हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाद्वारे ‘निर्माणश्री’ प्रकल्पाअंतर्गत

महासाथीपश्चात उपजिविका व आर्थिक संधींच्या निर्मितीचे उद्दिष्ट 

औरंगाबाद,३० ऑगस्ट /प्रतिनिधी :- महाराष्ट्र आणि ओडिशातील ३,००० महिलांना हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाकडून ‘निर्माणश्री’ प्रकल्पांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. युरोपिय महासंघाद्वारे वित्तपुरवठा केल्या जाणाऱ्या, ‘निर्माणश्री’ प्रकल्पाचे उद्दिष्ट गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित सेवांमध्ये महिलांचा सहभाग सुधारून त्यांना त्यासाठी सक्षम बनविणे आणि त्यांच्यासाठी आर्थिक संधी निर्माण करणे हा आहे.

Displaying Image 2 Construction Skill Training.jpg

महाराष्ट्रातील बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १,२६२ महिलांनी बांधकाम कौशल्य आणि सामाजिक उपक्रमशीलतेचे प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये गवंडी कामात सहाय्यक, एंटरप्राइझ डेव्हलपमेंट प्रोग्राम (ईडीपी), महिला सक्षमीकरण आणि सामाजिक हक्कांबद्दल जागरूकता, निम्न-कर्ब उत्सर्जन उत्पादने आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग आदि विषयांमध्ये आतापर्यंत ९० तुकड्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. शिकवण-केंद्रित आणि परिणाम-आधारित दृष्टिकोनावर भर देणाऱ्या प्रशिक्षणाचे उद्दीष्ट महिलांची उद्यम क्षमता विकसित करणे आणि त्यांना रोजगाराच्या संधींसह त्यांचे सक्षमीकरण असे आहे.

प्रकल्पासंबंधी बोलताना हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजन सॅम्युएल म्हणाले, “प्रकल्प ‘निर्माणश्री’चा हेतू वंचितांसाठी पक्क्या निवाऱ्याच्या विकासासह महिलांसाठी आर्थिक संधी निर्माण करणे असा आहे. आमची भूमिका तांत्रिक आणि उद्यमी कौशल्य विकासला सुलभ करणे, सहभागींना बाजाराला आणि स्पर्धेला भिडण्यासाठी सक्षम करणे आणि त्यांच्यात सामाजिक हक्कांबाबत सजगतेसाठी आहे, ज्यायोगे त्यांना यशस्वी उपक्रम चालवण्यास सक्षम बनविले जाईल. अत्यंत समर्पक घडीला केला गेलेला हा हस्तक्षेप आहे. प्रशिक्षण घेऊन तयार झालेल्या या महिला गवंडी बांधकाम क्षेत्रात सामील होतील आणि साथीनंतरच्या कुटुंबाच्या अर्थार्जनामध्ये लक्षणीय योगदान देतील.”

Displaying Image 3 EDP Training .jpg

या प्रशिक्षणक्रमात, थेअरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक ज्ञान दोहोंचा समावेश असून भारतीय बांधकाम कौशल्य विकास परिषद (सीएसडीसीआय) यांच्या प्रमाणित प्रशिक्षकांद्वारे ते प्रदान केले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, उमेदवारांच्या तृतीय-पक्ष मूल्यांकनासाठी त्यांना राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि स्किल इंडियाद्वारे प्रमाणित केले जाते.

हे प्रमाणपत्र महिलांना गवंडी म्हणून काम करण्यास सक्षम करेल, त्यांना वित्तपुरवठा मिळविण्यास पात्र बनवेल आणि त्या स्वतःचा सूक्ष्म व्यवसाय सुरू करू शकतील. इमारत आणि अन्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांमध्ये त्यांच्या नावांची नोंदणी करता येऊ शकेल, जेणेकरून त्या त्या राज्यात या मंडळांनी देऊ केलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या त्या लाभार्थी ठरू शकतील. 

कोविड -१९ साथ प्रतिबंधासाठी असणाऱ्या निर्बंधांमुळे, तुकड्यांमध्ये प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी स्थानीय प्रशासनाकडून परवानग्या प्राप्त केल्या जातात. प्रशिक्षणादरम्यान सुरक्षित अंतरविषयक नियमांचे काळजीपूर्वक पालन केले जाते आणि प्रशिक्षण व्यासपीठाचा वापर कोविड -१९ लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी देखील केला जातो. या आव्हानात्मक वातावरणात, निर्माणश्री प्रकल्पाचे हे प्रशिक्षण ऑक्टोबर २०२१ पर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.