प्रत्येक केंद्रावर असणार आरोग्य विभागाचे निरीक्षक – आयुक्त एन. रामास्वामी यांच्या अधिकारी नियुक्तीच्या सूचना

मुंबई,१९ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी यांनी याबाबत संबंधित उपसंचालक यांना कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पद भरतीसाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या तयारीबाबत आयुक्त एन. रामास्वामी यांनी काल व्ह‍िडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह राज्यातील आरोग्य विभागाचे सर्व उपसंचालक, सह संचालक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि परीक्षेची संबंधित अधिकारी आणि न्यासा कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

 परीक्षा केंद्र परिसरात सुरक्षा

श्री. एन. रामास्वामी यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करावी. अशी नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची यादी पाठवावी. प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करावी. परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू करण्यासाठी जिल्हा प्रशासनासाठी समन्वय ठेवून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.

कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी

जिल्हा शल्य चिकित्सक, उपसंचालक यांनी शाळेतील परीक्षा केंद्राची पाहणी करावी. परीक्षा घेताना कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी काळजी घ्यावी, अशाही सूचना श्री. रामास्वामी यांनी दिल्या.

आसन व्यवस्था, सुरक्षा पाहणी होणार

रिक्त अभियान संचालक सतीश पवार यांनी परीक्षा केंद्र म्हणून निश्चित केलेल्या शाळांना उपसंचालक, सहसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट द्यावी. शाळांतील आसन व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा याबाबत तयारी करुन घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

दिव्यांग उमेदवारांना सोयी मिळणार

संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार दिव्यांग उमेदवारांना सवलती दिल्या जातील, याबाबत काळजी घ्यावी. परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर पुरविण्यात यावे, असे सांगितले.

आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती – संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी जारी केले आदेश

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत असलेल्या शंकांचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी नाशिक येथे केले निरसन;  पत्रकार परिषद घेवून वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी 24 आणि 31 ऑक्टोबर, 2021 रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

राज्य शासनाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदासाठी 24 आणि 31 ऑक्टोबर, 2021 रोजी परीक्षा होणार आहेत. परीक्षा ‘न्यासा कम्युनिकेशन कंपनी’ मार्फत घेतली जाणार आहे. परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी आरोग्य विभागाच्या उपसंचालक अधिकारी यांची प्रत्येक परिमंडळात नियुक्ती करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या परिमंडळाच्या कार्यालयास भेट द्यावी. परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात. परीक्षेच्या तयारीबाबत दररोज आढावा घ्यावा, समस्या असल्यास स्थानिक जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा, परीक्षा केंद्र व्यवस्थित आहेत का, तेथे परीक्षार्थींना आवश्यक सुविधा दिल्या गेल्या आहेत का, याबाबत तपासणी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल जामर्स बसवले आहेत का, स्ट्रॉंग रुमची व्यवस्था झाली आहे का, कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी होते का, याबाबत पाहणी करायची आहे. संबंधित कामकाज होईल याकडे लक्ष द्यायचे आहे, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.

नियुक्त अधिकारी, पद आणि त्यांना दिलेले परिमंडळ

1) डॉ. विजय डेकाटे, प्राचार्य, कुटुंब कल्याण आणि प्रशिक्षण केंद्र, पुणे – पुणे परिमंडळ

2) डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, आयटीसी ब्युरो, पुणे – ठाणे परिमंडळ

3) डॉ. डी. एम. गायकवाड, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे- नाशिक

4) एम. एम. मोरे, आरोग्य सेवा (परिवहन), पुणे – कोल्हापूर

5) डॉ. सुनीता गोल्हाईत, उपसंचालक (शुश्रुषा), मुंबई – औरंगाबाद

6) डॉ. आर. एस. आडकेकर, सहसंचालक, पुणे – लातूर.

7) डॉ. उमेश नावाडे, प्राचार्य, सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर – अकोला

8) डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालक (नेत्र), मुंबई – नागपूर