खंडाळा येथे उद्यापासून राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव

वैजापूर ,९ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान व शिवसेना शाखेच्यावतीने रविवारपासून माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन आ. रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते तर समारोप शिवसेना नेतेचंद्रकांत खैरे होणार असल्याची माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक कचरू वेळांजकर यांनी दिली.गेल्या दहा वर्षांपासून खंडाळा येथे बाळासाहेब ठाकरे ग्रामीण नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते.गेल्या वर्षांपासून माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाने राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.  यावर्षीही कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून,कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.

हभप साध्वी दुर्गा दीदी (बिडकीन),झी टॉकीज फेम हभप प्रतिभाताई कोकाटे, हभप भारतीताई गाडेकर (नागमठाण),समाज प्रबोधनकार हभप रोहिनीताई कार्ले संगमनेर), हभप मुक्तताई सोनवणे (नाशिक), झी टॉकीज फेम हभप शिवानी चाळक (पुणे), हभप मुक्ताबाई चाळक ( शिरूर),हभप राधिकाताई पुणे (कोरेगाव) हभप पुजाताई वाघ (दिंडोरी) माझा ज्ञानोबा फेम हभप जयश्रीताई तिकांडे आदींचा या कीर्तन महोत्सवात सहभाग असणार आहे.

या महोत्सवासाठी  संयोजक कचरू वेळांजकर,मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीनाना थोरात, गोरख शिंदे,उमेश शिंदे,विजय मगर,रामदास त्रिभुवन,अरुण जाधव, बाळासाहेब जानराव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.