नृत्य-संगीत-मल्टीमीडिया द्वारे गांधी-बोधचा प्रवास

“सूत्रात्मन” या दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता

औरंगाबाद, ३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- गांधी जयंती निमित्त महागामी द्वारे आयोजित “सूत्रात्मन” या दोन दिवसीय (२ ऑक्टो. व ३ ऑक्टो. २०२१) कार्यक्रमाची आज सांगता करण्यात आली. आजच्या कार्यक्रमाचे सादरीकरण सकाळी ११.०० वाजता, रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर येथे करण्यात आले. गांधीजींचे तेजस्वी धागे या विषयावर नृत्य-संगीत-मल्टीमीडिया द्वारे गांधी-बोध चा प्रवास दाखवण्यात आला.  


तेजस्वी आत्मा आणि प्रबुद्ध मनाला श्रद्धांजली म्हणून ज्याने आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आणि ज्याने करुणा, क्षमा, सत्य, विश्वास आणि देवत्वाचे धागे विणण्याच्या दिशेने आपला प्रवास उजळवला.
‘सूत्रात्मन या कार्यक्रमाची संकल्पना, पटकथा आणि नृत्यदिग्दर्शन पार्वती दत्ता यांची होती.  ‘सूत्र’ चा अर्थ म्हणजे ‘धागा’, ‘नियम’, ‘शब्द’ किंवा ‘मार्गदर्शक तत्त्वे’ आहे. खादी म्हणजेच हाताने कातलेल्या धाग्यांनी विणलेले कापड, केवळ स्वतःचे कपडेच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी मातृभूमी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.

महात्मा गांधींचा जीवनक्रम म्हणजेच बाल मोहनदास, बॅरिस्टर गांधी आणि महात्मा गांधी हे तीन गांधी नृत्यसंगीताद्वारे सादर केले गेले. त्याचप्रमाणे गांधींचे ११ सिद्धांत जसे की, सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अस्तेय, अपरिग्रह, शरीर श्रम, आस्वाद, अभय, स्वदेशी, सर्वधर्म समानत्व, अस्पृश्यता निवारण इत्यादी नृत्याद्वारे प्रेक्षकांसमोर मांडले गेले, एकूणच या कार्यक्रमाद्वारे महात्मा गांधींचे वर्णन ‘ सूत्रात्मन्’ असे केले गेले आहे,  त्यांची  तटस्थ पण करुणामय मूर्ती सत्य, अहिंसा, क्षमा, विश्वास, अध्यात्म यासारख्या भावनांच्या धाग्यांनी बनलेली आहे. असा आत्मा जो सूक्ष्म धाग्याप्रमाणे विश्वाला पार करू शकतो, तो सूत्रधार आहे. नृत्य-नाट्य-मल्टीमीडिया या माध्यमांद्वारे सूत्र आणि उपमांच्या रचनेत महात्मा गांधींचे जीवन, संघर्ष, संकल्प आणि श्रद्धा विणून ‘ सूत्रात्मन्’ ही रचना सादर केली गेली.या कार्यक्रमात महागामी समूहा द्वारे कथक आणि ओडिसीची देखील प्रस्तुति सादर करण्यात आली.


या कार्यक्रमाला एम जी एम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम,  एम. जी एम. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, एम जी एम  विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. विलास सपकाळ तसेच विश्वस्त व माजी प्राचार्य प्रा. प्रताप बोराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याचप्रमाणे कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालन करून  विद्यार्थी व पालक यांचाही कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला.
गांधीजयंती निमित्त आयोजित “सूत्रात्मन” या कार्यक्रमासोबतच महागामी द्वारे या आठवड्यात गांधींजीना अर्पित “शांती सप्ताह” चे  औचित्य साधून  विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ४ व ५ ऑक्टो. रोजी सायंकाळी ५ ते ६.५० या वेळेत “बासरी वादन” कार्यशाळा, ६ व ७ ऑक्टो. रोजी “स्वर संगीत कार्यशाळा, ७ व ८ ऑक्टो. रोजी सायंकाळी ६ ते ७. या वेळेत “कथक व ओडिसी’ नृत्य कार्यशाळा आणि ९ ते ११ ऑक्टो. या दिवसांत गांधींची जन्मभूमी पोरबंदर येथील “शौर्य रास” या पारंपरिक नृत्याची कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुठल्याही कार्यशाळेत इच्छुकांना नोंदणी करून सहभाग नोंदवता येणार आहे तसेच या सर्व कार्यशाळेस इच्छुकांना ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे.