जातीपातीपेक्षा गरजु व उपेक्षितांसाठी काम करा-शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

जालना ,२८ जानेवारी /प्रतिनिधी :- कार्य करताना जातीपातीपेक्षा गरजु व उपेक्षितांसाठी काम करा असा सल्ला शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी गोंधळी समाजाच्या वतीने जालना शहरातील गांधीनगर येथे आयोजित
करण्यात आलेल्या मंठा नगर पंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक विकास बबनराव
सुर्यवंशी यांच्या सपत्नीक सत्कार प्रसंगी दिला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक लोकशाहीर आप्पासाहेब उगले, डॉ.विठ्ठलराव पवार, सामाजिक कार्यकर्ते, गंगाधर पवार, काशिनाथराव इंगळे,माणिकराव मराठे, माजी नगरसेवक बाला परदेशी, सुनिल पवार, विश्वनाथराव इंगळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले की, या देशात जाती आधारीत
राजकारण प्रबळ असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जातीपातीच्या
पलिकडे सर्व समाज घटकांना सत्तेत सहभाग दिला. अत्यंत छोट्या-छोट्या
समाज घटकांना आमदार, खासदार व मंत्री केले. अत्यंत अल्पसंख्य असणाऱ्या 
बुरुड समाजाचे चंद्रकांत खैरे राज्यात मंत्री व चार वेळा खासदार राहिले. बुलढाणा येथील गुरव समाजाचे विजयराज शिंदे हे तीनदा  आमदार झाले. नांदेड येथील सोनार समाजाचे प्रकाश खेडकर यांनीही आमदारकीपर्यंत जाता आले. ही सर्व नाव अत्यंत छोट्या-छोट्या समाजातील असतानाही केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांंनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दिलेल्या संधी मुळेच आमदार, मंत्री व खासदार होऊ शकले. अशी शेकडो उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. ज्या काळात राजकारणामध्ये तिकीट मागणाऱ्या इच्छूकांस तुझ्या मतदार संघात तुझ्या जातीचे किती मतदार आहेत, हे विचारुनच उमेदवारी दिल्या जायची. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी देताना कधीच जात विचारली नाही असेही अंबेकर म्हणाले. 
“लोकांसाठी काम करत असताना तुम्ही सर्व जातीतील गरजुंंसाठी व गरीबांसाठी
काम करा, लोकही तुमची जात पाहून नव्हे तर काम पाहून तुम्हाला मतदान
करतील,खर तर तुम्ही निवडणुकीत विजयी झाल्यावर आपल्या कार्य क्षेत्रातील
सर्वच समाज घटकांची कामे करणे, त्यांना मदत करणे, हे आपले कर्तव्यच आहे.
या सर्वांची कामे करत असतानाच तुम्ही ज्या समाजातून आलात तो गोंधळी समाज
आपल्या समाज व्यवस्थेतील अत्यंत छोटा समाज आहे. परंपरागत जात व्यवस्थेने
सोपवून दिलेली कामे करणारा समाज आहे. तुमच्या रुपाने त्यास राजकीय
प्रतिनिधीत्व मिळाले आहे. त्या गोंधळी समाज बांधवांचे प्रश्न, त्यांच्या
समस्या सत्ताधाऱ्यांसमोर  मांडून समाज बांधवांना आधार देण्याचे काम करा”,
असेही जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी नगरसेवक विकास सुर्यवंशी यांना उद्ेशून
म्हणाले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.