केंद्र सरकारकडून आतापर्यंत राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 16.54 कोटी मात्रांचा मोफत पुरवठा

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी अजूनही 78 लाखापेक्षा अधिक मात्रा उपलब्ध

नवी दिल्ली ,२ मे /प्रतिनिधी :

केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने कोविड विरोधातील लढाईचे नेतृत्व करत आहे. केंद्र सरकारच्या महामारी नियंत्रण आणि व्यवस्थापन (चाचणी, शोध, उपचार आणि कोविड अनुरुप वर्तन यांचा समावेश) या पाच सूत्री धोरणाचा लसीकरण हा एक अविभाज्य भाग बनला आहे.

कोविड -19 लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात उदार आणि वेगवान रणनितीची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरू झाली आहे. नवीन पात्र लोकसंख्या गटाची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे. संभाव्य लाभार्थी थेट कोविन पोर्टलवर (cowin.gov.in) किंवा आरोग्यसेतु अ‍ॅपद्वारे नोंदणी करू शकतात.

केंद्र  सरकारने आतापर्यंत सुमारे 16.54 कोटी लसींच्या मात्रा (16,54,93,410) राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना मोफत दिल्या आहेत. यापैकी, वाया गेलेल्या लसीच्या मात्रा आणि वापरण्यात आलेल्या मात्रांची एकूण संख्या  15,76,32,631 (आज सकाळी 8 वाजता उपलब्ध आकडेवारीनुसार) एवढी आहे.

78 लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा (78,60,779) अद्याप  राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे देण्यासाठी उपलब्ध आहेत.

याशिवाय, पुढील 3 दिवसांत 56 लाखांहून अधिक (56,20,670) लसीच्या मात्रा  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना मिळणार आहेत.