खुलताबादेत पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा ; शेतकरी हवालदिल

खुलताबाद,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक पदे रिक्त असून औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पशुपालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून पशुधन अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तसेच दवाखान्यात औषधे उपलब्ध नसल्याने पशुपालकांना खाजगी मेडिकल मधून औषधे आणून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात , अशी मागणी पशुपालकांकडून जोर धरत आहे.

श्रेणी एक व श्रेणी दोन असे खुलताबाद, सुल्तानपूर, बाजारसावंगी येथे पशुवैद्यकीय दवाखाने असून पशुधन विकास अधिकारी मंजूर पदे चार असून एक कार्यरत तर तीनही पदे रिक्त आहेत. वृणोपचारक तीनही पदे रिक्त आहेत. बोडखा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक पद रिक्त आहे.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती एल जी गायकवाड यांनी पालकमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत रिक्तपदे तातडीने भरण्यासाठी आग्रही मागणी केली आहे. शासनाकडे लेखी पत्र पाठवून पाठपुरावा सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

———————————————————

Displaying FB_IMG_1603001201010__01.jpg


पशुवैद्यकीय दवाखान्यात सात दिवसांत आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा केला जाईल. पशुधन वाचवण्यासाठी रिक्त असलेले पशुवैद्यकीय अधिकारी पदे राज्य सरकारने तातडीने भरावेत, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करत आहे.
– एल जी गायकवाड, उपाध्यक्ष तथा सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद औरंगाबाद

———————————————————————

पावसाळ्यात जनावरांना विविध साथीच्या आजाराचा धोका असतो. ग्रामीण भागातील शेतकरी कसेबसे आपले पशुधन पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन येतात. मात्र तेथे गेल्यावर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
अधिक माहिती घेतली असता दवाखान्यात खनिज द्रव्य व जीवन सत्व पुरवठा औषधे,  जंटनाशके, गोचीड , गोमाशाची औषधे, मिनरल मिक्सर ड्रेसिंग साठी आयोडीन, बेंझीन जखमेवर लावण्यासाठी मलम, डायरियासाठी औषध उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे पशुपालकांना खासगी मेडिकल वरून विकत आणावे लागतात. तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्तपदे तातडीने भरावीत, आवश्यक ती औषधे शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.