तहसील कार्यालयाच्या भिंतीही साधतील आता नागरिकांशी संवाद!

संगमनेर,२० फेब्रुवारी / प्रतिनिधी :- नागरिकाला हवेहवेसं वाटणारं…भिंतीवर रंगवलेल्या फुलं-झाडं आणि पाखरांची चित्रं…महसूल कायद्याच्या बोधकथा,  ई-पीक पाहणी, डिजिटल सातबारा उतारा, 8 अ उतारा आदी महसूल विभागाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देणाऱे फ्रेम…हे आगळं-वेगळं रूपडं घेऊन साकार झालेल्या संगमनेर तहसील कार्यालयाच्या भिंती येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी आपलेपणानं संवाद साधत आहेत.

संगमनेर तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांना प्रसन्न वाटलं पाहिजे. अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात व्यक्त केली होती.  महसूलमंत्र्यांच्या ह्या अपेक्षानुसार संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांनी संगमनेर तहसील राज्यातील ‘मॉडेल कार्यालय’ बनविण्याचा चंग बांधला. यासाठी पंधरा दिवस मेहनत घेऊन रंगबेरंगी फुल-झाडांचे चित्रांनी रंगवलेल्या भिंती,  महसूली नियमावली व उपक्रमांच्या माहितीनं सजलेलं हे आगळवेगळं कार्यालय साकार झालं आहे.  या कार्यालयाचे लोकार्पण शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी संगमनेरच्या नगराध्यक्षा श्रीमती दूर्गाताई तांबे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, प्रांतधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदी अधिकारी उपस्थित होते.

कार्यालय व परिसर स्वच्छ सुंदर करतांना  पोलीसांनी जप्त केलेल्या वाळू तस्करीत सापडलेल्या वाहनांची गर्दी कमी करण्यात आली आहे.  या संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवून तहसीलचा परिसर चकाचक करण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या तहसिल कार्यालयाच्या पायऱ्या चढतांना दोन्ही बाजूने असलेले झाडा-फुलांच्या चित्र येथे येणाऱ्यांना वेगळीच अनुभूती देणारी आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून त्यांनीच लिहिलेल्या महसुली कायद्यांच्या गोष्टी यासाठी निवडण्यात आल्या आहेत. जमीन व्यवहाराच्या गोष्टी अशा मथळ्याखाली हाव (लालच), पुण्याई, परस्परात फूट (मनभेद) यासह मुखत्यापत्र, हक्क नोंदणी, एका जमिनीचे दोनदा व्यवहार, देवाची जमीन, जमीनीचे वाटप, वारस नोंद अशा वेगवेगळ्या विषयांच्या छोटेखानी बोधकथांचा वापर करून तहसील कार्यालयाच्या आवारातील सर्व भिंतींवर त्याच्या फ्रेम करुन त्या लावण्यात आल्या आहेत. यासोबतच ७/१२ उतारा म्हणजे काय ? ८ अ (खाते उतारा) कशाला म्हणतात ? याबाबतही सामान्यांना माहिती देण्यात आली आहे.

प्रतीक्षाकक्षात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या महत्त्वाकांक्षी निर्णयातील एक असलेल्या ‘महाराजस्व अभियाना’बाबतच्या माहितीसह महसूलचा ‘हस्तलिखित से डिजिटल’ असा प्रवासही सचित्र रेखाटण्यात आला आहे. त्यातून दंडाधिकाऱ्यांकडील सुनावणीसाठी दीर्घकाळ थांबणाऱ्या अभ्यागतांशी या भिंती बोलतील आणि त्यातून त्यांचे प्रबोधनही होईल.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची संगमनेरात पथदर्शी अंमलबजावणी हे येथील कार्यालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले आहे. या कालावधीत मिशन म्हणून राबविल्या गेलेल्या ७/१२ स्वच्छता मोहिमेत तालुक्यातील ३ हजार ८१२  कालबाह्य नोंदी हटविण्यात आल्या. तगाई बोजा अथवा बंडींग बोजा सारख्या ४ हजार ५१४ नोंदी हटविण्यात आल्या. त्यामुळे गेली अनेक वर्ष उताऱ्यांवर अशा नोंदी असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची कवाडे उघडली गेली.

महसूल विभागाचा आजवरचा सर्वांत महत्त्वकांक्षी ठरलेल्या ‘ई-पीक पाहणी’ उपक्रमाची संगमनेरात झालेली अंमलबजावणी राज्यासाठी पथदर्शी ठरली. महसूल विभागाने यासाठी मोठे परिश्रम घेवून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांना मार्गदर्शन केले. या कामात खुद्द महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,  प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी केलेले मार्गदर्शन शेतकऱ्यांमध्ये महसूल विभागाची प्रतिमा उंचावणारे ठरले.  ‘महाराजस्व अभियाना’तून विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्याचे मोठे काम विभागाने अत्यंत जिद्दीने तडीस नेले. त्यातून एकट्या संगमनेर तालुक्यातील २८ हजार – २५२ विद्यार्थ्यांना अधिवास, डोंगरी, जात व वय अशा वेगवेगळ्या प्रकाच्या दाखल्यांचे थेट शाळा व महाविद्यालयात जावून वितरण करण्यात आले.

अंतर्बाह्य रूपडं बदललेल्या या कार्यालयाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर त्यांनी कार्यालयाची पाहणी करताना संगमनेर महसूल प्रशासनाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. महसूलमंत्र्यांची ही शाबासकी आम्हाला निश्चितच चांगलं काम करण्याचं बळ देणार आहे. अशी प्रतिक्रिया संगमनेर प्रांतधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे.