केंद्रीय पथक गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणला भेट देणार ,75 लाखाहून अधिक चाचण्या
नवी दिल्ली ,२५जून :केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक गुजरात,महाराष्ट्र आणि तेलंगणला 26-29 जून 2020 दरम्यान भेट देणार आहे. हे पथक राज्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड-19 व्यवस्थापना बाबत सुरु असलेले प्रयत्न बळकट करण्यासाठी समन्वय साधेल.
देशभरात चाचणी सुविधात लक्षणीय वाढ करत, भारतात आता 1007 निदान प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 734 सरकारी क्षेत्रातल्या तर 273 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.
याचा तपशील याप्रमाणे आहे-
- जलद आरटी पीसीआर आधारित निदान प्रयोगशाळा : 559 (सरकारी: 359 +खाजगी: 200)
- ट्रू नॅट आधारित निदान प्रयोगशाळा: 364 ( सरकारी :343 +खाजगी: 21 )
- सीबीएनएएटी आधारित निदान प्रयोगशाळा : 84 ( सरकारी:32+ खाजगी :52 )
जानेवारी 2020 मधल्या मर्यादित चाचण्यावरून आता गेल्या 24 तासात 2,07,871चाचण्या करण्यात आल्या, त्यामुळे चाचण्यांची संख्या आता 75 लाखाहून अधिक होत 75,60,782 झाली आहे.

गेल्या 24 तासात 13,012 कोविड-19 रुग्ण यातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2,71,696 रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले आहेत. कोविड-19 मधून रुग्ण बरे होण्याचा दर आता 57.43 % झाला आहे.

सध्या 1,86,514 सक्रीय रुग्ण असून हे सर्व रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
भारतात सध्या प्रती लाख लोकसंख्येमध्ये 33.39 रुग्ण असून जागतिक स्तरावर हे प्रमाण लाखभर लोकसंख्येत 120.21 रुग्ण आहे. देशात लाखामागे मृत्यूचे प्रमाण 1.06 असून जगातल्या कमी मृत्यू प्रमाणात याचा समावेश आहे,जागतिक स्तरावर हे प्रमाण लाखामध्ये सरासरी 6.24 मृत्यू इतके आहे.
भारताचा कोविड विरोधात लढा : उत्तर मुंबई उपनगरातील विषाणू नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘धारावी मॉडेल’ : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये कोरोना विषाणू विरोधात सामना करताना आलेल्या अनुभवांचा फायदा करून त्याच धर्तीवर बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका), शहराच्या उत्तरेकडील उपनगरांमध्ये शीघ्र कृती आराखडा राबविणार आहे. एकीकडे मुंबईतील कोविड-19 चे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी आणि वरळीत तुलनेने परिस्थिती सुधारत असताना दुसरीकडे उत्तर मुंबई उपनगरातील मुलुंड, भांडुप, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर इथे दररोज अधिकाधिक रुग्णांची नोंद होत आहे. वरळी आणि धारावीत संसर्ग रोखण्यासाठी राबविलेल्या रणनीतीच्या धर्तीवर शीघ्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याचा एक भाग म्हणून बीएमसीने या प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या भागात 50 रुग्णवाहिन्यांच्या माध्यमातून तापाचे निदान करण्यासाठी फिरते दवाखाने तैनात केले आहेत. हे फिरते दवाखाने डॉक्टरांच्या पथकासह दिवसभर घरोघरी जाऊन रहिवाशांची ताप आणि इतर लक्षणे याबाबत तपासणी करतात, गंभीर रुग्ण तपासतात आणि एखादी व्यक्ती संशयित आढळल्यास तिच्या घशातील स्रावाचे नमुने गोळा करतात. विस्तृत स्क्रीनिंगच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणात किमान 10,000 घरांचे सर्वेक्षण अपेक्षित आहे.