तब्बल १२६ जिवंत इलेक्ट्रीक डेटोनेटर जप्‍त ,दोन महिन्‍यांनी आरोपीच्‍या मुसक्या आवळण्‍यात यश

Electric Detonator stock photo. Image of destroy, charge - 15770246

औरंगाबाद, १९ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी एका घराच्‍या झडतीत तब्बल १२६ जिवंत इलेक्ट्रीक डेटोनेटर जप्‍त केल्याची घटना १७ ऑगस्‍ट रोजी गेवराई ब्रुकब्रॉंड येथे उघडकीस आली होती. तेंव्‍हा पासून गुन्‍ह्यातील आरोपी पसार होता. तपास सुरु असतांना आरोपी रांजणगाव (जि. पुणे) येथे असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्‍यानूसार पोलिसांना तब्बल दोन महिन्‍यांनी मंगळवारी दि.१९ पहाटे आरोपीच्‍या मुसक्या आवळण्‍यात यश आले.जितेंद्र ऊर्फ जितु संतोषसिंग टाक (२८, रा. गेवराई ब्रुकबॉंड आलाना ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असुन त्‍याला गुरुवारपर्यंत दि.२१ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही.डी. सुंगारे/तांबडे यांनी दिले.

या प्रकरणात चिकलठाण पोलिस ठाण्‍याचे उपनिरीक्षक प्रदिप ठुबे (३०) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, १७ ऑगस्‍ट रोजी ठाण्‍याचे सहायक निरीक्षक पाटील, सहायक फौजदार लुटे, कटकुरे, हवालदार राठोड, साळवे व इतर कर्मचारी गेवराई तांडा येथे झालेल्या किराणा दुकानाती चोरी बाबत तपास करीत  होते. तपासादरम्यान पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबवत असताना पोलिसांना आरोपीच्‍या घराचा संशय आला. त्‍यामुळे पोलिसांनी आरोपीच्‍या घराची झडती घेतली. त्‍यात पोलिसांनी तब्बल १२६ जिवंत इलेक्ट्रिक डेटोनेटर जप्‍त केली. विशेष म्हणजे ही डेटोनेटर १२ प्‍लास्‍टीकच्‍या बरण्‍यांमध्‍ये कापुस टाकून सुरक्षित ठेवण्‍यात आली होती.या  प्रकरणात चिकलठाणा पोलिस  ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. गुन्‍हा उघडकीस आल्यापासून आरोपी हा पसार होता.

गुन्‍ह्याचा तपास सुरु असताना आरोपी हा पुण्‍यातील रांजणगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी शिताफीने आरोपीला बेड्या ठोकल्या.आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील ए.व्‍ही. घुगे यांनी आरोपीने इलेक्ट्रीक डेटोनेटर कोठुन, कोणाकडून, कोणाच्‍या मदतीने व कशासाठी आणले याचा तपास करायचा आहे. गुन्‍ह्यात आरोपीला कोणी मदत केली. आरोपीने अशा प्रकराच्‍या स्‍फोटाकांचा आणखी कोठे साठा केला आहे का, गुन्‍ह्यामध्‍ये कोणत्‍या वाहनाचा वापर केला याचा आणि स्‍फोटकांचा साठा करण्‍यामागील उद्देश काय होता या सर्व बाबींचा आरोपीकडे तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.