डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई ,२० सप्टेंबर /प्रतिनिधी :- वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. रविंद्र सिंगल यांच्या सायकल शर्यतीवरील अनुभवांचे संकलन असलेल्या ‘पेडलींग जर्नी : डेक्कन क्लिफ हँगर’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी करण्यात आले.

डॉ. सिंगल यांनी २०१७ मध्ये पुणे ते गोवा डेक्कन क्लिफ हँगर या ६४३ किलोमीटरच्या सायकलिंगच्या शर्यतीमध्ये भाग घेतला होता. ही शर्यत अतिशय खडतर होती तसेच विशिष्ट कालमर्यादेत ती पूर्ण करणे अतिशय आवश्यक होते. त्याकरिता मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती तसेच सराव क्रमप्राप्त होते. याकरिता डॉ. सिंगल यांनी ६ महिने प्रशिक्षण घेतले.

त्यांनी ४ नोव्हेंबर, २०१७ रोजी प्रत्यक्षात सदर शर्यतीत भाग घेतला. त्यांच्याबरोबर इतर काही प्रतिस्पर्धी होते, परंतु मानसिक व शारीरिक थकव्यामुळे काहींनी ही शर्यत मध्येच सोडून दिली. तथापि, डॉ. सिंगल यांनी  मानसिक तयारी असल्याने ही  शर्यत वयाच्या पन्नाशीतही पूर्ण केली.

या शर्यतीचा ६४३ किलोमीटरचा सायकलवरील खडतर प्रवास करताना शारीरिक व मानसिक क्षमतांचा पूर्ण कस लागला तो  प्रवास तरुणांचे  मनोधैर्य व मनोबल उंचावण्याकरिता नक्कीच प्रेरणादायी ठरावा म्हणून डॉ. सिंगल यांनी हे पुस्तक लिहिले. डॉ. वैशाली बालाजीवाले या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत.

पुस्तक प्रकाशनप्रसंगी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगलदेखील उपस्थित होत्या.