मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट बोलायला हवे,युती करण्यासाठी शिवसेनाच असावी असं काही आहे का? : नारायण राणे

मुंबई ,१८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट बोलायला हवे, अशा शब्दांत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना-भाजप युतीबाबतच्या कथित वक्तव्यावर भाष्य केले आहे.भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी युती करण्यासाठी शिवसेना असावीच असं आहे का? असं म्हणत चर्चेला पूर्णविराम दिला. तसंच, हे सरकार कुठल्याही क्षणी पडणार आहे, असं भाकितही राणेंनी वर्तवलं.

मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे हे मी कसं सांगणार? मी ज्योतिषी नाही. त्यांना आमच्यासोबत यायचं असेल तर त्यांनी ‘उद्याचे सहकारी’ असा शब्दप्रयोग करायला हवा होता. त्यांनी स्पष्ट बोलायला हवे. ते तसं बोललेले नाहीत. त्यामुळे त्यावर काय बोलणार, असे राणे पुढे म्हणाले.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरू झाली. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवातच ‘व्यासपाठीवरील आजी-माजी सहकारी आणि एकत्र आले तर भावी सहकारी’ अशी केली. मुख्यमंत्र्यांनी प्रथमच केलेल्या अशा वक्तव्यामुळं युतीची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सर्वच राजकीय नेते व्यक्त झाले आहेत.

‘भाजप आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा होत आहे, असं विचारलं असताना राणे म्हणाले की,  कोणती युती आणि कुणाबरोबर होणार आहे? याबद्दल काही माहिती नाही.  युती करायला काय शिवसेनाच असावी, चंद्रकांत पाटील यांना मंत्री होण्यासाठी शिवसेनाच युती करण्यासाठी असावी असं काही आहे का? असं सूचक विधानही राणे यांनी केलं.

 ‘हे सरकार पडणार आहे. यांच्यातील अंतर्गत वादामुळे हे सरकार पडणार आहे. मी काही वेळ दिला नव्हता ही याच दिवशी हे सरकार पडणार आहे. पण, आता लवकरच  आणि कुठल्याही क्षणी हे सरकार पडणार आहे’, असंही राणे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीमध्ये आणू नये अशी भूमिका मांडली होती. यावर राणे म्हणाले की, ‘पेट्रोल-डिझेलचे दर कोण ठरवणार? अजित पवार यांचा काय संबंध आहे? असा सवालच राणेंनी उपस्थितीत केला.

मुख्यमंत्र्यांचे मुंबईला येण्याचे निमंत्रण : दानवे

मुख्यमंत्री माझ्या कानात म्हणाले, तुम्ही मुंबईला येत नाहीत. या एकदा मुंबईला. बसू आपण. हे सगळं बाळासाहेब थोरात ऐकत होते. काँग्रेसवाले मला ताप द्यायला लागले तर मी भाजपवाल्यांना बोलावून घेत असतो. मग ते मला ताप कमी देतात, असं मुख्यमंत्री मला म्हणाले. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, सध्या ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी तुम्हाला कोणीही ताप देणार नाही. पण तुम्हाला जर काही अनुभव आला असेल, तर आपण बसू, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

मनातील भावना बोलून दाखवली : फडणवीस

राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, पण आज ते मला दिसत नाही. स्पष्टपणे सांगतो, भाजप सरकार बनवण्याच्या मानसिकतेत नाही. भाजप महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा घेऊन आंदोनल करत आहे. भाजप सरकारला उत्तरदायित्व शिकवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा ऐवढाच अर्थ निघतो की, त्यांच्या लक्षात आलं की, ते कशा प्रकारच्या लोकांसोबत सरकार चालवत आहेत. भ्रष्टाचार होत आहे. हे सगळं मुख्यमंत्र्यांना समजलं असेल, असे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना गंमत करायची सवय : पटोले

मुख्यमंत्र्यांना गंमत करायची सवय आहे. त्यानुसारच ते बोलले. राज्यात सद्यस्थितीत लोकांमध्ये ताणतणाव आहे. मुख्यमंत्र्यांची आधीपासूनच थट्टामस्करी करण्याची सवय आहे. आजही त्या पद्धतीने त्यांनी जोक केला, गंमत केली. शेवटी ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी कोणता निर्णय घ्यायचा ते त्यांच्या हातात आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्षे चालणार असा विश्वास आहे. त्यांनीही तो बऱ्याचदा बोलून दाखवलं आहे. त्यामुळे हे विधान फारसं गांभीर्याने घेऊ नये, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.