वैजापूर बाजार समितीच्या घायगांव कांदा मार्केटमध्ये कांद्याला सरासरी 750 ते 800 रुपयांपर्यंत भाव

जफर ए.खान

वैजापूर,१४ एप्रिल :- वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घायगांव कांदा मार्केटमध्ये सध्या कांद्याची आवक कमी झाली असून लाल व उन्हाळी कांद्याची साधारणपणे 6 हजार 500 आवक असते. कांद्याला जास्तीत जास्त एक हजार तर कमीत कमी तीनशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सरासरी भाव 750 ते 800 रुपयांपर्यंत आहे.

बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत 10,46,408 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. 35 कोटी 62 लाख 65 हजार 585 रुपयांची कांदा खरेदी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.अशी माहिती बाजार समितीचे सचिव विजय सिनगर यांनी दिली. यावर्षी अतिपावसामुळे कांदा लागवड उशिरा झाली.उशिरा लागवड, कडक ऊन व रोगाचा प्रादुर्भाव या कारणाने कांदा पोसला गेला नाही त्यामुळे उत्पादन कमी झाले त्यात भावातही घसरण झाल्याने शेतकऱ्यांना दुप्पट आर्थिक फटका बसला आहे. ऐन उन्हाळी हंगामातील कांदा मार्केटमध्ये दाखल होत असतांनाच दरात घसरण होण्यास सुरुवात झाली.

फेब्रुवारीमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल 3100 ते 1000 पर्यंत दर मिळाला.आवक वाढताच दर घसरले असून 750 ते 800 रुपये क्विंटलवर भाव येऊन ठेपला आहे.त्यामुळे शेतकरी आता विक्रीची घाई न करता कांदा साठवणुकीवर भर देत आहेत.बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये लाल व उन्हाळी कांद्याची सर्वसाधारणपणे 6500 ते 700 क्विंटलची आवक असून आठवड्यातील सोमवार, गुरुवार व शनिवार रोजी गोणी मार्केट व मंगळवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी मोकळे मार्केट असते.बाजार समितीचे सभापती भागीनाथराव मगर, उपसभापती विष्णुभाऊ जेजुरकर, सचीव विजय सिनगर, चंचल मते ही मंडळी मार्केटवर नजर ठेवून असते. शेतकरी व व्यापाऱ्यांना सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती नेहमीच प्रयत्नशील आहे.