जालना- जळगाव लोकेशन सर्वे:रेल्वे बोर्डाने मंजुर केले 4.5 कोटी रुपये

जालना ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्वे’ रेल्वे बोर्डाने मंजूर केला आहे. ज्या रेल्वे मार्गाचे पूर्वी कामे झाली आहेत ते जसेच्या तसे ठेवून कोणत्याही मार्गाच्या कामात हस्तक्षेप न करता जालना जिल्ह्यातील लोकांच्या सोयीसाठी जालना- जळगाव  174 किलोमीटर लांबीचा मार्ग असणार यासाठी अंदाजे 4.5 कोटी रुपये फायनल लोकेशन सर्वे साठी मंजुर केले आहेत. अशी माहिती केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.

May be an image of 9 people, people standing and indoor

मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, व्होकल फॉर लोकल, लघुउद्योग, पर्यटनाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जालना वरुन पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापुर, जळगाव असा मार्ग  70% मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जात आहे आणि याचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थान च्या गाड्यांना आंध्राप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे. लवकरात लवकर याचे काम पुर्ण होणार आहे. अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटन स्थळ, या रेल्वे मार्गामुळे येथे जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय देखिल होणार आहे. मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूर महागणपती येथून हा रेल्वे मार्ग जात असल्याने या भागातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे. अनेक वर्षापासून या भागातील जनतेची ही आग्रही मागणी लक्षात घेता हा निर्णय घेतल्याने उशिरा स्वातंत्र्य मिळवलेल्या मराठवाड्याच्या या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास हा रेल्वे मार्ग झाल्याने होणार असल्याचे मंत्री दानवे यांनी सांगितले.