रस्ते विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार- नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे

Displaying 1.jpg

औरंगाबाद,२३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- रस्ते चांगले तरच शहराचा विकास  शक्य आहे. त्यामुळे अधिकाधिक दर्जेदार रस्ते करण्यासाठी प्रयत्न करावेत, या भागातील रस्ते विकासासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Displaying 3.jpg

हर्सूल येथील भगतसिंग नगर येथे विविध वॉर्डामध्ये मूलभूत सोयी सुविधांच्या विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.

मंत्री शिंदे म्हणाले, शहरात विविध ठिकाणी विकासकामे होत आहेत. नागरिकांना सोयीसुविधा देणे शासनाची जबाबदारी आहे. औरंगाबादच्या मनपाला रस्त्यासाठी 250 कोटी, पाणी पुरवठा योजनेसाठी 1650 कोटींचा निधी नगर विकास विभागाने मंजूर केलेला आहे. त्यामुळे शासनाचे विकासाला प्राधान्य असून औरंगाबाद शहरातील सोयीसुविधा अधिक दर्जेदार करण्यावर भर राहणार असल्याचेही मंत्री शिंदे म्हणाले.

सुरुवातीला कोनशिलेचे अनावरण मंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जैस्वाल यांनी केले. यामध्ये त्यांनी मतदार संघासाठी 15 कोटींचा निधी दिल्याबद्दल मंत्री शिंदे यांचे आभार मानले.

दर्जेदार विकासकामांना शासनाचे प्राधान्य- नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे

Displaying 3.jpg

पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधा दर्जेदाररित्या नागरिकांना मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मिटमिटा येथील भारत टॉवर ते कोमल नगर रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी मंत्री शिंदे बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, सिद्धांत शिरसाट आदी उपस्थित होते.

मंत्री शिंदे म्हणाले, काँक्रिट रस्ता असल्याने टिकाऊ रस्ता या भागातील नागरिकांना मिळणार आहे. या ठिकाणी अशा रस्त्याची आवश्यकता होतीच. या रस्त्यासह मीरा नगर, सुंदर नगर येथील रस्ता आवश्यक असल्याचे आमदार शिरसाट यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या मागणीचा विचार करत मीरा नगर, सुंदर नगरच्या रस्त्याचा प्रस्ताव सादर करा, त्या रस्त्यासाठीही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे श्री.शिंदे म्हणाले. शिवाय शासनाच्या 1650 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचाही या भागाला लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले.

आमदार शिरसाट यांनी मीरा नगर, सुंदर नगर येथील रस्ता आवश्यक असल्याचे सांगतांना पडेगाव, मिटमिटावासीयांच्या विकासाला प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

देभेगावच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य – नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे

कन्नड तालुक्यातील देभेगावात आवश्यक सर्व सोयीसुविधा देण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

Displaying 2.jpg

 देभेगाव येथे देभेगाव ग्रामपंचायत आणि विजय सुरासे ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे, हभप ज्ञानदास महाराज, डॉ.विजय सुरासे, सरपंच छाया लाड आदींची उपस्थिती होती.

मंत्री शिंदे म्हणाले, ठाण्यात राज्यभरातून रुग्ण येतात, त्यांची सेवा करण्याचे कार्य विपुल प्रमाणात होते. देभेगावाचे सुपूत्र डॉ. सुरासे निःस्वार्थ भावनेने त्या रुग्णांची अहोरात्र सेवा करतात याचे कौतुक आहे. देभेगावात प्राचीन शिव मंदिर, गुरुद्वारा आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने आवश्यक ती मदत गावास करण्यात येईल, असेही मंत्री शिंदे म्हणाले. 

सुरुवातीला मंत्री शिंदे यांनी ढवळेश्वर मंदिर आणि गुरुद्वारा दुख निवारण साहिब येथे दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराच्या वतीने जिसवेन्द्रसिंग ग्रंथी यांनी मंत्री शिंदे यांचे स्वागत केले. यानंतर न्यू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी मंत्री शिंदे यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरासे यांनी केले.