गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

·        तहसीलनिहाय मदतीसाठी स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष

·        स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस

·        पर्यावरणपूरक उत्सव, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या

औरंगाबाद,२६ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गणेश मंडळ, नागरिकांना केले. उत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या सुलभरित्या देण्यात येणार आहेत. या उत्सव काळात गणेश मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.    

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरविभागीय बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अप्पर पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोलिस उपविभागीय अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महावितरण, आरोग्य, प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तर ऑनलाईन माध्यमातून सर्व तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गट विकास अधिकारी आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी म्हणाले, गणेशोत्सव नागरिक उत्साहात साजरा करणार आहेत. त्यामुळे गणेश मंडळांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या तत्काळ संबंधित यंत्रणेने द्याव्यात. यासाठी तहसीलनिहाय मदत कक्षाद्वारे मार्गदर्शन करण्यात यावे. मंडळांसाठी आवश्यक असणारी वीज जोडणी तत्काळ महावितरण कंपनीने द्यावी. तर वीजजोडणीबाबतची तपासणी करून इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टर श्री. मदाने यांच्या कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल. गणेश स्थापना पूर्व असलेल्या परवानग्या, स्थापनेनंतर पूजा अर्चा आणि विसर्जन मिरवणूक यासंबंधी सर्व विभागाने चोख नियोजन करावे. उत्सव चांगला व्हावा, या दृष्टीने विभागांनी सर्वतोपरी अंमलबजावणी करावी. यामध्ये आरोग्य विभागाने आवश्यक त्या सर्व ठिकाणी आरोग्य पथके, रूग्णवाहिकांची व्यवस्था करावी.

अग्निशमन बंब, मिठाईची तपासणी, मिरवणुकीत विना क्रमांकाच्या वाहनास बंदी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई, श्री गणेश मूर्ती विसर्जनास्थळी निर्माल्य कलश, कृत्रिम तलावांची निर्मिती, सर्व गणेश मूर्तींचे घरोघरी जाऊन संकलन आणि त्यांचे एकाचवेळी विसर्जन, आपत्ती काळातील सर्व उपाययोजना आदींबाबत मार्गदर्शनही श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गणेश मंडळांनी देशभक्तीपर देखाव्यांना प्राधान्य द्यावे. मंडळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी तालुकास्तरावरून स्पर्धेतून जिल्हास्तरावर क्रमांक पटकावणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.

गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी प्रशासनाकडून परवानगी, उत्सव कालावधीतील करावयाच्या बाबींबाबत सर्वसामान्यांमध्ये होर्डिंगच्या माध्यमातून जागृती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्या. 

गणेश मंडळांसाठी https://citizen.mahapolice.gov.in या ऑनलाईन माध्यमातून पोलिसांची परवानगीची सुविधा उपलब्ध आहे. अधिक मार्गदर्शन हवे असल्यास संबंधित पोलिस ठाण्यातूनही मार्गदर्शन पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक कलवानिया म्हणाले. यासोबतच्या त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी आवश्यक त्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. श्री. गटणे यांनी आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात यावेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान व तत्पूर्वी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.