्राच्या माध्यमातुन आज देशात महामार्गाचे मोठे जाळे निर्माण होत आहे‌. राज्यातही मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरु आहेत. पण याचे सर्व श्रेय राज्य सरकार घेत आहे असा आरोप डॉ भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यांनी रस्त्यांची कोणती कामे केली असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.