वैजापूर बाजार समितीची निवडणूक चुरशीची ठरणार

बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सेना-भाजपसह काँग्रेसची मोर्चेबांधणी

जफर ए.खान

वैजापूर, २२ऑक्टोबर:- कोरोनामुळे गेल्या एक-दीड वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्याची घोषणा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकतीच केली आहे. त्यानुसार वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली असून,महाविकास आघाडीतील घटक पक्ष व भाजपने बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत शिवसेना आमदार आर.एम.वाणी आणि माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या पॅनेलचा विजय होऊन आमदार वाणी यांचे दहा व माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे दोन असे एकूण बारा संचालक निवडून आले होते.बाबांचे चिरंजीव काकासाहेब पाटील यांना पहिल्या अडीच वर्षासाठी सभापती करण्यात आले.अडीच वर्षाची मुदत संपल्यानंतरही राजीनामा न दिल्यामुळे नाराज झालेल्या संचालकांनी सभापती काकासाहेब पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला.त्यामुळे काकासाहेब पाटील यांना सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला.काकासाहेब पाटील यांच्यानंतर शिवसेनेचे रामहरीबापू जाधव व संजय पाटील निकम यांना सहा-सहा महीने सभापतीपद देण्यात आले. संजय पाटील निकम यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भागीनाथ मगर यांना सभापती करण्यात आले. सध्या भागीनाथ मगर हे सभापती असून,गेल्या काही दिवसांपासून संचालक मंडळात कुरबुर सुरू असल्याची चर्चा आहे.वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांची संख्या अठरा असून,त्यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघ 11 जागा (सर्वसाधारण -7, महिला – 2, इतर मागासवर्ग – 2), ग्रामपंचायत मतदारसंघ – 4 जागा ( सर्वसाधारण -2, अनुसूचित जाती/जमाती – 1,आर्थिक दुर्बल घटक -1) व्यापारी मतदारसंघ – 2 जागा व हमाल-मापाडी मतदारसंघ – 1 जागा अशा एकूण अठरा संचालकांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका 31ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या होत्या स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली नसल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे.

डिसेंबरमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन 18 जानेवारीला नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईल.निवडणुकीसाठी प्रारूप व अंतिम मतदारयाद्या  30 सप्टेंबर 2021 च्या अर्हता दिनांकावर करण्यात येणार आहेत.10 नोव्हेंबरला मतदारयादी प्रसिध्द करणे,त्यावर 10 ते 22 नोव्हेंबर दरम्यान आक्षेप व हरकती मागविण्याचा काळ असेल.22 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत हरकतीवर निर्णय घेण्यात येईल.6 डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिध्द होईल.16 ते 22 डिसेंबर नामनिर्देशनपत्र विक्री व स्वीकृती त्यानंतर 23 डिसेंबरला अर्जाची छाननी व 24 डिसेंबरला त्याची प्रसिध्दी करण्यात येईल 24 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. निवडणूक चिन्हासह उमेदवारांची अंतिम यादी 10 जानेवारीला प्रसिद्ध होईल.17 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान तर 18 जानेवारीला मतमोजणी होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईल.

निवडणूक जाहीर झाल्यापासून बाजार समितीचे आजी-माजी संचालकांसह इच्छुक मंडळीही कामाला लागली आहे. तालुक्यात सेना-भाजपमध्ये सध्या वर्चस्वाची लढाई सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसही पूर्ण तयारीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक चरशीची होण्याची शक्यता आहे.