राज्यात जून महिन्यात आतापर्यंत २८ लाख ८५ हजार ७४५ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

६२ लाख २२ हजार ४३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. २८ जून :- राज्यातील 52 हजार 440 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जून ते 28 जूनपर्यंत राज्यातील 1 कोटी 43 लाख 20 हजार 110 शिधापत्रिका धारकांना 62 लाख 22 हजार 430 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 28 लाख 85 हजार 745 शिवभोजन  थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 440 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 19 लाख 55 हजार 947 क्विंटल गहू, 14 लाख 97 हजार 508 क्विंटल तांदूळ, तर 20 हजार 711 क्विंटल साखरेचे  वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 3 लाख 56 हजार 259 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 1 जून पासून एकूण 1 कोटी 2 लाख 30 हजार 648 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 4 कोटी 63 लाख 93 हजार 273 लोकसंख्येला 23 लाख 19 हजार 660 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.  

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी  ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे जून 2020 मध्ये आतापर्यंत 3 लाख 87 हजार 140 क्विंटल  वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 2 लाख 79 हजार 754 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे. 

आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे आतापर्यंत 62 हजार 170 क्विंटल मोफत तांदुळ वितरित केला आहे.

राज्यात 1 जून ते 28 जून पर्यंत 851 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 28 लाख 85 हजार 745 शिवभोजन थाळ्यांचे  वाटप करण्यात आले आहे. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत 86 लाख 69 हजार 522 शिवभोजन थाळ्या वाटप झाल्या आहेत.

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य  दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *