युवतीचे एडिट केलेले अश्‍लिल फोटो इन्‍स्टाग्रामवर व्‍हायरल करणाऱ्या माथेफिरु तरुणाला अटक

औरंगाबाद,६ जानेवारी /प्रतिनिधी:- युवतीचे एडिट केलेले अश्‍लिल फोटो इन्‍स्टाग्रामवर व्‍हायरल करणार्या माथेफिरु तरुणाला बेगमपुरा पोलिसांनी मंगळवारी दि.५ रात्री बेड्या ठोकल्या. अनिकेत अण्‍णा बनकर (२२, रा. गितानगर, एन-१३) असे आरोपीचे नाव असून त्‍याला ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी बुधवारी दिले.

या प्रकरणात १९ वर्षीय युवतीने फिर्याद दिली. त्‍यानूसार, १६ नोव्‍हेंबर २०२१ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्‍यासुमारास फिर्यादीच्‍या मैत्रणिने तिला व्‍हाट्स अॅपवर इन्‍स्‍टाग्रामवरील पोस्‍टचे स्‍क्रीन शॉट पाठवले. त्‍यात फिर्यादी व तिच्‍या ओळखीचा एका मुलाचा फोटो होता व दुसर्या फोटोत दोघांचे एडीट केलेले अश्लिल फोटो होते. हे फोटो इन्‍स्‍टाग्रामवर पाठविण्‍यात आल्याची माहिती फिर्यादीच्‍या मैत्रिणीने  दिली. त्‍यांनतर ही बाब फिर्यादीने घरी सांगितली. या प्रकरणात बेगमपुरा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी तपास करुन अनिकेत बनकर याला अटक करुन आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाइल जप्‍त करायचा आहे. आरोपीने ते फोटो कितीन लोकांना पाठवले, आरोपीला गुन्‍ह्यात कोणी मदत केली आहे काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.