२३ लाख रुपये किंमतीचा माल परस्‍पर लांबवून विक्री ,व्यापाऱ्याला अटक

औरंगाबाद ,१७जून /प्रतिनिधी :-  

मध्‍यप्रदेशातील कंपनीत पोहचता करण्‍यासाठी दिलेला २३ लाख २८ हजार ३४७ रुपये किंमतीचा माल परस्‍पर लांबवून एका कंपनीला विक्री केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी एका व्यापाऱ्याला  बुधवारी दि.१६ रात्री अटक केली.

अक्षय कमल मित्‍तल (२८, रा. मौलाना आझाद मार्ग, सेधवा जि. बडवानी मध्‍यप्रदेश) असे आरोपीचे नाव असून त्‍याला शुक्रवारपर्यंत दि.१८ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी गुरुवारी दि.१७ दिले.

चिकलठाणा एमएस डब्ल्युसी गोडावून येथून ४ मे रोजी फिरोज मन्सुरी  हमीद (रा. मोतीबाग मोहल्ला, बडवानी, मध्यप्रदेश) याच्या ट्रक क्रमांक एमएच १८ बीए ७८६१ मधून २३ लाख २८ हजार ३४७ किंमतीचा कॉटन बेल्सचा माल मध्य प्रदेश येथून बुधनी येथे असलेल्या ट्राईडेंन्ट यारन कंपनीकडे पाठविला होता. हा माल सदर कंपनीकडे न घेऊन जाता, ट्रक चालकाने परस्पर घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निल कमल किशोर खंडेलवाल (४५, रा. दत्त कॉलनी, अकोला) याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तपास केला असता, ट्रक चालक फिरोज हमीद याने मध्‍यप्रदेशातील बन्‍सी प्रेस जवळील एका मैदानात सदरील माल खाली केल्याची माहिती प्रेस मधील हमालाने दिली. तसेच गुन्‍ह्यातील माल मुख्‍य आरोपी तथा कंपनीचा मालक अर्पित बनवारीलाल गर्ग याने सुखराम डोडवे याच्‍या ट्रकमध्ये (क्रं. एमएच-१८-बीए-८५०५) मध्‍ये लोड करुन तो इंदोर येथे अक्षय मित्‍तल याला दिला. त्‍याने श्री फायबर्सच्‍या नावे बिल बनवून फसवणूक  केली.

आरोपी अक्षय मित्‍तल याला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी आरोपीने डोडवे याचा गुन्‍ह्यात वापलेला ट्रक जप्‍त करणे आहे. गुन्‍ह्यातील मुख्‍य आरोपी गर्ग याला अटक करणे आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.