भारत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन, यश धुलच्या संघाने रचला इतिहास

Image

अँटिग्वा – भारताच्या युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात यश धुलच्य़ा नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अंडर 19 टीमने इंग्लंडचा चार विकेट आणि 14 चेंडू राखून पराभव केला. 

Image

 या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगउलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ १८९ धावांत आटोपला. इंग्लंडकडून जेम्स रियूने ९५ धावांची झुंज दिली. तर बावाने ५ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. प्रत्युत्तरात भारताने आपले सहा फलंदाज गमावले, पण उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Image

विकेटकिपर दिनेश बानाने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या युवा टीमने कुठलाही धोका न पत्करता संयमाने फलंदाजी करत हे लक्ष्य पार केलं. सामन्यात एकवेळ भारताची चार बाद 97 अशी स्थिती होती. त्यावेळी ऑलराऊंडर निशांत सिंधु आणि राज बावाने पाचव्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. निशांत सिंधू (50) धावांवर नाबाद राहिला, तर राज बावाने (35) धावा केल्या. आजच्या सामन्याचा नायक ठरला तो राज बावा पाच विकेट आणि 35 धावा अशी अष्टपैलू कामगिरी त्याने केली.

Image

भारताने आतापर्यंत आठ वेळा अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे. 2000 साली मोहम्मद कैफ त्यानंतर 2008 मध्ये विराट कोहली 2012 मध्ये उनमुक्त चांद, 2018 मध्ये पृथ्वी शॉ आणि 2022 मध्ये यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आहे. यापूर्वी 2020 मध्येही भारताने अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत बांगलादेशकडून पराभव झाला होता. आज भारताच्या युवा संघाने दमदार कामगिरी करुन पुन्हा एकदा जेतेपद पटकावले. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारता इतका दुसरा कुठलाही यशस्वी संघ नाहीय.

Image

इंग्लंडच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ बॉयडेनने सलामीवीर फवंदाज अंगक्रिश रघुवंशीला शून्यावर बाद केले. त्यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशीदने ४९ धावांची भागीदारी केली. थॉमस ऍस्पिनवॉलने (२१) हरनूरला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मागील सामन्यात शतक झळकावलेला कप्तान यश धुलसह रशीदने धावफलक हलता ठेवला. रशीदने अर्धशतक पूर्ण केले. हे दोघे संघाला विजय मिळवून देणार असे वाटत असताना इंग्लंडने सामन्यात रंगत निर्माण केली.

Image

भारताने शतकाचा पल्ला ओलांडण्यापूर्वी जेम्स सीलने यश आणि रशीदला झेलबाद केले. रशीदने ६ चौकारांसह ५० तर यशने १७ धावा केल्या. या पडझडीनंतर राज बावा आणि निशांत सिंधू यांनी डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करत दबाव कमी केला. विजयासाठी २५ धावा असताना बावा (३५) बाद झाला. त्यानंतर आलेल्या कौशल तांबेलाही इंग्लंडच्या ऍस्पिनवॉलने झेलबाद करत सामन्यात रंगत निर्माण केली. १७६ धावांवर भारताचे ६ फलंदाज माघारी परतले.

Image

मात्र निशांत सिंधुने अर्धशतक झळकावत भारताला विजयाजवळ पोहोचवले. यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बानाने ४८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला जगज्जेता बनवले. निशांतने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५० धावांची खेळी केली, तर बाना १३ धावांवर नाबाद राहिला.

Image

भारताचा मध्यमगती गोलंदाज रवी कुमारने इंग्लंडला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने सलामीवीर जेकब बेथेल (२) आणि कर्णधार टॉम प्रिस्ट (०) यांना स्वस्तात तंबूत धाडले. तर सलामीवीर जॉर्ज थॉमसला (२७), विल्यम लक्सटन (४) आणि जॉर्ज बेल (०) राज बावाने झेलबाद केले. ४७ धावांवर इंग्लंडने ५ फलंदाज गमावले. त्यानंतर राजने इंग्लंडला अजून एक धक्का दिला. त्याने रेहान अहमदला (१०) कौशल तांबेकरवी झेलबाद करत आपला चौथा बळी नोंदवला.

Image

या पडझडीनंतर जेम्स रियूने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने अॅलेक्स हॉर्टनसोबत धावा जमवण्यास सुरुवात केली. ही जोडी मैदानावर स्थिरावत असल्याचे पाहून भारताचा कप्तान यश धुलने फिरकीपटू कौशल तांबेकडे चेंडू सोपवला, कौशलनेही कप्तानाचा विश्वास सार्थ ठरवत हॉर्टनला (१०) यशकरवी झेलबाद केले. ९१ धावांत इंग्लंडने ७ गडी गमावले. जेम्स रियूने संघाच्या शतकानंतर धावगती वाढवली. त्याने तळाचा फलंदाज जेम्स सेल्ससह ९३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रियू ९५ धावांवर असताना माघारी परतला. रवी कुमारच्या गोलंदाजीवर महाराष्ट्राच्या कौशल तांबेने रियूचा सीमारेषेवर अप्रतिम झेल टिपला. रियूने आपल्या खेळीत १२ चौकार ठोकले. रियूनंतर इंग्लंड संघ जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. भारताकडून राज बावाने ३१ धावांत ५ बळी घेतले, तर रवीला ४ बळी घेता आले.

Image

भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर इंग्लंडने अफगाणिस्तानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. चार वेळा चॅम्पियन टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार होता. त्याचबरोबर इंग्लंडनेही २४ वर्षांनंतर अंतिम फेरीत स्थान मिळवून भारताला सावध केले होते. यश धुल हा दिल्लीकर असून त्याच्याकडून पुन्हा एकदा विजेतेपदाची अपेक्षा केली जात होती. दिल्लीच्या विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांनी यापूर्वी बाजी मारली आहे.