रुग्णांना दाखल करुन घेण्यास खाजगी रुग्णालयांनी टाळाटाळ करु नये -जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद, दि.18– खाजगी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखल करुन घ्यावे व कोणालाही परत पाठवू नये. रुग्ण गंभीर असल्यास व वेंटिलेटरची किंवा आयसीयु बेडची उपलब्धता नसल्यास त्याबाबत पूर्वकल्पना देऊन सामान्य बेडवर दाखल करुन घ्यावे व उपचार सुरू करुन तातडीने महापालिका नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, जेणेकरून रुग्णास इतर ठिकाणी आयसीयु बेडसच्या उपलब्धतेप्रमाणे स्थलांतरीत करता येईल किंवा कसे याबाबत तपासणी करुन कार्यवाही करावी. तसेच महापालिका नियंत्रण कक्षाकडून रेफर होणाऱ्या कोणत्याही रुग्णास ॲडमिशन नाकारण्यात येऊ नये. रुग्णांना दाखल करुन घेण्यास खाजगी रुग्णालयांनी टाळाटाळ करु नये, अशी सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शहरातील प्रमुख खाजगी रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रवार, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर, बजाज हॉस्पीटलचे डॉ.अलोक श्रीवास्तव, सिग्मा हॉस्पीटलचे धीरज तिवारी, धूत हॉस्पीटलचे डॉ.हिमांशू गुप्ता, एमजीएम हॉस्पीटलचे डॉ.प्रविण सूर्यवंशी, हेडगेवार हॉस्पीटलचे डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, महापालिका नियंत्रण कक्षाचे डॉ.बशीर खान व वॉर रुम प्रमुख ॲलिस पोरे हे उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व खाजगी रुग्णालये हे शासन व प्रशासन यांचे सहयोगी म्हणून कार्यरत आहेत, ही चांगली व अभिमानास्पद गोष्ट आहे. भविष्यात देखील अजूनही चांगले सहकार्य लाभेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी रुग्णालयांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीने संबंधीतांना निर्देश दिले.

जिल्हाधिकारी सूचना करताना म्हणाले की, रुग्णवाहिकाद्वारे किंवा इतर वाहनाद्वारे आलेल्या रुग्णाला रुग्णालयाबाहेर वाहनातच ताटकळत न ठेवता, तातडीने कॅज्युअलिटी विभागात दाखल करावे, या करीता कॅज्युअलिटी विभागात ऑक्सीजनयुक्त किमान दोन खाटांची व्यवस्था ठेवावी व तिथेच तातडीने आवश्यकतेप्रमाणे ऑक्सीजन उपचार देण्याबाबत कार्यवाही करावी. याबाबत उपस्थित सर्व खाजगी रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तयारी पूर्ण असुन याबाबत अनुकूलता दर्शविली.

खाजगी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये कोविड संशयित व्यक्तींची तपासणी करण्याची अनुमती तथापि सदर व्यक्तीचा स्वॅब घेतल्यानंतर सदर व्यक्ती हा महापालिकेच्या विलगीकरण केंद्रातच दाखल केला जाईल याबाबत नियोजनपुर्वक कार्यवाही करण्याचे त्यांनी सूचित केले.

खाजगी रुग्णालयामध्ये अनावश्यक खाटा आरक्षित राहू नये या दृष्टीने कोविड बाधीत रुग्णांस सौम्य किंवा मध्यम लक्षणे असल्यास पहिल्या पाच दिवसांत उपचार करुन, नंतर सातत्याने लक्षणे नसल्याची खात्री करुन, पुढील उर्वरीत दिवस महापालिकेच्या कोविड केअर सेंटरला रेफर करावे, असे जिल्हाधकारी यांनी सांगितले. याबाबत उपस्थित असलेल्या महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.निता पाडळकर यांनी कार्यपध्दती ठरवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येक रुग्णालयांनी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या खाटा, तसेच एकुण खाटा व कोविडसाठी आरक्षित खाटा यांची माहिती दर्शनी भागात ठळकपणे डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातुन लावावी तसेच [email protected] हा तक्रारीसाठीचा ईमेल ठळकपणे प्रदर्शित करावा. त्याचप्रमाणे महापालिकामार्फत प्रत्येक रुग्णालयांसाठी समन्वयाकरीता एका अधिकाऱ्याची नेमणुक करावी व सदर अधिकाऱ्याने नियंत्रण कक्षास समन्वय ठेवावा, असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले. तसेच खाजगी रुग्णालयामध्ये आयसीयु बेड उपलब्ध नसले तरी गंभीर रुग्ण दाखल करुन घ्यावे व सदर रुग्णाची प्रकृती खालावली तर अशा वेळी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद येथे समन्वय साधून रुग्ण स्थलांतरीत करण्याबाबत महापालिकेच्या नियंत्रण कक्षामार्फत कार्यवाही करावी, जेणेकरुन लगेच रुग्णाला योग्य त्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *