काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधीच

पुढील वर्षी अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक

Image

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज झाली. या बैठकीत सोनिया गांधी , राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षपदाबाबतची चर्चा झाली. चर्चेनंतर सोनिया गांधी याच काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. तसेच नवीन अध्यक्षाची निवड पुढील वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये करण्यात येणार असल्याचं ठरलं आहे.

Image

काँग्रेसच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यकारणी बैठकीत काँग्रेसची सत्ता असलेल्या ३ राज्यांचे मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्र्यांसह अनेकांनी पुन्हा एकदा  राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी केलीय. त्यामुळे राहुल गांधी या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी या मागणीवर विचार करणार आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेंद्र बघेल, माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची मागणी केलीय.

राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद का सोडलं?

खासदार राहुल गांधी यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर अचानक अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. काँग्रेसतर्गत मोठा काळ राहुल गांधी यांना हा निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले. मात्र, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम राहणं पसंत केलं.

Image

मीच काँग्रेसची अध्यक्ष

आज झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी म्हटलं, मीच काँग्रेस पक्षाची पूर्णवेळ अध्यक्ष आहे. मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे. माध्यमांतून माझ्यासोबत बोलण्याची गरज नाहीये. आपण सर्वांनी प्रामाणिकपणए चर्चा करूया. संघटनात्मक निवडणुका आणि अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सोनिया गांधी म्हणाल्या, आम्ही 30 जूनपर्यंत काँग्रेसच्या नियमित अध्यक्षांच्या निवडीचा रोडमॅप अंतिम केला होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्याची मागणी केली होती. गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची तात्काळ बैठक घेण्याचं आवाहन केलं होतं. तर कपिल सिब्बल यांनी पंजाब काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींवरुन पक्ष नेत्रृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते.

आगामी विधानसभा निवडणुकांनंतरच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक

कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधी घ्यायची यावर चर्चा झाली. मात्र, बहुसंख्य लोकांनी लगेच ही निवडणूक घेण्याला विरोध केला. सध्या पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात आणि गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीकडे लक्ष द्यावं, असंच त्यांचं म्हणणं होतं. आत्ताच पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेतल्यास निवडणुकांच्या तयारीवर याचा परिणाम होईल, असंही मत व्यक्त करण्यात आलं.

कार्यकारणीतील बहुतांश सदस्यांनी नव्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होण्याआधी सदस्यता अभियान आणि स्थानिक पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंतच्या निवडणुका घेण्याचं मत व्यक्त केलं. मात्र, या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत न घेण्याचंही मत व्यक्त करण्यात आलं.