ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील लाडका कलाकार गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 8 : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील लाडका विनोदी कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

श्री.देशमुख शोकसंदेशात म्हणतात, मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून खर्शीकर यांची कारकीर्द गाजली. आपल्या सहज आणि निखळ अभिनयामुळे मराठी सिनेसृष्टीत नव्वदच्या दशकातील चाहता कलाकार म्हणून ते परिचित होते. अविनाश खर्शीकर यांनी 1978 ला ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. तुझे आहे तुजपाशी मधला ‘श्याम’ ही भूमिका त्याचबरोबर ‘वासूची सासू, झोपी गेलेला जागा झाला, सौजन्याची ऐशी तैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके विशेष गाजली.

त्याचबरोबर आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या सात्विक अभिनयाचा अमीट ठसा त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटविला. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये नव्वदच्या दशकातील सिनेमांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.