पंतप्रधान मोदींकडून प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई ,२४ जानेवारी / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर ते घरीच क्वारंटाईन असून त्यांची तब्येत उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी उपचार सुरु केले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

गेल्या दोन चार दिवसांत जे लोक संपर्कात आले होते, त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे. पुढील सात दिवस म्हणजे रविवारपर्यंतचे पवार साहेबांचे सर्व कार्यक्रम आणि भेटीगाठी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर नवे वेळापत्रक जाहीर होईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. स्वत: शरद पवार यांनी ट्विट करुन  ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये शरद पवार पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.

शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. त्याच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे.