ऑगस्ट महिन्यात एकूण 1,12,020 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित

नवी दिल्‍ली, १ सप्टेंबर /प्रतिनिधी :-ऑगस्ट 2021 महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण 1,12,020 कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. त्यापैकी सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 20,522 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 26,605 कोटी रुपये, आयजीएसटी 56,247 कोटी रुपये (यामध्ये वस्तूंच्या आयातीवर जमा 26,884 कोटी रुपये) आणि अधिभार 8,646 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 646 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित परतावा म्हणून आयजीएसटीमधून 23,043 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 19,139 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. तसेच केंद्राने केंद्र आणि राज्य सरकारे /केंद्रशासित प्रदेश यांच्यातील 50:50 गुणोत्तरात आयजीएसटीचा तात्कालिक समझोता म्हणून 24,000 कोटी रुपये दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, ऑगस्ट 2021 या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारांना 55,565 कोटी रुपये सीजीएसटीपोटी आणि 57,744 कोटी रुपये एसजीएसटीपोटी मिळाले आहेत.

गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा ऑगस्ट 2021 मधील महसूल 30% अधिक आहे. या महिन्यात देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल याच स्त्रोतांद्वारे गेल्या वर्षी याच महिन्यात संकलित महसुलापेक्षा 27% अधिक राहिला. ऑगस्ट 2019-20 मधील 98,202 कोटी रुपयांचे महसूल संकलन लक्षात घेतली तर यावर्षी महसूल संकलन 14% नी वाढले आहे.

सलग नऊ महिन्यांपर्यंत 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी संकलन झाल्यानंतर कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे ते जून 2021 मध्ये कमी होऊन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाले.  कोविड संबंधित निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट 2021 मध्ये जीएसटी संकलनाने पुन्हा 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे हे स्पष्ट निदर्शक आहे. आर्थिक विकासासोबतच, कर-चोरीविरोधी कारवाई, विशेषतः बनावट बिले करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईने देखील जीएसटी महसूल वाढविण्यात योगदान दिले.  आगामी महिन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीएसटी महसूल संकलन होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 मध्ये जीएसटी महसुलाचे संकलन 11,602 कोटी रुपये इतके होते, तर ऑगस्ट  2021 मध्ये जीएसटी महसुलाचे संकलन 15,175 कोटी रुपये झाले. महसुलात 31% ची  वाढ झाल्याचे दिसून येत आहे.