वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा मागणीसाठी वाकला व परिसरातील शेतकऱ्यांचा लोणी येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

वैजापूर ,१० फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील वाकला व परिसरात वीजपुरवठा हा कमी दाबाचा व अनियमित होत असून त्यामुळे  पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. वेळेवर पाणी मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आज वीज वितरणच्या लोणी येथील कार्यालयासमोर अधिकाऱ्यांना घेराव घातला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासनानंतर त्यांनी घेराव मागे घेतला.

येत्या दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा वाकला व परिसरातील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार आज दीपक वाघ, अजय साळुंके, प्रशांत निकम, बाळूनाना वाघ, प्रमोद जीवरख, राजेंद्र भागीनाथ मगर, चंद्रशेखर पाटील, ऋषिकेश जोशी व महेंद्र बोढरे यांच्या नेतृत्वाखाली अर्चना साळुंके, दत्तात्रय वाघ, बी.एम.मगर, दिलीप निकम, राजेंद्र मगर, वसीम पठाण,बाबासाहेब सोनवणे, प्रमोद बोढरे, अनिल वाघ, दीपक बोढरे,अजय शिंदे, वाल्मिक गायकवाड, शामशेर पठाण, रामहरी शिंदे, ज्ञानेश्वर देवरे, मजीद पठाण,, अमीन पठाण, मनोज घरडे, गुलाब सोनवणे, बापू वाघचौरे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांनी लोणी येथील वीज वितरण कार्यालयासमोर अधिकाऱ्यांना घेराव घालून निवेदन सादर केले.

वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सध्या कृषी पंपाचा भार हा विक्रमी प्रमाणावर एकदम वाढल्यामुळे 132 केव्ही वैजापूर उपकेंद्र येथून 33 केव्ही ऐवजी 23 केव्ही पर्यंत कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे त्यामुळे सिस्टम ओव्हरलोड होऊन रोहित्र ट्रिप होऊन वीज पुरवठा खंडित व कमी होत आहे. यावर उपाययोजना करण्याचे काम सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.