खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून शिक्षण महागले-प्रसिद्ध विचारवंत प्रा.सुषमा अंधारे

जालना ,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-भारतात 65 टक्के उत्पादक लोकसंख्येचा वर्ग आहे मात्र त्यांना रोजगार नाही, मूळ प्रश्नांना बगल देऊन धार्मिक ध्रुवीकरण केले जातेय, बलाढ्य राष्ट्रांनी नाकारलेल्या “बायजूस” सारख्या खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून शिक्षण महागले, गरीब व श्रीमंतांची मुलं एका शाळेत एकत्र शिकू शकतील अशी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे असून या साठी तरुण पिढीने सजग राहून रचनात्मक मार्ग शोधावे ,असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत प्रा .सुषमा अंधारे यांनी येथे बोलताना केले. 

Displaying 1645006317959.jpg


संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ॲड. शिवाजीराव आदमाने हे होते .यावेळी उद्दघाटक शेख महेमुद ,विजयकुमार पंडित ,ॲड.संजय रौंदाळे, सामाजिक कार्यकर्त्या   वैशाली सरदार , क्रांती खंबाईतकर,हरिश रत्नपारखे, व्याख्यानमालेचे संस्थापक गणेश चांदोडे, अध्यक्षा नंदाताई पवार, कार्याध्यक्ष देवीलाल बिरसोने, सचिव राहुल करनाडे,स्वागताध्यक्ष शेख इब्राहिम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Displaying 1645006317933.jpg


” संत रविदास : सामाजिक समतेचा मूलमंत्र ” या विषयावर विचार मांडतांना प्रा. सुषमा अंधारे यांनी देशात सद्यस्थितीत वाढत चाललेली धार्मिक कट्टरता,रोजगाराच्या संधी नसल्याने वाढती आर्थिक विषमता, घटत्या विकास दराने भुकबळीच्या रांगेत आलेला भारत देश,संवैधानिक हक्क हिरावले जातांना  निमुटपणे सूस्त बसलेला वर्ग, चळवळीतील घातक असलेले छूपे जातीयवादी अशा सर्व मुद्यांवर सडेतोड मते व्यक्त केली. कर्मठ असलेल्या उत्तर प्रदेशात चार वेळा महिला मुख्यमंत्री होते. पण सामाजिक न्यायाची भूमी असलेल्या महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री होण्याची संधी का मिळत नाही ? असा प्रश्न प्रा .सुषमा अंधारे यांनी केला. ओबीसी आरक्षणाचा निकालाचा निवडणुकीत कुठेच परिणाम दिसला नाही असे नमूद करत आम्ही केवळ वाचतो, ऐकतो मात्र कृतीत आणत नाही अशी खंत प्रा. सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. महापुरुषांच्या नावाने आपल्याला भावनिक केले जात असून सुपाऱ्या घेऊन चळवळी संपवल्या जातायत, असे सांगून जात  जाणिवांच्या विळख्यातून मुक्त व्हावे लागेल आणि न विकणारा समाज निर्माण करावा लागेल. असे शेवटी प्रा. सुषमा अंधारे यांनी सांगितले.    

 उदघाटक  म्हणून बोलताना शेख महेमुद यांनी  सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजकार्यासोबत राजकीय पक्षात प्रामाणिकपणे काम केल्यास पक्ष न्याय देतात, तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांनी समोर आले पाहिजेत ,अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात ॲड. शिवाजीराव आदमाने यांनी युवकांनी नेतृत्वासाठी पुढे यावे असे आवाहन केले .

यावेळी विजयकुमार पंडित,ॲड. संजय रौंदाळे, वैशाली सरदार यांची समयोचित भाषणे झाली. प्रस्ताविक नंदा पवार यांनी केले. विशाल साळवे यांनी वक्त्यांचा परिचय दिला. सुञसंचालन आशीष रसाळ यांनी केले तर देवीलाल बिरसोने यांनी आभार मानले. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने सुरूवात झाली. या वेळी फकिरा वाघ, संदीप सोनटक्के, अमित कुलकर्णी, लक्ष्मी चांदोडे ,अरूण मगरे,अश्विनी चांदोडे, डॉ. विशाल धानुरे, बाबासाहेब सोनवणे, चंद्रकांत रत्नपारखे, शिवराज जाधव, विक्की चांदोडे,अनिकेत चांदोडे,प्रदुम्न गवाळे,प्रकाश नारायणकर,शंकर पसराटे यांच्यासह महिला नागरिक व तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

पुरस्कारांचे वितरण

सामाजिक चळवळीत अतुलनीय योगदानाबद्दल देवीलाल बिरसोने यांना समाजभूषण तसेच कोरोना काळात सेवा दिल्याबद्दल कोवीड यौध्दे  म्हणून आशा हनुमान जोगदंडे व बाळू गोरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.