अखेर अशोक चव्हाणांनी हाती घेतले  कमळ

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपा ,महायुती बळकट होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

भाजपा प्रवेश पदाच्या अपेक्षेने नाही – अशोक चव्हाण

मुंबई,१३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-काँग्रेसमधून सोमवारी राजीनामा दिल्यानंतर, येत्या दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करणार, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर २४ तासांतच आज दुपारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. “माझ्या आयुष्याची नवीन सुरूवात मी करत आहे. ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासात आज मी बदल करत आहे आणि त्यातून आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया चव्हाण यांनी पक्षप्रवेशानंतर माध्यमांसमोर दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, त्यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेवून देशात, राज्यात चांगलं काम करता आलं पाहिजे, राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिलं पाहिजे या भूमिकेतून आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. चव्हाण यांच्यासोबत नांदेडचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, खा. प्रतापराव चिखलीकर, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. श्री. चव्हाण यांच्याबरोबर माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसला रामराम करत भाजपा प्रवेश केला. यावेळी श्री. बावनकुळे यांनी श्री. चव्हाण व राजूरकर यांना पक्षाचे रीतसर सदस्यत्व दिले. 

भाजप-फडणवीस सांगतील ते काम करणार-

“भाजपची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेल. जे आदेश पक्ष देईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सांगतील त्या पद्धतीने आगामी काळात काम करण्याचा माझा मानस आहे. त्यांच्याकडे दुसरी कोणतीही मागणी मी केलेली नाही. जे मला त्याठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे काम मी करेन. मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी सहकार्य केलं. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मला कुणी जा असे सांगितले नाही. मी पक्षात नवीन आहे, त्यामुळे अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन”, असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता –

पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधात बोलत आहेत. पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. यासाठी खूप विचार करावा लागला. काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा असे वाटले. मी पक्षासाठी योगदान दिले. मी पक्ष वाढवण्यासाठी काम केले त्यामुळे पक्षाने मला भरपूर दिले तरी पक्ष सोडला अशी टीका करणे योग्य नाही. मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही.