कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध चालतील, पण लॉकडाऊन नको

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

पिंपरी चिंचवड ,५ जानेवारी /प्रतिनिधी:- गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील पण लॉकडाऊन नको, अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली.

          ते म्हणाले की, निर्बंधांना विरोध नाही पण लॉकडाऊनला कोणी तयार होणार नाही. गेली दोन वर्षे विद्यार्थी, खेळाडू, व्यापारी, उद्योजक अशा विविध घटकांनी खूप नुकसान सहन केले. हा मोठा कालावधी आहे. आता आणखी किती सहन करणार हा सवाल आहे. त्यामुळे राज्य सरकारने हवे तर कडक निर्बंध लावावेत पण सर्व काही बंद करण्याची भूमिका असू नये. तसेच कोरोनाचे स्वरुप आता भयानक नाही आणि ही साथ संपण्याची शक्यता आहे, हे तज्ञांचे मतही सरकारने ध्यानात घ्यावे.

          पुण्यातील कोरोना आढावा बैठकांमध्ये आपण गेली दीड वर्षे उपस्थित राहिलो नसल्याबद्दल माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला. पण त्या बैठकांमध्ये अरेरावी चालते. उपस्थितांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. अशा स्थितीत बैठकांना उपस्थित राहण्याची औपचारिकता कशाला, असा सवाल त्यांनी केला.

          एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, शिवसेनेतील अस्वस्थता हळुहळू बाहेर पडू लागली आहे. काही शिवसैनिक खासगीत बोलतात तर काही नेते उघड बोलतात. शिवसेना किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खऱ्या शिवसैनिकांना फार काळ दाबून ठेऊ शकणार नाहीत. शिवसेनेला खऱ्या हिंदुत्वाकडे जावेच लागेल.

          शिवसेनेसोबत भाजपाची युती होऊ शकते का, असे एका पत्रकाराने विचारले असता प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अशा शक्यतेबाबत आपल्याला काही माहिती नाही. राजकारणात कधीही काही होऊ शकते, पण त्याबद्दल सांगता येत नाही. सामान्य माणसाची इच्छा आहे की, दोन भावांमध्ये भांडणे झाली तरी केव्हा तरी भांडणे संपवून पुन्हा जुने संबंध निर्माण करावे लागतात.

          तथापि, आपण युतीबद्दल काही बोलणार नाही. तसे बोलले की, लगेच शिवसेनेच्या मुखपत्रातून आपल्यावर सत्ता गेल्यामुळे झोप लागत नाही, अशी टीका होते. प्रत्यक्षात आपल्याला शांत झोप लागते, असा टोला त्यांनी हाणला.

       चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना प्रदेश भाजपातर्फे श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, सिंधुताई या अनाथांच्या माय होत्या. त्यांनी हजारो अनाथ मुला – मुलींचा सांभाळ केला. त्यांनी आभाळाएवढे कार्य केले पण त्यांना त्याचा अहंकार नव्हता. सिंधुताईंच्या कार्याचे स्वरूप व्यापक आहे. हे कार्य पुढे चालू राहण्यासाठी भाजपा मदत करेल. भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय अठरा वर्षे पूर्ण केलेल्या अनाथ मुलांसाठी तर्पण या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीच काम करत आहेत.