नीटच्या परिक्षेत कमी गुण दिले:विद्यार्थिनीची औरंगाबाद खंडपीठात याचिका

औरंगाबाद,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-नीटच्या परिक्षेच्या निकालात केवळ २१८ गुणच देण्यात आले आहेत. आदर्श नमूना उत्तर पत्रिकेनुसार ६३४ गुण मिळणे अपेक्षित होते, असे म्हणत अश्विनी मनमोहन आचारी या विद्यार्थिनीने गुण तपासणी करणाऱ्या  नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केली आहे.
याचिकेनुसार अश्विनी आचारी ही २०२१ मध्ये विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाली. तिला विज्ञान विषयात ८२ टक्के गुण मिळाले. वैद्यकीय शिक्षणाची आवड असल्याने तिने नीटची परीक्षा दिली. परीक्षेच्या वेळीच विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका डाऊनलोड करून ती नॅशनल टेस्टिंग एजन्सीला पाठवायची असते. त्याचवेळी सदर एजन्सीकडून विद्यार्थ्यांना आदर्श अचूक उत्तरपत्रिकादेखील पुरवली जाते.
विद्यार्थ्यांनी भरलेली उत्तरपत्रिका एजन्सी विद्यार्थ्यांना मेल करते व ओरिजनल उत्तरपत्रिका एजन्सीकडेच असते. तिची प्रत विद्यार्थ्यांना पाठवली जाते. एजन्सीकडून पाठवलेल्या उत्तर पत्रिकेतील अचूक उत्तरे व विद्यार्थ्यांनी  भरलेली (लिहिलेली) उत्तरपत्रिका यांचे तुलनात्मक निरीक्षण केल्यास किती संभाव्य गुण मिळतील हे अचूक कळते. अश्विनीला एजन्सीकडून पाठवण्यात आलेल्या उत्तरांची तुलना तिच्या उत्तरपत्रिकेशी केली असता तिला ७२० पैकी ६३४ गुण मिळणे अपेक्षित होते.
मात्र ८ सप्टेंबर रोजी अश्विनीला स्कोरकार्ड मिळाले. त्यात तिला ७२० पैकी फक्त २१८ गुणच मिळाले. अश्विनीने त्याच दिवशी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ई-मेल द्वारे ही बाब कळवली. मात्र तिच्या मेलची त्यांनी दखलच घेतली नाही. त्यामुळे अश्विनी आचारी हिने अ‍ॅड्. विनोद पाटील यांच्यामार्फत  खंडपीठात याचिका केली.
न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठाने सदर प्रकरणात प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. सुनावणीत नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे वकील गायकवाड यांनी न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागितला. आता १० ऑक्टोंबर रोजी सुनावणी अपेक्षित आहे. या प्रकरणी अ‍ॅड्. विनोद पाटील यांना अ‍ॅड्. राहुल सावळे, अ‍ॅड्. मदन खानसोळे, अ‍ॅड्. प्रतिभा चौधरी, अ‍ॅड्. ओमप्रकाश सुकेवार सहाय्य करीत आहेत.