शारदीय नवरात्र महोत्सव:वैदिक होम व हवनास विधीवत पुर्णाहुती

उस्मानाबाद,१३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शारदीय नवरात्र महोत्सवात आज बुधवारी श्री तुळजाभवानी मंदीरात वैदिक होम व हवन कार्यक्रम झाला. सप्तसतीचा पाठ करुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पूर्णाहूती देण्याची प्रथा आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सपत्नीक सर्व विधीवत पूजेनंतर या होमास पूर्णाहुती देण्यात आली.


यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) योगिता कोल्हे, तहसीलदार श्री सौदागर तांदळे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले, आदी उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राजा श्री शिवराज बहादूर धर्मवंत धर्मकर्ण दक्षिण हैद्राबाद संस्थान यांचे यमजान पद पुरंजन कोडों, कांचन कोडों यांनी तर कोल्हापूर संस्थान छत्रपती चॅरिटेबल संस्थान कोल्हापूर यांच्यातर्फे उपाध्ये यजमान पद प्रतीकचंद प्रयाग, मंदाकीनी प्रयाग यांनी भूषविले. यावेळी व्यवस्थापक आप्पासाहेब पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. हैद्राबाद आणि कोल्हापूर संस्थानच्या होम हवनास मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी पूर्णाहुती दिली.
उद्या (दि. 14 रोजी) महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा दुपारी 12 वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन आणि रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक होणार आहे.