कोरोना संकटाने भारताला आत्मनिर्भर म्हणजेच स्वयंपूर्ण होण्याचा धडा दिला -पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोळसा खाणींच्या व्यावसायिक खाणकामांसाठीच्या लिलाव प्रक्रियेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Banner

सर्वांना नमस्कार

देशविदेशातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप स्वागत. इतक्या आव्हानात्मक काळात आपण अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित करणे आणि त्यात सगळ्यांनी सहभागी होणे, ही घटनाच सर्वांच्या मनात आशेचा किरण जागवणारी आहे, विश्वासाचा एक खूप मोठा संदेश देणारी आहे.

भारत कोरोनाशी लढाई करत आहे, आणि भविष्यात आपण ही लढाई जिंकणारही आहे, एवढेच नाही, तर पुढे प्रगती देखील करणार आहे. या संकटाला, संकट समजून रडत बसणे, हा भारताचा स्वभाव नाही. उलट संकट कितीही मोठे असले, तरीही, त्या संकटाचे रुपांतर संधीमध्ये करण्यास, भारत कटिबद्ध आहे.  कोरोनाच्या या संकटाने भारताला आत्मनिर्भर म्हणजेच स्वयंपूर्ण होण्याचा धडा दिला आहे.

आत्मनिर्भर भारतासाठी सगळ्यात आधी आपण आयातीवरचे आपले अवलंबित्व कमी करणार आहोत. आत्मनिर्भर भारत, आयातीवर खर्च होणाऱ्या, कोट्यवधी रुपयांच्या परदेशी चलनाची बचत करणार आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे, भारताला आयात करावी लागू नये, म्हणून अशी उत्पादने आणि त्यांची संसाधने देशातच विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे.  तुमच्यावर माझा जो विश्वास आहे, त्यांच्या भरवशावर मी सांगतो आहे, की आज आपण जे आयात करतो, त्याच उत्पादनांचे आपण उद्या सर्वात मोठे निर्यातदार बनू.  

मित्रांनो, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे आपण एकेका क्षेत्रावर भर देत, एकेका उत्पादनाचा विचार  करत, एकेका सेवा क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करत, सर्वसमावेशक पद्धतीने काम करायला हवे. आपण एकेका क्षेत्राची निवड करत, त्या त्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आजचा हा कार्यक्रम हाच विचार प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाउल आहे, एक महत्वाचा उपक्रम आहे.

आज उर्जा क्षेत्रात, भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी, स्वयंपूर्ण बनवण्यासाठी एक फार मोठे पाऊल उचलले जात आहे. हा कार्यक्रम केवळ कोळसा खाणक्षेत्राशी संबंधित, एका क्षेत्राशी संबंधित सुधारणा प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याचा नाही, तर उलट, हा कार्यक्रम 130 कोटी भारतीयांच्या आकांक्षा पूर्णत्वास नेण्याची कटिबद्धता व्यक्त करणारा आहे. आमच्या युवा मित्रांसाठी रोजगाराच्या लाखो संधी निर्माण करण्याची ही सुरुवात आहे.

मित्रांनो, आत्मनिर्भरतेचा संकल्प प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जेव्हा गेल्या महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा अनेक लोकांना वाटले की ही एक सर्वसाधारण सरकारी प्रक्रिया असेल. मात्र केवळ महिनाभरात, ही घोषणा, मग त्या सुधारणा असोत किंवा कृषी आणि एमएसएमई क्षेत्र असू दे किंवा मग कोळसा आणि खाणकाम, अशा प्रत्यके क्षेत्रासाठी अनेक प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत, पावले उचलली जात आहेत, हे निर्णय त्वरित अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

यातूनच दिसते आहे की भारत, या आव्हानाचे संधीत रुपांतर करण्यासाठी कितपत गंभीर आहे, किती कटिबद्ध आहे. आज फक्त व्यावसायिक पद्धतीने कोळसा खाणींच्या  लिलाव प्रक्रियेचे उद्घाटन नाही, तर  गेल्या कित्येक दशकांपासून लॉकडाऊन मध्ये असलेल्या कोळसा खाणींना लॉकडाऊनमधून बाहेर काढण्याचा दिवस आहे.

लॉकडाऊन मुळे कोळसा क्षेत्रावर झालेला परिणाम किती आणि कसा झाला आहे? हे माझ्यापेक्षा जास्त चांगले तुम्हाला माहिती आहे. विचार करा, जो देश कोळसा साठ्यांच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकाचा मोठा देश आहे, जो जगातला सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश आहे आहे, तो देश कोळशाची निर्यात करत नाही. उलट, आमचा देश कोळशाची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

जर आपण एकप्रकारे जगातील कोळशाचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश असू, जागतिक कोळशाच्या सर्वाधिक उत्पादक देशांच्या यादीत जर आपण असू, तर हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे .आपण  जगात कोळशाचे सर्वात मोठे निर्यातदार का होऊ शकत नाही? आणि हे आपल्या सर्वांनी स्वतः ला विचारायचे आहे. आज हाच प्रश्न माझ्या, तुम्हा सर्वांच्या आणि कोट्यवधी भारतीयांच्या मनात आहे. 

मित्रांनो, आमच्याकडे दशकांपासून हीच परिस्थिती होती, देशाच्या कोळसा क्षेत्राला बंदिस्त आणि खुल्या अशा जाळ्यात अडकवून ठेवले होते. या क्षेत्राला स्पर्धेच्या बाहेर ठेवण्यात आले होते, पारदर्शकतेचा एक मोठा प्रश्न होता, प्रामाणिकपणे लिलावप्रक्रिया तर सोडाच, कोळसा खाणींच्या वितरणात, मोठ मोठे घोटाळे झाल्याची चर्चा प्रत्येकाने ऐकली आहे, नेहमीच, कानाकोपऱ्यात ही चर्चा झाली आहे. याच कारणामुळे, कोळसा क्षेत्रात गुंतवणूक देखील कमी होत होती आणि त्याच्या कार्यक्षमतेविषयी देखील कायम प्रश्नचिन्ह उभे केले जात असे. कोळसा कोणत्यातरी राज्यात उत्पादित होत असे, मात्र तो शेकडो किलोमीटर दूर इतर कुठल्या तरी राज्यातल्या उर्जा प्रकल्पासाठी पाठवला जात असे, मात्र, जिथे उत्पादन व्हायचे, ती राज्ये आपल्या उर्जा प्रकल्पासाठी कोळशची वाट बघत बसत म्हणजे सगळीकडे नुसती अव्यवस्था होती, अनागोंदी होती.

मित्रांनो, 2014 नंतर, ही परिस्थिती बदलण्यासाठी एकापाठोपाठ एक अनेक पावले उचलण्यात आली. ज्या कोळसा क्षेत्राच्या जोडणीविषयी कोणी विचारही केला नसेल, ते आम्ही करुन दाखवले. अशा पावलांमुळेच कोळसा क्षेत्र अधिक मजबूत झाले आहे. आज मोठमोठ्या सुधारणा पचवण्याची ताकद या क्षेत्रात आली आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या सुधारणांवर केवळ चर्चाच सुरु होती, त्याही आम्ही अलीकडेच केल्या. आपणही ती चर्चा करत होतात. स्वतःला जे निर्यात स्पर्धक मानतात, ते ही करत होते. आता भारताने, कोळसा आणि खनिकर्म क्षेत्राला स्पर्धेसाठी, भांडवलासाठी, सह्भागीत्व आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठी संपूर्णपणे खुले केले आहे. ज्या नव्या कंपन्या खाणकाम क्षेत्रात येतील, त्यांना पैशांच्या बाबतीत काही अडचण येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे आहे जेणेकरुन नव्या लोकांना प्रोत्साहन मिळेल.

मित्रांनो, एक भक्कम खाण आणि खनिज क्षेत्राविना स्वयंपूर्णता शक्य नाही. कारण खान आणि खनिजक्षेत्र आपल्या अर्थव्यवस्थेचे महत्वाचे दोन स्तंभ आहेत. या निर्णयानंतर कोळसा उत्पादन, संपूर्ण कोळसा क्षेत्र एकप्रकारे या यामुळे आत्मनिर्भर होऊ शकेल. आता कोळशासाठीचा बाजार मुक्त झाला आहे. ज्या क्षेत्राला जेवढी गरज असेल, ते क्षेत्र ही निर्मिती करू शकेल.

मित्रांनो, ज्या सुधारणा आम्ही केल्या आहेत, त्यांचा लाभ केवळ कोळसा क्षेत्राला नाही, तर दुसऱ्या अनेक क्षेत्रांनाही मिळणार आहे. जेव्हा आम्ही आपले कोळशाचे उत्पादन वाढवू तेव्हा उर्जानिर्मितीत वाढ होईल. त्यासोबतच, पोलाद, अल्युमिनियम, फर्टिलायझर, सिमेंट अशा सर्व क्षेत्रांवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. सुदैवाने, आपल्याकडे, कोळसा, लोह, बॉक्साइट सारख्या अनेक खनिजांचे साठे जवळजवळ आहेत. एकमेकांच्या बरेच जवळ आहेत. एकप्रकारे जसे निसर्गाने आपल्याला हा समूहच बनवून दिला आहे. अशा स्थितीत, अलीकडेच, खनिज क्षेत्रांसाठी ज्या सुधारणा केल्या त्या कोळसा खाणकामाच्या सुधारणांशी निगडीत असल्यामुळेच ही इतर सर्व क्षेत्रे देखील, भरपूर भक्कम झाली आहेत. 

मित्रांनो, व्यवसायिक कोळसा खाणकामांसाठीच्या लिलावाला आज जी सुरुवात होत आहे, ती या क्षेत्रातील प्रत्येक हितसंबंधी गटासाठी लाभदायक परिस्थिती आहे. उद्योगक्षेत्राला, आपल्याला, आपल्या व्यवसायासाठी, आपल्या गुंतवणुकीसाठी आता नवी संसाधने मिळणार आहे, नवी बाजारपेठ मिळणार आहे. त्यासोबतच, राज्य सरकारांना उत्तम महसूल मिळणार आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येला रोजगार मिळणार आहे. एकप्रकारे, गरिबांची सेवा करण्याचे काम कोळशामुळे देखील होऊ शकते, हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होणार आहे. म्हणजेच, प्रत्येक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम दिसू शकेल आणि मला जे वाटत आहे, त्यामुळे आपल्या देशातील गरीब भागात आणि ग्रामीण भागातील लोकांचे सर्वात जास्त आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत.

मित्रांनो, कोळसा क्षेत्रात सुधारणा करतांना याकडेही लक्ष देण्यात आले की, पर्यावरण संरक्षणाची भारताची कटीबद्धता यामुळे कुठूनही दुर्बल होऊ नये. कोळशापासून वायूनिर्मिती करण्यासाठी आता आपण एका चांगल्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत आणि अधिक अद्ययावत तंत्रज्ञान देखील येऊ शकेल. कोळशापासून वायूनिर्मिती करण्याच्या पावलांमुळे पर्यावरण संरक्षण देखील होणार आहे. कोळशापासून तयार होणाऱ्या वायूचा वापर वाहतूक साधने आणि स्वयंपाकासाठी देखील होऊ शकेल. युरिया आणि पोलाद उत्पादनांशी संबंधित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील त्याचा उपयोग होऊ शकेल. आमचे उद्दिष्ट आहे, की वर्ष 2030 पर्यंत, म्हणजे या दशकात सुमारे 100 दशलक्ष टन कोळशापासून वायूनिर्मिती केली जाणार आहे. मला सांगण्यात आले आहे की या कामासाठी चार प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे आणि त्यावर आता सुमारे 20 हजार कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत.

मित्रांनो, कोळसा क्षेत्राशी संबंधित या सुधारणा, पूर्व आणि मध्य भारताला विशेषतः आमच्या आदिवासी पट्ट्याला, विकासाचे स्तंभ बनवण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे. आपल्याकडे जिथे कोळसा आहे, जिथे खनिजे आहेत असा भाग प्रगती आणि समृद्धीच्या बाबतीत फार पुढे गेलेला नाही. देशातल्या या भगात, असे अनेक आकांक्षी जिल्हे देखील आहेत. असे जिल्हे, जेथील लोकांना विकासाची आस आहे, आकांक्षा आहे, काहीतरी करण्याची उमेद आहे, ताकद आणि सामर्थ्य आहे, सगळे काही आहे, मात्र तरीही हे जिल्हे प्रगतीच्या स्पर्धेत बरेच मागे पडले आहेत. आपण कल्पना करु शकता, देशात 16 असे आकांक्षी जिल्हे आहेत, जिथे कोळशाच्या मोठमोठ्या खाणी आहेत.

मात्र, त्याचा लाभ तिथल्या लोकांना जेवढा मिळायला हवा होता, तेवढा त्यांना मिळाला नाही. तिथल्या गरिबांचे जेवढे कल्याण व्हायला हवे होते, तेवढे ते झाले नाही, इथून मोठ्या संख्येने आपले सहकरी, दूर दूर आपल्या वृद्ध पालकांना सोडून, शेतीवाडी सोडून, मित्र परिवार सोडून मोठमोठ्या शहरात रोजगारासाठी स्थलांतरीत झाले आहेत.

अशा समस्या सोडवण्यासाठी आणि पूर्व तसेच मध्य भारतातील एका मोठ्या लोकसंख्येला त्यांच्या घराजवळच उत्तम रोजगाराच्या संधी देण्यासाठी , व्यावसायिक खाणकामाच्या दिशेने आपण जी पावले टाकली आहेत, त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला नक्कीच दिसतील. आणि जेव्हा मी सकारात्मक म्हणजेच इच्छित परिणामांविषयी बोलतो, तेव्हा मला या क्षेत्रांचा विकास करायचा असतो. तिथल्या गरीब जनतेचा विकास करायचा आहे. सर्वात आधी मला या भागांना आत्मनिर्भर बनवायचे आहे, तिथल्या प्रत्येक कुटुंबाला आत्मनिर्भर बनवायचे आहे, गरिबांच्या आयुष्यात बदल घडवून आणायचा आहे.

आज ज्या कोळसा खाणींचा लिलाव होतो आहे, त्यातूनच या क्षेत्रात लाखो रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. केवळ एवढेच नाही, तर कोळसा काढण्यापासून ते वाहतूक करण्यापर्यंत ज्या आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत, त्या कामांमुळेही रोजगारनिर्मिती होणार आहे, अलीकडेच सरकारने, अशा पायाभूत सुविधांसाठी 50 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे

मित्रानो, कोळसा क्षेत्रात होणाऱ्या सुधारणा, या क्षेत्रात होणारी गुंतवणूक, यामुळे जनतेच्या आयुष्यात, विशेषतः आमच्या गरीब आणि आदिवासी बंधू-भगिनींच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे. कोळसा उत्पादनामुळे राज्यांना जो अतिरिक्त महसूल मिळणार आहे, त्याचा उपयोग तिथल्या कल्याणकारी योजनांसाठी होऊ शकेल, त्या राज्याच्या विकासासाठी होऊ शकेल. त्यासोबतच, राज्यांना जिल्हा खनिज निधीतूनही मोठी मदत मिळणार आहे आणि ही मदत सुरूच राहील. या निधीचा एक मोठा वाटा कोळसा खाणींच्या आसपास च्या भागात आवश्यक सुविधांच्या विकास कामांवर खर्च केला जाईल. तिथल्या लोकांचे आयुष्य सुखकर बनावे, त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, सरकार दरबारी खेटे घालावे लागू नयेत, त्यांना सन्मानाने आयुष्य जगता यावे, ते आत्मनिर्भर व्हावेत यासाठी खर्च केले जाणार आहेत. म्हणजेच, जिथे संपदा आहे, तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये समृद्धीही यावी, हे उद्दिष्ट घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. आज उचललेली पावले हे लक्ष्य गाठण्यात अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. 

मित्रांनो, हा लिलाव अशावेळी होतो आहे, जेव्हा भारतातील उद्योग-व्यावसायिक  क्षेत्रे जलद गतीने सामान्य होत आहेत. वस्तूंचा वापर आणि मागणी अत्यंत वेगाने कोविड आधीच्या काळातील स्तरापर्यंत पोहोचते आहे.

अशा स्थितीत, नवी सुरुवात करण्यासाठी यापेक्षा अधिक चांगला काळ कोणताही असू शकत नाही. उर्जा क्षेत्र असो, वस्तूंचा वापर असो, पेट्रोलियम उत्पादनांची मागणी असो, या सगळ्यात मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात वेगाने वाढ झाली आहे. याचप्रकारे, एप्रिलच्या तुलनेत, ई-वे बिल्स, त्यानेही, सुमारे 200 टक्यांची उसळी घेतली आहे. जून महिन्यात पथकर संकलन देखील फेब्रुवारीच्या संकलनाच्या 70 टक्यांपर्यंत पोहोचले आहे. मे महिन्यात रेल्वे मालवाहतुकीच्या दरात देखील एप्रिलच्या तुलनेत 26 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. जर एकून डिजिटल किरकोळ व्यवहार बघितले, तर त्याचे मूल्य आणि व्याप्ती दोन्हीमध्ये वाढ होणे सुरु झाले आहे.

मित्रांनो, ग्रामीण अर्थव्यवस्थेची गती देखील हळूहळू वाढते आहे. यावेळी खरिपाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या क्षेत्रापेक्षा 13 टक्के अधिक आहे. यावर्षीचे गव्हाचे उत्पादन आणि त्याची खरेदी दोन्ही वाढली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत गव्हाची खरेदी 11 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. याचा अर्थ हा आहे, शेतकऱ्यांच्या खिशातही यावेळी जास्त पैसे गेले असतील. हे सगळे निदर्शक सांगतांना, मी केवळ जुजबी माहिती दिली आहे, जास्त वेळ घेतला नाही, केवळ काही निदर्शक दाखवले आहेत जे असे सांगत आहेत की भारतीय अर्थव्यवस्था जलद गतीने उसळी घेण्यासाठी सज्ज आहे, पुढे वाटचाल करते आहे.

मित्रांनो, भारत मोठ्यात मोठ्या संकटातून बाहेर पडला आहे, यातूनही बाहेर पडेल. आपण भारतीय लोक जर कोट्यावधी ग्राहक असू, तर हे हि विसरता कामा नये आपण कोट्यवधी लोक उत्पादक देखील आहोत. भारताचे यश, भारताची वृद्धी निश्चित होणार आहे. आपण आत्मनिर्भर बनू शकतो. तुम्ही आठवून बघा, फक्त काही आठवड्यांपूर्वी आपण N-95  मास्क, कोरोनाच्या चाचण्या किट्स, पीपीई सूट्स, वेंटिलेटर अशा सर्व आवश्यक गोष्टी आपण बाहेरून मागवत असू. आता मात्र, मेक इन इंडिया अंतर्गत, भारत आपली मागणी देशातच पूर्ण करतो आहे. किंबहुना, लवकरच, आपण महत्वाच्या वैद्यकीय उपकरणांची निर्यात देखील करणार आहोत. आपण आपला विश्वास, आपली उमेद भक्कम ठेवा, आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि हा आपला संकल्प आहे, 130 कोटी भारतीयांचा संकल्प आहे, आपल्याला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे आणि आपण आत्मनिर्भर भारत बनवू शकतो.

आत्मनिर्भर भारताचा हा प्रवास, जो आपण 130 कोटी भारतीयांनी सुरु केला आहे, त्याचे आपण सर्वजण भागीदार आहात. आपण नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे. आयुष्यात अशी संधी क्वचितच मिळते, जेव्हा काहीतरी करुन इतिहासाला नवे वळण देण्याची संधी आपल्याला मिळते. आज भारताच्या उद्योगजगताला, भारताच्या व्यापारी जगताला, भारताच्या सेवा क्षेत्राला लोकांना सुख देण्याची, देशाचा इतिहास बदलण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला ही संधी गमवायची नाही . इतिहासाची दिशा बदलण्याची संधी आली आहे, भारताचे भाग्य बदलण्याची संधी आहे, आपल्याला ही संधी हातून जाऊ द्यायची नाही. चला, भारताला प्रगतीपथावर नेऊया, भारताला आत्मनिर्भर बनवूया.

मित्रांनो, आज मला आपल्यामध्ये येण्याची संधी मिळाली आहे. गोष्ट तर कोळशाची आहे, पण आपल्याला हिऱ्याचे स्वप्न उराशी घेऊन चालायचे आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वाना, या महत्वाच्या शुभारंभासाठी, कोळसा क्षेत्राच्या या महत्वपूर्ण टप्प्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! मी विशेषतः मंत्रिमंडळातील माझे सहकारी, प्रल्हाद जोशीजी आणि त्यांच्या चमूला धन्यवाद देतो, कारण त्यांनी या लॉकडाऊनच्या काळाचा इतका उत्तम वापर केला. संपूर्ण विभागाच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास केला. देशासाठी नवे काय करु शकतो, नव्या पद्धती कशा असू शकतील, त्याचा अभ्यास केला. त्यांनी एक मोठे नेतृत्व दिले आहे. मी प्रल्हाद जी, त्यांचे सचिव आणि सर्व चमूचे खूप खूप अभिनंदन करतो.

तुम्हा सर्वांना वाटत असेल, की आपण एक छोटासा कार्यक्रम करतो आहोत, प्रल्हाद जी मला असे नाही वाटत, आज तुम्ही आत्मनिर्भर भारतासाठी भक्कम पाया रचत आहात, आणि म्हणूनच तुम्ही आणि तुमचा चमू अभिनंदनास पात्र आहात.

उद्योग जगतातले जे सहकारी आज इथे हजर आहेत, त्या सर्वांना मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो, की मी तुमच्या सोबत आहे. देशहिताच्या प्रत्येक कामात, जर तुम्ही दोन पावले चाललात, तर मी चार पावले चालण्यासाठी तुमच्या सोबत आहे. चला तर मग, आपण सर्व मिळून या संधीचे सोने करुया!

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!

खूप खूप धन्यवाद !!

ThankYou!

Leave a Reply

Your email address will not be published.